काँग्रेसच्या गडावर भाजपाचा झेंडा!

By admin | Published: March 23, 2017 11:13 PM2017-03-23T23:13:31+5:302017-03-23T23:13:31+5:30

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार धक्का दिला आहे.

BJP's flag on the fort of Congress! | काँग्रेसच्या गडावर भाजपाचा झेंडा!

काँग्रेसच्या गडावर भाजपाचा झेंडा!

Next

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार धक्का दिला आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी लाट होती. त्या लाटेचा परिणाम झाला होता. दक्षिण महाराष्ट्रातील चारपैकी एक खासदारपद भाजपाने पटकावले होते. विधानसभा निवडणुकीत सव्वीसपैकी सहा आमदार भाजपाने निवडून आणले. तेव्हा असे मानले जात होते की, भाजपाच्या यशाची ही सीमा आहे. मात्र, केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्याने गावोगावचे राजकारणही बदलू लागले. मुळात या प्रदेशात भाजपाची ताकद अत्यंत मर्यादित होती. ती एवढी मर्यादित होती की, दक्षिण महाराष्ट्रातील तीन जिल्हा परिषदांच्या १९१ सदस्यांमध्ये भाजपाचे केवळ चार सदस्य होते. सत्ता फारच दूर होती. सांगली जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून एकदाही भाजपाचा उमेदवार निवडून आला नव्हता. मावळत्या सभागृहातही एकही सदस्य नव्हता. तोच भाजपा साठपैकी पंचवीस जागा जिंकत शिवसेनेच्या मदतीने सत्तारूढ पक्ष झाला आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड ताकद लावली होती. गेल्या काही महिन्यांत या तीन जिल्ह्यांत चंद्रकांतदादा दौऱ्यावर येणार म्हणताच आता कोणता कार्यकर्ता किंवा नेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून प्रवेश करणार याचीच चर्चा होत होती. ग्रामपंचायतीत केव्हाच सत्ता नव्हती. तालुका पंचायतीच्या आवारात कधी प्रवेश झाला नाही. जिल्हा परिषदांच्या सत्ता सिंहासनाकडे पाहण्याची संधी कधी मिळाली नाही. मोदी लाटेत थोडी पडझड झाली असेल, ग्रामपातळीवर निवडणुकीत भाजपाला साथ मिळणार नाही, याच विचारात मश्गूल असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या दोन जिल्हा परिषदांची सिंहासने भाजपाने कशी मिळविली हेच समजले नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीद्वारे केंद्र तसेच राज्यातील सत्ता गेली तरी काँग्रेसी नेत्यांची गुर्मी कमी होत नाही. भाजपारूपी स्पर्धक (शत्रू म्हणायला नको) मैदान मारण्याची तयारी करीत असताना, काँग्रेसी नेते उमेदवार वाटणीवरून एकमेकांचे पाय ओढत होते. तिन्ही जिल्ह्यांत याचा परिणाम झाला. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेस सलग पंधरा वर्षे सत्तेत होती. यापैकी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काळाची पावले ओळखून एकसंधपणे तालुका-तालुका सांभाळला. एवढेच नव्हे तर भाजपाचे वारे असताना आणि काँग्रेसची साथ नसताना राष्ट्रवादीने सातारा जिल्हा परिषदेत आजवरचे सर्वोत्तम यश संपादन केले. अकराच्या अकरा तालुका पंचायत समित्यांच्या सभापतिपदांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला.
याउलट कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण झाली. अनेक वरिष्ठ नेते असूनही त्यांनी न लढता कमीत कमी हार पत्करण्याची तयारी केली होती. सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची घसरण तेहतीसवरून चौदावर झाली. काँग्रेस तेवीसवरून केवळ दहा जागांवर घसरली. हीच अवस्था कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसची झाली. या दोन्ही पक्षांत अनेक नेते गेली चाळीस वर्षे राजकारण करीत आहेत. राज्यपातळीवरील असंख्य सत्तापदे भोगली आहेत. मात्र, राजकीय वारे काय वाहते, आपण कशी सावध भूमिका घ्यायला हवी याचे अजिबात गांभीर्य नसल्याने भाजपाकडून न लढताच चितपट झाले.
भाजपाने मिळविलेले यश निर्विवाद म्हणता येणार नाही; पण त्यांना यश मिळाले आहे. सातारा वगळता सांगली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांवर सत्ता मिळविली. त्यासाठी सर्व साधनांचा वापर केला. राजकीय कौशल्य दाखविले. याची संपूर्ण जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर होती. त्यांनी राजकीय गणिते जुळविली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फोडून सत्ता मिळविली असली तरी त्यांच्या खांद्यावर भाजपाचा झेंडा आहे. चाळीस वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांतदादांनी चाळीस वर्षे नेतेगिरी करणाऱ्या चाळीस काँग्रेसी नेत्यांना सत्तेवरून बाजूला केले, हेच त्यांचे यश आहे.
- वसंत भोसले

Web Title: BJP's flag on the fort of Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.