भाजपाचे दांभिक दलितप्रेम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:53 PM2018-09-27T23:53:49+5:302018-09-28T00:03:46+5:30
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.
- बी.व्ही. जोंधळे
(आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक)
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो दांभिक आहे.
या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, ‘भाजपा दलित-आदिवासीविरोधी असल्याचा अपप्रचार विरोधी पक्ष करीत असतात. विरोधकांचे हे भाजपाविरोधी मनसुबे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडले पाहिजेत.’ याच बैठकीत दलित-आदिवासी-ओबीसी वर्गांची मते खेचून आणण्यासाठी दलित-अदिवासी-ओबीसी समाजाची संमेलने भरविण्याचाही घाट घातला गेला. एकूणच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१९ ची लोकसभा आणि दिवाळीनंतर होणाऱ्या चार-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून दलित-आदिवासी समाजास भुलविण्याचे षड्यंत्र आखण्याचे निश्चित केले आहे, हे उघड आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वादा करून केंद्रात आणि देशाच्या दोन डझन राज्यांत सत्ता मिळविली; पण गेल्या साडेचार वर्षांत लोकांचे ‘अच्छे दिन’ तर दूरच राहिले; मात्र त्यांचे ‘बुरे दिन’ जरूर आले. भयभीत झालेल्या दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाची तर भाजपाच्या राज्यात खूपच वाईट अवस्था झाली. भाजपा एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे भावनात्मक राजकारण करून बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा आम्हाला अतीव आदर आहे, अशा घोषणा करीत आला. मात्र, दुसरीकडे बाबासाहेबांची राज्यघटना न बदलताही घटनाविरोधी वर्तन करीत आला, याचा भरपूर वाईट अनुभव गेल्या साडेचार वर्षांत दलित-आदिवासी-अल्पसंख्याक समाजाने घेतला आहे.
भाजपाच्या सत्ताकाळात गोरक्षणाच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या करण्यात आल्या. सनातन धर्माच्या प्रस्थापनेसाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्यात येऊ लागला. देशाच्या राजधानीत राज्यघटना जाळताना मनुस्मृतीच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सेक्युलर संकल्पना मोडीत काढण्यासाठी आध्यात्मिक पायावरील लोकशाही आणि आध्यात्मिक पायावरील धर्मनिरपेक्षता या पर्यायी संकल्पनांचा बडेजाव माजविण्यात येऊ लागला. विविधतेच्या नावाखाली विषमता जोपासली जाऊ लागली. विवेकवादी विज्ञाननिष्ठ मतांना हिंस्र विरोध होऊ लागला. हिंदू राष्ट्रास नकार देणा-या पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यासारख्या नेत्यांचा ‘सेक्युलर’ वारसा मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाबासाहेबांचे क्रांतिदर्शी सामाजिक विचार दडपून हिंदुत्वाच्या प्रतिक्रांतीचे कारस्थान रचण्यात येत आहे. म. गांधींच्या नावे स्वच्छता अभियान चालवायचे; मात्र गांधीजींचे अहिंसक-सत्याग्रही-मानवतावादी विचार नाकारायचे. धार्मिक बाबा, बुवा, मठाधिपतींना सत्तेत सहभागी करून घ्यायचे, असा सारा घटनाविरोधी प्रकार आज देशात सुरू आहे. या अशा मळभ दाटून आलेल्या पार्श्वभूमीवर म्हणूनच बाबासाहेबांची लोकशाही धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठी आंबेडकरवादी पक्ष-संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.