पवारमुक्त बारामती... ठाकरेमुक्त मुंबई?; भाजपाला हे 'करून दाखवणं' शक्य होईल? 

By यदू जोशी | Published: September 10, 2022 04:38 PM2022-09-10T16:38:12+5:302022-09-10T16:45:45+5:30

२०२४च्या जोरदार तयारीतून बारामती सुटणार नाही आणि 'मातोश्री'ही अधिक घायाळ होत राहील, असे संकेत स्पष्ट दिसतात!

BJP's mission to storm into Baramati, sharad pawar's turf and Thackeray Mukt Mumbai | पवारमुक्त बारामती... ठाकरेमुक्त मुंबई?; भाजपाला हे 'करून दाखवणं' शक्य होईल? 

पवारमुक्त बारामती... ठाकरेमुक्त मुंबई?; भाजपाला हे 'करून दाखवणं' शक्य होईल? 

googlenewsNext

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

ठाकरेमुक्त मुंबई आणि पवारमुक्त बारामती ही कॅचलाइन चांगली वाटते, भाजपने सध्या ती पकडली आहे. ठाकरेंना जागा दाखवा, असे सांगण्यासाठी अमित शहा मुंबईत येऊन गेले. पवारमुक्त बारामतीसाठी अजित पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत जाऊन आले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढच्या आठवड्यात तीन दिवस बारामतीत असणार आहेत. वस्तूंचे भाव कमी न करू शकलेल्या निर्मलाताई पवारांचा भाव कमी करायला जाताहेत, जमेल का हे त्यांना? स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधींना आऊट केले. आता देशाची तिजोरी सांभाळणाऱ्या सीतारामन यांना बारामतीत पाठवले जात आहे. स्मृती इराणी स्वतः लढल्या. सीतारामन काही सुप्रियाताईविरुद्ध स्वतः लढणार नाहीत; पण २०२४ मध्ये भाजप बारामतीत तगडी यंत्रणा उतरवेल, हे नक्की! पवारांना बारामतीत हरवणे सोपे नाही. 

एक मात्र खरे की २०२४ च्या निवडणुकीत पवार घराणे, राष्ट्रवादी हे एका निर्णायक टप्प्यावर असतील. पवार घराण्यात कुठे फट दिसते का ते शोधण्याचाही प्रयत्न होईल. पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झालाच होता ना? आज अजेंड्यावर घेतल्यानंतर बारामती लगेच खिशात येईल, अशातला भाग नाही; पण २०२४ च्या जोरदार तयारीतून बारामतीही सुटणार नाही, हा महत्त्वाचा मेसेज भाजप नेतृत्वाने दिला आहे. शरद पवार राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधी मोट बांधत असल्याने भाजपने त्यांना बारामतीत गुंतवून ठेवण्याचा गेमप्लॅन तयार केलेला दिसतो. घराणेशाहीचे राजकारण मोडायला निघालेल्या भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस हे २०२४ पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीतील चार-पाच घराण्यांना नक्कीच गळाला लावतील. आपापले घराणे, सुभे शाबूत ठेवण्यासाठी पक्षोपक्षीचे नेते आतापर्यंत एकमेकांना सांभाळून घेत होते. आजच्या भाजपने ते तंत्र मोडीत काढण्याचे ठरवले आहे. उलट घराणीच आपल्याकडे घेण्यासाठी जाळे टाकणे सुरू झाले आहे. घराण्यांमधील भूकंपाचा केंद्रबिंदू सांगली, नाशिक, नांदेडही असू शकेल.

दुसरा मुद्दा : ठाकरेमुक्त मुंबई शक्य आहे का?

ठाकरेमुक्त मुंबई म्हणजे मुंबई महापालिकेवरील ठाकरेंचे वर्चस्व संपविणे, भल्यामोठ्या बंडखोरीने जेरीस आलेल्या शिवसेनेवर आघात करण्याची हीच वेळ असल्याचे भाजप जाणतो. उद्धव ठाकरेंसाठी पुढचे दिवस कठीण आहेत, हे नक्की! सोबतचे काही आमदार, एखादा खासदार अन् मुंबईतले तीस-चाळीस माजी नगरसेवक भाजप किंवा शिंदे गटात नक्कीच जातील. मुंबई महापालिका निवडणूक जवळ येईल तशी नव्या फाटाफुटीने मातोश्री अधिक हैराण होईल. २०१९ च्या सत्तांतरावेळी अमित शहांनी स्वतःला महाराष्ट्रातील घडामोडींपासून दूर ठेवले होते, अलीकडच्या सत्तांतरावेळीही ते मुंबईत आले नव्हते, आता ते मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक अमित शहा-एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे अशी असेल. मनसेचे इंजिन स्वतःच धावते की कोणाच्या डब्याला जोडले जाते ते अद्याप ठरायचे आहे.

अभी नही तो कभी नही म्हणत फडणवीसांनी संघर्ष टोकाचा होणार, याचे संकेत दिले आहेतच. ठाकरेमुक्त शिवसेना आणि ठाकरेमुक्त मुंबईचे भाजपचे लक्ष्य राजकारणाचा पटच बदलणारे ठरू शकेल. इतक्या विपरित स्थितीतही ठाकरे जिंकले तर तो मोठा चमत्कार असेल, मग मात्र शिवसेना आणखी वाढेल. ठाकरेंसाठीदेखील ही लढाई "करो वा मरो'चीच आहे. 

सरकार फिरतेच आहे; जागेवर काही बसेना!

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या जोडगोळीने निर्णयांचा धडाका लावला आहे. अडीच वर्षांतील निर्णय लकव्यातून ते राज्याला बाहेर काढत आहेत. आधीचे सरकार निर्णय घेत नव्हते अन् लोकांना भेटतही नव्हते, आताचे सरकार निर्णय घेत असले तरी लोकांना भेटण्यात वेळ घालवत आहे. सरकारची टूरिंग टॉकीज झाली आहे. दहा दिवस बसलेले गणपतीही उठले; पण सरकार काही जागेवर बसत नाही. मंत्र्यांच्या दालनात अजूनही शुकशुकाट आहे.

पीए, पीएस नेमलेले नाहीत, जे नेमले आहेत त्यांना आपणच राहू की नाही, याबाबत शंका आहे. कारण त्यांची नावे छाननीसाठी गेली आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपल्या अधिकारात पीए, पीएस नेमले; पण भाजपच्या मंत्र्यांकडील नावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेखालून गेल्यानंतरच नक्की होत आहेत. ३० जूनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. ९ ऑगस्टला विस्तार झाला. आज जवळपास महिना झाला; पण बरेच मंत्री मंत्रालयात येताना दिसत नाहीत. तुरळक बैठका होत आहेत. पालकमंत्रीच नसल्याने अनेक कामे, निर्णय खोळंबले आहेत. "विस्तार नंबर टू" तर दूरच राहिला. इच्छुकांनी कुठेही कॉल लावला तरी त्यांना 'आप प्रतीक्षा में है' असेच ऐकू येत आहे. सरकार पाडण्याचा मुहूर्त भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी सांगितला होता, तसे आता "विस्तार टू'चे मुहूर्त सांगितले जात आहेत. इतक्यात काही होत नाही असे दिसते. राज्याला अस्थिर करणाऱ्या राजकीय घडामोडींनंतर आलेले सरकार स्वत: पूर्णतः स्थिरावलेले दिसत नाही. लोकांच्या गर्दीत पार हरवून गेलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शोधत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक हिंदुत्ववादी असल्याचे सिद्ध करण्यासाठी गणपतींचे दिवसरात्र दर्शन घेण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य कसे असू शकते?

Web Title: BJP's mission to storm into Baramati, sharad pawar's turf and Thackeray Mukt Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.