कुटील डावपेचातील भाजपाचं कौशल्य वादातीतच

By admin | Published: October 22, 2015 03:22 AM2015-10-22T03:22:41+5:302015-10-22T03:22:41+5:30

निवडणुका लढवण्याचं ‘मोदी तंत्र’ किती वेगळं आहे आणि निवडणुकीसाठी किती व कशी काटेकोर आखणी केली जाते, हे गेल्या वर्षीच्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी दिसून आलं होतं.

BJP's skill in the strategic strategy is in dispute | कुटील डावपेचातील भाजपाचं कौशल्य वादातीतच

कुटील डावपेचातील भाजपाचं कौशल्य वादातीतच

Next

- प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

निवडणुका लढवण्याचं ‘मोदी तंत्र’ किती वेगळं आहे आणि निवडणुकीसाठी किती व कशी काटेकोर आखणी केली जाते, हे गेल्या वर्षीच्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी दिसून आलं होतं. बिहारमध्ये त्याचाच प्रत्यय येत आहे.
बिहारमधील निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून भाजपानं राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार व संयुक्त जनता दल हा त्यांचा पक्ष यांना लक्ष्य केलं होतं. प्रसार माध्यमांच्या प्रभावाचा खुबीनं वापर करून नितीशकुमार यांचं राजकीय चारित्र्यहनन करण्याची मोहीमच भाजपानं हाती घेतली होती. बिहार ही जातीपातीची दलदल आहे. तेथील राजकारणाचा ‘जात’ हा अविभाज्य भाग आहे. नितीशकुमार जोडीला गेल्यानं तेथे सत्तेत सहभागी होण्याची संधी भाजपाला मिळाली. अन्यथा उच्चवर्णीयात प्रामुख्यानं पाठबळ असलेल्या भाजपाला बिहारमधील सत्तेत वाटा मिळणं तसं कठीणच होतं. मात्र ‘मोदी’ या मुद्यावरून नितीशकुमार बाजूला झाले आणि मग त्यांना भाजपानं लक्ष्य केलं. तेव्हा लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत होते ‘विकास’ हा राजकारणातील कळीचा शब्द बनवण्यात आला होता. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडवणारा मीच एकमेव नेता देशात होतो, अशी शेखी लालूप्रसाद कायम मिरवत आले आहेत. पण मोदी यांच्या ‘विकासा’च्या दिग्विजयाचा घोडा इतका चौखूर उधळला की, लालूप्रसादच नव्हे, तर एकेकाळचे भाजपाचे साथीदार असलेले नितीशकुमारही लोकसभा निवडणुकीत भुईसपाट झाले.
बिहार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपर्यंत मोदींची लाट ओसरलेली नव्हती. भाजपाच्या विरोधात नितीशकुमार, लालूप्रसाद, काँग्रेस हे एकत्र येण्याची चिन्हं नव्हती. त्यामुळं बिहारमध्ये एकतर्फी सामना होणार, असंच चित्र होतं. जातीच्या गणितात दलित व महादलित यांना आपल्या बाजूला ओढलं की झालं, अशी खात्री भाजपाला वाटत होती. त्यामुळं नितीशकुमार यांच्याशी बिनसल्यानं पक्षाबाहेर पडलेले जितनराम मांझी, रामविलास पासवान इत्यादी नेत्यांना हाताशी धरलं की जातीचं समीकरण जमवता येईल, अशी भाजपाची धारणा होती. पण नितीशकुमार व लालूप्रसाद एकत्र आले. त्यांनी मुलायमसिंह यांनाही साथीला घेतलं. काँगे्रसही या महाआघाडीत सामील झाली. त्यामुळं भाजपाला पुन्हा एकदा डावपेच बदलणं भाग पडलं.
...आणि मग ‘विकास’ व्हायचा असेल, तर लालूप्रसाद यांच्या हाती सत्ता येऊन चालणार नाही, पुन्हा ‘जंगलराज’ येईल, अशी भीती मतदारांना दाखवण्यास मोदी व भाजपानं सुरूवात केली. शिवाय लालूप्रसाद यांच्या पाठीशी असलेल्या यादव समाजात फूट पाडण्यासाठी पप्पू यादवसारख्या गुंडालाही भाजपानं जवळ केलं, तसंच मुलायमसिंह यांनाही ‘महाआघाडीत’तून बाजूला केलं. शिवाय ‘विकास’चा मंत्र मोदी आळवतच होते. एकीकडं ओबीसी व दलित यांच्यात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना भाजपा जोड देत होती, ती आपल्या मागं असलेल्या उच्चवर्णीयांच्या जातीय जाणिवाही प्रखर करण्याची. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अचानक राखीव जागांचा मुद्दा चर्चेत आणण्यामागं बिहारमधील ‘बॅकवर्ड-फॉरवर्ड’ यांच्यातील वादाला धार आणण्याचा डाव होता. पण हा डाव फसण्याची चिन्हं दिसू लागल्यावर ‘हिंदू व मुस्लिम’ अशा ध्रुवीकरणाची खेळी भाजपानं केली. ‘दादरी’ घडवून आणलं गेलं, ते त्यापायी. तेही बिहारच्या शेजारील राज्यात. प्रसार माध्यमांचा प्रकाशझोत मुख्यत: ‘दादरी’वरच पडला. पण बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशाच्या भागातील अनेक ठिकाणी धार्मिक विद्वेषाचा भडका गेल्या काही दिवसात उडत गेला आहे. हा धार्मिक विद्वेष पसरवण्यामागं बिहारमधील जातीच्या राजकारणाला छेद देण्याचंही उद्दिष्ट होतं. बिहारमधील गेल्या अर्धशतकातील जातीय दंगलीचा आढावा घेतल्यास असं दिसतं की, त्यात प्रामुख्यानं यादव हे ओबीसी, पासवान हे दलित आणि काही महादलित जाती सहभागी होत आल्या आहेत. या ओबीसी व दलित जातीत ‘हिंदू’ ही जी ओळख ठळक आहे, ती अधिक पक्की करण्याचाही एक उद्देश दादरी व उत्तर प्रदेशातील इतर प्रकरणं घडवण्यामागं होता. तसंच या प्रकारचं धु्रवीकरण झालं, तर मुस्लिम मतांंचं विभाजन महाआघाडी व मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन यांच्यात होणंही आपल्याला फायद्याचं ठरेल, हे जाणून असदुद्दीन ओवेसी यांना डिवचण्याचे डावपेचही प्रसार माध्यमांमार्फत खेळण्यावर भर दिला जात होता. मात्र हे डावपेच यशस्वी होतात की नाही, याची खात्री पटत नसल्याचं मतदानाच्या पहिल्या दोन फेऱ्यानंतर जाणवल्यावर पुन्हा एकदा ‘वाचाळ हिंदुत्ववादी मंत्री व खासदारांवर मोदी नाराज आहेत, अशा वक्तव्यांमुळं ‘विकासा’च्या मार्गावरील वाटचालीत अडथळे येत आहेत, म्हणून या वाचाळांना पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी समज दिली’ अशा बातम्या प्रसार माध्यमात पसरवण्यात आल्या. शिवाय राखीव जागांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही जाहीर केलं.
मात्र हे सगळं कसं नाटक आहे, याचा गौप्यस्फोट हिंदुत्ववाद्यातील वाचाळांपैकी साक्षी महाराज या भाजपाच्या खासदारानीच केला आहे. अमित शाह यांना भेटून आल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगून टाकलं की, ‘बिहारमध्ये भाजपाला मतं पडलेली नाहीत आणि पक्ष निवडणूक हरू शकतो, अशी भाजपातील चर्चा माझ्या कानावर पडली आहे’. साक्षी महाराजांचं हे विधान प्रसिद्ध झालं, त्याच दिवशी पक्षाध्यक्ष अमित शाह हे भाजपाच्या बिहारमधील विजयाची ग्वाही देत होते आणि स्वबळावर भाजपालाच १३० च्या आसपास जागा मिळतील, असा दावा करीत होते.
यातील खरं कोण, हे कळण्यासाठी फक्त तीन आठवडेच उरले आहेत. मात्र कोणीही जिंकलं, तरी दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्या म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आखण्याचं व त्यानुसार डावपेच खेळण्याचं भाजपचं कौशल्य इतरांपेक्षा निश्चितच उजवं आहे. दुसरं म्हणजे असे डावपेच खेळताना कुटीलतेची कोणतीही परिसीमा हा पक्ष गाठू शकतो.
गेल्या दीड महिन्यात याचा पुरेपूर प्रत्यय आला आहे.

Web Title: BJP's skill in the strategic strategy is in dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.