भाजपाचा विजय तर काँग्रेसचा आत्मघात
By admin | Published: October 20, 2014 12:33 AM2014-10-20T00:33:06+5:302014-10-20T00:33:06+5:30
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून दाखवून दिले. आपण परिस्थितीचे गुलाम होतो, असे सांगून त्यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेलाही धक्का दिला
विजय दर्डा, लोकमत पत्र समूहाचे एडिटर इन चीफ
महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील विधानसभा निवडणुका या राज्यांचे राजकीय स्वरूप निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात भाजपला सत्तेत आणल्यानंतरच्या चार महिन्यांच्या अवधीत त्यांनी हे मोठे यश मिळवले आहे. या निवडणुकांच्या निकालामुळे मोदींची जादू अद्यापही कायम आहे काय? आणि काँग्रेसने आपल्या पराभवातून बोध घेऊन हे आव्हान स्वीकारण्यासाठी पुनर्रचना करण्याचे ठरवले आहे काय? या दोन प्रश्नांची उत्तरे या निकालातून मिळणार आहेत.
या निकालातून मिळालेला बोध हा स्पष्ट आहे. तो हा की, मोदींची जादू जनमानसावर अद्याप कायम आहे आणि त्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी काँग्रेसला अद्याप उत्तर सापडलेले नाही. या निवडणुकीत भाजप हरियाणात स्वबळावर तर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. हरियाणात भाजपला यापूर्वी ९० पैकी १६ पेक्षा जास्त जागा कधीच जिंकता आल्या नव्हत्या. तसेच त्या पक्षाने महाराष्ट्रात ११९ पेक्षा जास्त जागा कधी लढवल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर त्या पक्षाने हरियाणात स्पष्ट बहुमत मिळवणे आणि महाराष्ट्रात १२३ जागा जिंकणे, ही लोकसभा निवडणुकीचीच पुनरावृत्ती म्हणावी लागेल. त्याही वेळी पक्षाने हरियाणात १० पैकी ७ आणि महाराष्ट्रात ४८ पैकी २४ ( १८ जागा त्यांच्या युतीतील शिवसनेला मिळाल्या होत्या. ) जागा मिळवल्या होत्या.
या विजयाचे श्रेय केवळ पंतप्रधानांच्या करिष्म्याला
देणे चुकीचे ठरेल. अमित शहा यांचे संघटन कौशल्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना यामुळे मोदींची जादू सामान्य उमेदवारांनाही मते मिळवून
देऊ शकली. शहा आणि मोदी हे ज्या पद्धतीने काम करतात आणि अन्य राज्यातील वरिष्ठ नेत्यांना गावपातळीपर्यंत पाठवतात, ही त्यांच्या यशाची मोजपट्टी ठरू शकते. मोदींनी २७ सभांना संबोधित केले तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १०४ मतदारसंघांत सभा घेतल्या. अन्य सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभांची बेरीजदेखील यापेक्षा कमी होईल. त्याच्या जोडीला मीडियाचा जोरकस प्रचार असल्यामुळे विरोधकांना शिरायला संधी दिली नाही. भाजपने विजयाचा नवा मंत्र साध्य केला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिथे भाजपचा शिरकाव नव्हता, त्या प्रदेशातही भाजपला विजयी होता आले.
विजयी होण्यासाठी भाजपने पूर्ण प्रयत्न केले तर सत्ताधारी पक्ष असूनही काँग्रेसची प्रचार मोहीम नियोजनशून्य ठरली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या वाईट पद्धतीने प्रचार केला त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत पाहायला मिळाली. त्या पक्षाने निवडणुकीपूर्वीच पराभव पत्करल्याचे दिसत होते आणि आपल्या उमेदवाराना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले होते. नरेंद्र मोदींनी राज्यात जेवढ्या सभा घेतल्या, त्याच्या एकचतुर्थांश सभाही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी घेतल्या नाही, ही गोष्ट एकूण स्थितीची कल्पना देणारी आहे. राज्याच्या नेतृत्वाने बऱ्याच चुका केल्या, तशाच चुका केंद्रीय नेतृत्वानेही केल्या. महाराष्ट्रात पक्षाच्या अध्यक्षपदी
दहा वर्षांपर्यंत अशी व्यक्ती होती की, जिचा मुलगा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होऊन चवथ्या क्रमांकावर फेकला गेला. त्या मतदारसंघात यशस्वी ठरलेल्या दिवंगत आमदाराच्या विधवा पत्नीला
तिकीट नाकारून हे तिकीट दिले गेले. वास्तविक
तिने पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता.
या राज्यात चार वर्षे असे मुख्यमंत्री होते की, ज्यांची
उंची प्रशासकीय संदर्भात मुख्य सचिवाच्या
पातळीवरच होती. राजकीय संदर्भात आपण कसे
शून्य आहोत, हे त्यांनी निवडणुकीपूर्वी तीन दिवस अगोदर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून
दाखवून दिले. आपण परिस्थितीचे गुलाम होतो,
असे सांगून त्यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेलाही धक्का दिला. त्यामुळे स्वत:ची जागा जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला. उलट त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाचीे पडझड होत असताना नेत्रदीपक विजय मिळवला. राजकीय विनाश स्पष्ट दिसत असताना, पक्षाच्या निवडणूक मोहिमेत किंवा योजनेत कोणताही बदल दिसून आला नाही. ज्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी अगदी नियोजित पद्धतीने परिपक्वअशी खेळी करीत होते त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतृत्व पक्षांतर्गत खेळखंडोबा करण्यात व्यस्त होते.
शिवसेना-भाजप यांची आघाडी तुटल्यावर राजकीय समंजसपणा दाखवून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र राहायला हवे होते. या दोघांची मतसंख्या
३७ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने ते चांगल्या स्थितीत राहिले असते. शरद पवारांनी सत्तेत वाटा मिळवण्याचा लौकिक उगीचच संपादन केला नाही. मतमोजणीतील आकडे स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यात चतुराई दाखवली. यावरून त्यांची चाल पूर्वनियोजित असल्याचे दिसते. काँग्रेससोबत राहण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंटाळला होता. पण शिवसेनेसोबत
राहणे भाजपला कठीण झाले होते. त्यामुळे एकमेकांसोबत राहण्याची संधी भाजप व राष्ट्रवादी शोधत होते. ती संधी निवडणुकीतील आकड्यांनी त्यांना मिळाली.
शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या निकालाचे सार जाणून घेतील, अशी आशा करू या. ६३ जागा जिंकून त्यांनी आपला पक्ष उपेक्षा करण्यासारखा नाही आणि आपले वडील बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता ते बाळगून आहेत, हे दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत सेनेला मिळालेल्या जागा ह्या भाजपाच्या पुण्याईने मिळाल्या नव्हत्या हे त्यांनी विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाने सिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे एकहाती सिंहासारखे लढले आणि मी ‘मिट्टी का शेर’ नाही हे त्यांनी दाखवून दिले. या निवडणुकीत मजलिस इत्तेहदुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाने तीन जागा जिंकल्याने आणि मनसेला कमी जागा मिळाल्याने धक्का दिला आहे. हैदराबादचा ओवेसींचा हा पक्ष धर्माच्या नावावर विष पेरणी करणारा पक्ष आहे. अशा जातीय पक्षाचा राज्याच्या राजकारणात प्रवेश होणे ही धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने धोकादायक बाब म्हटली पाहिजे. भविष्यात मनसेला प्रादेशिक पक्ष या नात्याने चांगले स्वरूप देण्याचे मुत्सद्देपण मनसे दाखवील, अशी अपेक्षा करू या. भाजपाने ही निवडणूक जिंकल्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतरचे वातावरण कायम राहिले आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यातील रालोआच्या धोरणावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. यावरून मतदारांनी ज्या विश्वासाने त्यांना केंद्रात सत्तेत आणले, त्याच विश्वासाने त्यांनी राज्यातही उचलून धरल्याचे दिसते.
काँग्रेसपुरते बघितले तर या पराभवामुळे चिंतित होण्याचे कारण दिसत नाही. १५ वर्षे किंवा १० वर्षे सत्तेत राहिल्यानंतर होणारा पराभव, हा लोकांच्या परिवर्तनाच्या आकांक्षेचे प्रतीक असतो. पण खरा प्रश्न आत्मविश्वास गमावला, हे आहे. संघर्ष करून पुन्हा सत्तेत येण्याची इच्छाशक्ती पक्षाने गमावल्याचे दिसते. राजकारणामध्ये एक आठवडादेखील महत्त्वाचा असतो. केंद्रातील चार महिन्याची सत्ता काँग्रेसला स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रेरक ठरली नाही; उलट त्या पक्षाने त्याच त्याच चुका केल्या, ही खरी चिंताजनक बाब आहे.