दुष्काळमुक्तीसाठी ‘बीजेएस’चा बुलडाणा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:40 AM2018-03-08T00:40:34+5:302018-03-08T00:40:34+5:30
दुष्काळावर मात करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. सरकारच्या प्रयत्नांना जनतेचीही साथ हवी. त्यामुळेच सरकारने आता लोकसहभाग, शासन आणि खासगी संस्थांचा सहभाग जलसंधारणाच्या कामात वाढविला आहे. भारतीय जैन संघटनेने त्यामध्ये पुढाकार घेत बुलडाणा जिल्ह्यात काम सुरू केले आहे. ‘बीजेएस’चा हा बुलडाणा पॅटर्न राज्यासाठी प्रेरक आहे.
- राजेश शेगोकार
भारतीय जैन संघटना (बीजेएस) ही खरे तर सामाजिक संघटना! आपल्या समाजापुरते या संघटनेने काम केले, तर ते गैरही नाही; मात्र या संघटनेने संपूर्ण जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा मार्ग निवडला अन् ‘जैन’ संघटना ही ‘जन’ संघटना झाली! गेल्या काही वर्षांपासून या संघटनेने जलसंधारण क्षेत्रात लक्ष घातले आहे. बीजेएसने सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होत, दुष्काळमुक्तीसाठी लढा उभारला असून, सर्वप्रथम बुलडाणा जिल्ह्यात काम सुरू केले आहे. बुलडाण्यात पाऊस कितीही पडला, तरी जवळपास हजार गावांमध्ये पाणी टंचाई ठरलेलीच असते. तत्कालीन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांच्या पुढाकाराने २०१३ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली. त्यामध्ये सामाजिक संस्थांनी सहकार्य केले व तब्बल २३० जलाशयांमधील गाळ काढून ३६ लाख ५८ हजार घनमीटरची जलक्षमता निर्माण झाली होती. त्यावेळी तो प्रयोग टँकरमुक्तीचे जलसंधारण म्हणून राज्यभर गाजला होता. पुढे सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले अन् तोच ‘पॅटर्न’ राज्यभर लागू झाला. जलसंधारणामध्ये या जलयुक्त शिवार या अभियानाचा वाटा मोलाचा आहे; मात्र या अभियानाची फलश्रुती ही पावसावर अवलंबून असून, नेमका तिथेच घात झाला. अपुºया पावसामुळे जलयुक्तचे यश सार्वत्रिकरीत्या समोर आले नाही; मात्र जेथे पावसाने साथ दिली, तेथे नव्या हरितक्रांतीची सुरुवात झाली असून, जलसंकटही संपले आहे. आज राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. आता २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय असून, बीजेएसच्या सहकार्याने त्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ३ मार्च रोजी बुलडाण्यात करण्यात आली. बीजेएसने खोदकाम करणारी तब्बल १३४ अवजड यंत्रे बुलडाण्यात आणली आहेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कामाचे नियोजन केले आहे. एम.आय. टँक, पाझर तलाव, गाव तलाव, नाला रुंदीकरण, खोलीकरण, शेत तलाव अशी तब्बल २ हजार १९१ कामे सुरू झाली आहेत. दररोज १ लाख क्युबिक मीटर गाळ काढून दररोज १० कोटी लीटर पाणी साठविण्याची क्षमता वाढविण्याचा संकल्प आहे. विशेष म्हणजे, गाळाच्या माध्यमातून दररोज तब्बल २०० एकर जमीन सुपीक होणार आहे. बीजेएस केवळ महागडी यंत्रे देऊन थांबली नाही, तर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत, जलस्रोतांची पाहणी केली. संघटनेचे तब्बल ३६० कर्मचारी व हजारो कार्यकर्ते काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कामांची ताजी स्थिती दर्शविणारे मोबाइल अॅप तयार करून कामांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. हा उपक्रम पूर्ण झाल्यावर अडीच कोटी क्युबिक मीटर गाळ काढला जाईल, पन्नास हजार एकर जमीन सुपीक होईल व २८ अब्ज लीटर पाणी साठविण्याची क्षमता निर्माण होईल. पावसाने साथ दिली, तर बीजेएसने हाती घेतलेला हा उपक्रम बुलडाणा जिल्हा ‘सुजलाम सुफलाम’ करणारा व राज्यासाठी दिशादर्शक ठरेल.
दुष्काळावर मात करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. सरकारच्या प्रयत्नांत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच सरकारने आता जनता आणि खासगी संस्थांचा सहभाग जलसंधारणाच्या कामात वाढविला आहे. भारतीय जैन संघटनेने घेतलेला पुढाकार ही त्याचीच फलश्रुती आहे.