काळे आणि गोरे
By admin | Published: October 21, 2016 07:35 PM2016-10-21T19:35:23+5:302016-10-21T19:35:23+5:30
अमेरिका नावाची महासत्ता सध्या जगभरात गाजते आहे ती तिथे उसळलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या हेलकावत्या वादळामुळे! डोनाल्ड ट्रम्प विरुध्द हिलरी क्लिंटन हा लढा याआधी कधी नव्हता अशा पातळीला पोचून जगभरात रोज नव्या राजकीय भाकितांना जन्म देतो आहे. पण अमेरिकेच्या अंतरंगात त्याहून अधिक गहिऱ्या वादळांनी नवे संघर्ष आणि प्रश्न जन्माला घातले आहेत.
Next
>निळू दामले
अमेरिका नावाची महासत्ता सध्या जगभरात गाजते आहे ती तिथे उसळलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या हेलकावत्या वादळामुळे! डोनाल्ड ट्रम्प विरुध्द हिलरी क्लिंटन हा लढा याआधी कधी नव्हता अशा पातळीला पोचून जगभरात रोज नव्या राजकीय भाकितांना जन्म देतो आहे. पण अमेरिकेच्या अंतरंगात त्याहून अधिक गहिऱ्या वादळांनी नवे संघर्ष आणि प्रश्न जन्माला घातले आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या खदखदत्या अंतरंगाचा तीन भागात घेतलेला हा शोध!
अध्यक्षपद निवडणूक प्रचार मोहीम जारी असतानाच अमेरिकेत गोऱ्या पोलिसांनी नि:शस्त्र काळ्यांना गोळ्या घातल्याच्या घटना घडल्या. कोणीही अध्यक्ष होवो त्याच्यासमोर काय वाढून ठेवलंय पाहा..
बेटन रूज. लुईझियाना.
एल्टन स्टर्लिंग हा आफ्रिकन अमेरिकन माणूस एका दुकानाबाहेर सीडीज विकत होता. कोणीतरी अनामिकानं तक्रार केली की एका काळ्या माणसानं सीडी विकताना आपल्यावर बंदूक उगारली. तक्रारीवरून तीन पोलीस त्या ठिकाणी पोचले. त्यांनी एल्टनला घेरलं. एल्टन विरोध करत नव्हता. पोलिसांनी त्याला खाली पाडलं.
एक जण त्याच्या छातीवर बसला, दुसरा मांड्यांवर, तिसरा दूर उभा होता. 'पहा, पहा हा माणूस बंदुक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय' असं म्हणत एका पोलिसानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. छातीत. तिथंच तो खलास झाला असताना काही क्षणात दुसऱ्यानं आणखी तीन गोळ्या झाडल्या.
गोळ्या घालणारे पोलीस गोरे होते.
कन्सासमध्ये राहणारा २९ वर्षांचा गेविन लाँग स्टर्लिंगच्या मरणाचा बदला घेण्यासाठी बॅटन रूजमधे पोचला. असॉल्ट रायफल, भरपूर गोळ्या घेऊन. १७ जुलै रोजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमाराला काळे सैनिकी कपडे घालून, बंदूक घेऊन गेविन बाहेर पडला.
एका चौकात आला. समोर पाच पोलीस होते. गेविननं गोळीबार केला. तीन पोलीस मेले, दोन जखमी झाले. मेलेल्यात दोन गोरे पोलीस होते, एक काळा होता.
पोलिसांनी केलेल्या प्रतिगोळीबारात गेविन मेला.
२०१३ साली मिसुरीत फर्ग्युसनमध्ये काळ्या मायकेल ब्राऊनला गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं गोळ्या घातल्यापासून गेविन संतापला होता. गेल्या दोन तीन वर्षात अनेक काळ्या निरपराध, नि:शस्त्र तरुणांना गोऱ्या पोलिसांनी पकडलं होतं, तुरुंगात ढकललं होतं, मारलं होतं.
काळ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल काळ्यांच्या संघटना नुसते मोर्चे काढतात, निदर्शनं करतात याबद्दल गेविनला राग होता. गेविननं सोशल मीडियात लिहिलं- 'अहिंसक पद्धतीनं काहीही साधणार नाही, गोऱ्या पोलिसांना ठार मारलं पाहिजे'.
गेविन. २००५ ते २०१० या काळात तो अमेरिकेच्या फौजेत, मरीन्स विभागात होता. काही काळ तो इराक युद्धातही होता. सैन्यात असताना वरिष्ठ अधिकाऱ्याशी गेविनचा वाद झाला. गेविननं पडतं घ्यायला नकार दिला, भांडला. लष्करानं त्याला काळ्या यादीत टाकलं होतं.
न्यू यॉर्क. कालीफ ब्राऊडर या सोळा वर्षे वयाच्या अनाथ मुलाला पंधरा दिवसांपूर्वी एका माणसानं आपल्याला रस्त्यावर लुटण्यात आल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पकडलं. तक्रारीत कोणी लुटलं वगैरेचा उल्लेख नव्हता. कालीफची झडती झाली. झडतीत काहीही सापडण्यासारखं नव्हतं. पुरावा नाही, चार्जशीट नाही. कोर्टात उभं केलं, कोर्टानं तीन हजार डॉलरचा जामीन मागितला. अनाथालयात राहणारा कालीफ इतके पैसे कुठून आणणार?
कालीफची तुरुंगात रवानगी झाली.
कोर्टात तारखा पडत. पोलीस सांगत की गुन्हा कबूल केलास तर कमी शिक्षेवर सोडू. गुन्हा केला नसताना कबूल कसा करणार? ब्राऊडरनं नकार दिला. रागावलेले पोलीस आणि जेलर ब्राऊडरला मरेमरेस्तोवर मारत, एकांत कोठडीत ठेवत. कालीफनं दोन वेळा आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या छळामुळं आत्महत्त्या केली असा जबाब दिला तर पुन्हा एकांत कोठडी आणि पुन्हा मारहाण होईल असं पोलिसांनी बजावलं.
एका चांगल्या न्यायाधीशानं पोलिसांना फैलावर घेतल्यानं तीन वर्षानंतर २०१३ साली ब्राऊडर सुटला.
ब्राऊडरच्या आसपासचं वातावरण बदललं होतं. मित्र त्याच्याशी बोलत नसत. दिवसेंदिवस ब्राऊडर पायरीवर बसून आकाशाकडं पाहत असे. त्याला कोणी नोकरी द्यायला तयार नव्हतं. नोकरीसाठी गेला की त्याच्या तीन वर्षाच्या तुरुंगवासावर बोट ठेवलं जाई. कधी मधी कनवाळू आणि समजूतदार माणसं त्याला नोकरी देत. परंतु नोकरी टिकत नसे.
एकांतवासाचा धक्का त्याला बसला होता. आपल्याला कोणी तरी मारेल, आपल्याला कोणी लुटेल अशी भीती त्याला वाटायची. तो खिडक्या, दारं बंद करून घरात बसे.
पोलीस दिसला की तो घाबरून किंचाळू लागे. सभोवतालची सगळी माणसं आपल्याला पकडायला, मारायला टपली आहेत अशा गंडानं त्याला पछाडलं. त्याला उपचाराची गरज होती. पण कोण करणार त्याच्यावर उपचार, खर्च कोण करणार?
एके दिवशी त्यानं नस कापून घेतली, आत्महत्त्येचा प्रयत्न केला. इतरांच्या वेळीच लक्षात आल्यानं तो वाचला.
कालीफ ब्राऊडर असाच जगतोय. मरेपर्यंत.
समाज ब्राऊडरला जगू देत नाहीये आणि मरूही देत नाहीये.
हारवर्ड.
हेन्री लुई गेट्स हे प्राध्यापक चीनचा व्याख्यान दौरा आटोपून घरी परतले. गाडीतून उतरून घराचा दरवाजा उघडू पाहत होते. चावी लागेना. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मदतीला बोलावलं. ड्रायव्हर आणि प्रोफेसर दाराशी झटापट करत होते.
दोघेही आफ्रिकन अमेरिकन, काळे.
समोरच्या घरातल्या एका गोऱ्या महिलेनं पोलिसांना ९११ या इमर्जन्सी नंबरवर फोन केला. ‘‘दोन काळी माणसं घराच्या दाराशी झटापट करत आहेत.’’ गोरा सार्जंट जेम्स क्राऊली थडकला. तोवर दोघं दरवाजा उघडून घरात गेले होते.
क्राऊलीनं दारात उभं राहून त्या दोघांना घराबाहेर यायला सांगितलं. ‘‘तुमच्यावर घरफोडीचा आरोप आहे, बाहेर या.’’ सार्जंट क्राऊलीनं फर्मावलं. क्राउली, गोरा.
प्रोफेसर गेट्सनी आपलं ओळखपत्र दाखवलं. आपण हारवर्डमध्ये प्रोफेसर आहोत, आपण इथंच कित्येक वर्षं राहतोय, परदेश दौऱ्यावरून परततोय असं सांगितलं. क्राऊली ऐकायला तयार नाही. दरडावू लागला. वादावादी झाली.
सार्जंट क्राऊलीला अटक करायची होती. त्यानं आणखी कुमक मागवली. दिवे लकाकत पोलिसांच्या गाड्या हजर झाल्या.
प्रोफसरना हातकड्या घालून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
चारेक तास पोलिसांनी प्रोफेसर गेट्सना अपमानास्पद वागणूक दिली. हारवर्डमधल्या लोकांना हे कळल्यावर त्यांनी पोलिसांना खडसावलं. काही तासांच्या छळानंतर गेट्सना सोडण्यात आलं.
प्रेसिडेंट ओबामांना या प्रकाराची दखल घेऊन गेट्सची क्षमा मागावी लागली.
सार्जंट क्राऊलींचं वागणं बेकायदेशीर होतं, वंशद्वेषाचं होतं. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. काळ्यांना खुश्शाल गोळ्या घाला,
काळ्यांना कसंही वागवा तुम्हाला कोणीही दोषी ठरवणार नाही.
अमेरिकेत याला ‘ब्रोकन विंडो इफेक्ट’ म्हणतात. इमारतीच्या एखाद्या खिडकीची काच फुटलेली असते. कोणीही ती खिडकी दुरुस्त करत नाही. याचा अर्थ इमारतीकडं कोणाचं लक्ष नाही.
तेव्हा खुश्शाल काचा फोडा, इमारतीची वाट लावा, काळ्यांना खुश्शाल छळा..
काळ्या माणसाला अटक झाल्यावर अटकेची जागा ते कोठडी, नंतर कोठडी ते कोर्ट, नंतर कोर्ट ते कोठडी आणि बऱ्याच वेळा विनाकारणच रस्त्यावर फिरवलं जातं. गाडीत कोंबतात. पायात आणि हातात बेड्या. सीट बेल्ट लावत नाहीत.
रस्त्यावरून गाडी वेगानं नेतात, वेगात ब्रेक लावतात, वेगात गाडी सुरू करतात, जाम धक्के बसतात. कैदी सतत आदळतो, मानेला आणि मणक्याला धक्के लागतात. कैदी बेशुद्ध होतो. कधी कधी गाडीत किंवा कधी कधी नंतर मरतो. या पद्धतीला ‘रफ राईड’ असं म्हणतात.
गार्डियननं अमेरिकेतल्या पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडलेल्या लोकांचा माग ठेवलाय. सप्टेंबर २०१६ पर्यंत अमेरिकेत ७९० माणसं पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडली. यामध्ये काळे आणि लॅटिनोंची संख्या जास्त आहे.
१९४ नि:शस्त्र काळ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. साधारणपणे दोन गोरे गोळ्यांना बळी पडले, तर पाच काळे आणि सहा आदिवासी पोलिसी गोळीबारात मरतात. २०१५ मध्ये १२०० काळ्यांना पोलिसांनी गोळ्या घातल्या. एकाही पोलीस अधिकाऱ्यावर बेकायदा, पूर्वग्रहानं काळ्यांना मारणं असा आरोप ठेवलेला नाही, कोणालाही त्या आरोपाखाली शिक्षा झालेली नाही.
अमेरिकेत १३ टक्के काळे आहेत. २५ ते ४९ या वयोगटात ३५ टक्के काळे बेरोजगार आहेत. काळ्यांना चांगल्या शिक्षण संस्थांत प्रवेश मिळत नाही. शिकले असले तरी त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत. चांगल्या वस्त्यांत त्यांना घरं मिळत नाहीत. चांगली घरं घेण्याएवढे पैसेही काळ्यांकडं नसतात. सरासरी काळ्या कुटुंबाचं उत्पन्न २५,६०० डॉलर असतं. गोऱ्या कुटुंबाचं सरासरी उत्पन्न ६२,६०० डॉलर असतं.
काळ्या तरुणांतले तीसेक टक्के तरुण अनेकवेळा तुरुंगात जाऊन आलेले असतात. वस्तूची रस्त्यावर विक्री करणं, शस्त्रं बाळगणं, मारिजुआना जवळ बाळगणं, आक्षेपार्ह वर्तणूक असे आरोप त्यांच्यावर ठेवलेले असतात. बहुतेक वेळा ते आरोप सिद्ध होत नाहीत. इतर कोणत्याही समाजाच्या तुलनेत काळे जास्त तुरुंगवासी आहेत.
वाहन चालवण्याचा परवाना असला तरच काही राज्यांत मतदानाचा अधिकार मिळतो.
काळ्यांकडे गाड्या नसतात, वाहन चालवण्याचे परवाने नसतात. फालतू कारणं दाखवून अनेकांचे परवाने रद्द केले जातात. त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द होतो.
अमेरिकेत आज ५५ टक्के नागरिक मान्य करतात की काळे-गोरे संबंध बिघडलेले आहेत.
२०१३ मध्ये ‘ब्लॅक लिव्ह्ज मॅटर’ ही संघटना निर्माण झाली. ही संघटना मार्टिन लूथर किंग यांच्या अहिंसक वाटेनं जाण्याचा प्रयत्न करते. काळ्यांच्या आंदोलनातली ही एक नवी संघटना.
२०१३ मध्ये फ्लोरिडात जॉर्ज झिमरमन या गोऱ्या माणसानं ट्रेवन मार्टिन या नि:शस्त्र काळ्या तरुणाला गोळ्या घालून मारलं. त्या घटनेचे पडसाद अमेरिकाभर उमटले. ‘ब्लॅक लिव्ह्ज मॅटर’चा उदय या घटनेनंतर झाला.
‘ब्लॅक पँथर’ ही हिंसक प्रतिकाराचा पुरस्कार करणारी संघटनाही अमेरिकेत नव्यानं तोंड वर काढत आहे.
राज्यघटनेनुसार काळ्यांवर अन्याय करणं, त्यांना विनाकारण अटक करणं, त्यांना बेकायदेशीर मारणं, त्याला न्यायालयात जायला मनाई करणं, त्याला नोकरी नाकारणं बेकायदेशीर आहे.
अमेरिकन घटनेनं काळ्यांना नागरी अधिकार दिले आहेत. काळ्यांना सापत्नभावानं वागवणाऱ्याला कायद्यानं शिक्षा होते.
काळ्यांना नोकऱ्या आणि शिक्षणात प्राधान्य देणारे कायदे अमेरिकेत आहेत. इतकी सारी कायदेशीर व्यवस्था असूनही काळ्यांची परिस्थिती सुधारत नाही याचं कारण गोऱ्यांची मनं आणि हृदयं यातच काळ्यांबद्दलचा द्वेष आहे.
गोऱ्यांच्या मनात आणि हृदयात दुरावा आहे. अमेरिकेचं, गोऱ्यांचं मन आणि हृदय बदलत नाही तोवर काळ्यांवरचा अन्याय थांबणार नाही असं काळ्यांचं मत झालं आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)