समुद्राच्या पोटातलं जगणं शोधणारी जलपरी; झॅण्डीला बदलायचंय ‘वास्तव’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 11:58 AM2022-12-10T11:58:16+5:302022-12-10T11:58:28+5:30

अटलांटिक महासागरावर ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांचा गुलाम म्हणून व्यापार केला. अनेक गुलामांना खोल समुद्रात ढकलून दिलं गेलं. नाकातोंडात पाणी जाऊन आपले पूर्वज मेले हे या लोकांच्या मनात खोलवर रुतलेलं

black mermaid zandile wants to change 'reality'! | समुद्राच्या पोटातलं जगणं शोधणारी जलपरी; झॅण्डीला बदलायचंय ‘वास्तव’!

समुद्राच्या पोटातलं जगणं शोधणारी जलपरी; झॅण्डीला बदलायचंय ‘वास्तव’!

Next

पोहणं हे एक कौशल्य आहे. मुलांनी पोहायला शिकावं यासाठी पालक प्रयत्न करतात, मुलांची पाण्याविषयीची भीती घालवण्यासाठी धडपडतात; पण दक्षिण आफ्रिकेत मात्र उलटंच घडतं. तिथले कृष्णवर्णीय पालक समुद्राच्या पाण्याची ओढ लागलेल्या आपल्या मुलांना समुद्राची भीती दाखवतात. हा समुद्र आपला नाही. यात पोहणं, समुद्रात खोल उतरणं यावर आपला हक्क नाही. हा हक्क गोऱ्या लोकांचा. आपण असं केलं तर समुद्रात बुडून आपला मृत्यू होतो.. समुद्राविषयीची जी भीती पालक मुलांच्या मनात बिंबवू पाहतात, ती भीती म्हणजे एक वारसा झाली आहे. परंपरेनुसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीच्या मनात ती पेरली जातेय.  लोकांच्या मनात समुद्राविषयीची ही भीती आली कुठून? तर या भीतीचे बीज आहे त्यांच्या गुलामगिरीच्या  इतिहासात.

अटलांटिक महासागरावर ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांचा गुलाम म्हणून व्यापार केला. अनेक गुलामांना खोल समुद्रात ढकलून दिलं गेलं. नाकातोंडात पाणी जाऊन आपले पूर्वज मेले हे या लोकांच्या मनात खोलवर रुतलेलं. समुद्राबाबत आपले आई-बाबा जे सांगायचे ते झॅण्डीला पटायचं नाही. तिला पाण्यात पोहावंसं वाटायचं, इतर गोऱ्या मुलांप्रमाणे तिलाही समुद्राच्या पाण्यात खोल उतरावंसं वाटायचं; पण आई-बाबा तिला समुद्रात आपल्यासाठी मृत्यूच लिहिलेला हे सांगून तिला समुद्रापासून परावृत्त करायचे. शेवटी तो दिवस उगवलाच, ज्या दिवशी समुद्राच्या पोटात मृत्यू नाही तर जगणं आहे, एक सुंदर जग आहे हे वास्तव झॅण्डीला समजलं. झॅण्डी नदलोव्हू ही दक्षिण आफ्रिकेतील पहिली कृष्णवर्णीय ‘फ्री डायव्हिंग’ प्रशिक्षक आहे. आपण अनुभवलेलं हे समुद्राच्या पोटातलं वास्तव आपल्यासारख्या इतर मुलांनी, युवकांनी अनुभवावं ही तिची धडपड आहे. याच धडपडीपोटी ‘ब्लॅक मरमेड’ नावाची संस्था तिने स्वबळावर आणि स्वखर्चानं सुरू केली. या संस्थेद्वारे ती आफ्रिकेतील कृष्णवर्णीय, गरीब मुलांना डायव्हिंगचे मोफत धडे देत आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील सोवेटो येथे झॅण्डीचा ज्न्म झाला. समुद्रात न जाण्याचं बाळकडू इतर मुलांप्रमाणे झॅण्डीलाही मिळालं. समुद्र कसा असतो, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा या गोष्टी तिने वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत पाहिलेल्याच नव्हत्या; पण जेव्हा पाहिलं तेव्हा ती समुद्राच्या प्रेमात पडली. २०१६ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी बाली येथे सहलीला गेलेली असताना तिला समुद्रात उतरण्याची संधी मिळाली. समुद्राच्या ओढीखातर तिने स्नॉर्केलिंग केलं, तेव्हा खोल समुद्रात तिला वेगळंच जग दिसलं. त्यानं ती अक्षरश: भारावून गेली. हे जग पुन्हा पुन्हा अनुभवावंसं तिला वाटलं. तोंडाला मास्क आणि श्वास घेण्यासाठी पाठीवर सिलिंडर न लावताही समुद्रात उतरता येतं, त्याला फ्री डायव्हिंग म्हणतात. घरच्यांचा, समाजाचा विरोध झुगारून ती ‘फ्री डायव्हिंग’ हा प्रकार शिकली. 

कृष्ण वर्ण, निळे लांब केस अशा रूपाच्या फ्री डायव्हिंग प्रशिक्षकाची दक्षिण आफ्रिकेत कोणी कल्पनादेखील केली नव्हती; पण झॅण्डीनं ते करून दाखवलं. फ्री डायव्हिंग शिकण्यासाठी पहिल्यांदा तिला घरातच संघर्ष करावा लागला. त्यासाठीचे वेटसूटदेखील  कृष्णवर्णीय महिलांचा विचार करून तयार केलेले नव्हते; पण या साऱ्या अडचणींवर तिनं मात केली. फ्री डायव्हिंगचं प्रशिक्षण देऊन झॅण्डीला तीन गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक म्हणजे समुद्राबद्दल जो पूर्वग्रह कृष्णवर्णीय मुला-मुलींच्या मनात आहे, तो तिला घालवायचा आहे. दुसरं म्हणजे कृष्णवर्णीय मुलं-मुली पोहण्यास सक्षम नसतात, त्यांचा बुडून मृत्यू होतो, हे गृहितक तिला खोडून काढायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे खोल समुद्रातल्या सौंदर्याशी कृष्णवर्णीय मुला-मुलींची गाठभेट तिला घालून द्यायची  आहे. आपली मुलं खोल समुद्रात जाऊन सुखरूप परत बाहेर येतात, याचा आनंद झॅण्डी अनेक पालकांच्या चेहऱ्यावर बघते आहे.. तिच्या अविरत प्रयत्नांमुळेच झॅण्डी नावाच्या या जलपरीला जग आज ‘ब्लॅक मरमेड’ नावानं ओळखतं आहे.

झॅण्डीला बदलायचंय ‘वास्तव’!
दक्षिण आफ्रिकेतील जलतरणपटूंनी ऑलिम्पिक पदक मिळवलं आहे, अनेक कृष्णवर्णीय जलतरणपटू ऑलिम्पिकमध्ये उतरत आहेत. २८०० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभूनही केवळ १५ टक्के दक्षिण आफ्रिकन लोकांना पोहायला येतं. त्यातही गोऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. हे वास्तव तिला बदलायचं आहे. आज दक्षिण आफ्रिकेत तलाव, धरण, खासगी पूल यात बुडून रोज ४ लोकांचा मृत्यू होतो. त्यातले बहुतेक कृष्णवर्णीय असतात, हे विशेष.  हे वास्तव बदलण्याचा प्रयत्न झॅण्डी नदलोव्हू सोबतच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आफ्रिकन-अमेरिकन जलतरणपटू कुलेन जोन्सही करत आहे.

Web Title: black mermaid zandile wants to change 'reality'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.