कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील ब्लॅक मूव्हमेंट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 09:42 AM2022-06-04T09:42:21+5:302022-06-04T09:45:01+5:30
विदा जितकी जास्त, तेवढे भाकित बरोबर येण्याची शक्यता जास्त. मात्र एकांगी विदासाठ्याने आजवर अल्पसंख्याकांवर बराच अन्याय केला आहे.
- विश्राम ढोले
बारा वर्षांपूर्वीचा छोटासा प्रसंग. अमेरिकेत संगणकशास्त्राचे शिक्षण घेणारी जॉय बुओलॉम्विनी तिच्या प्रकल्पावर काम करीत होती. एका यंत्रमानवासाठी तिला साधीशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करायची होती. बाकी सारे ठिक होते. पण यंत्रमानव तिचा चेहरा काही केल्या ओळखत नव्हता. प्रकल्प सादर करायच्या घाईत तिने मैत्रिणीचा चेहरा वापरून कशीबशी वेळ मारून नेली. नंतर दिडेक वर्षांनी ती शैक्षणिक स्पर्धेसाठी हाँगकाँगला गेली. तिथेही तेच. तिथला सोशल रोबो तिच्यासोबतच्या सर्व मित्र-मैत्रिणींचे चेहरे ओळखू शकत होता. पण, जॉयचा मात्र नाही. ती ओशाळली, पण, तिने दुर्लक्ष केले. मात्र जॉयवर लादली गेलेली अनामिकता इथंच संपली नाही.
पुढे अमेरिकेतील एमआयटी माध्यम प्रयोगशाळेमध्ये काम करतानाही तिला तोच अनुभव आला. फोटोतल्या माणसाचा चेहरा सिंहासारख्या प्राण्याच्या चेहऱ्यात परिवर्तित करणाऱ्या ॲपवर ती काम करीत होती. पण, हे ॲपही तिचा चेहरा ओळखेना. पांढरा मुखवटा चढवल्याखेरीज तिचा चेहरा काही परिवर्तित करेना. जॉयला एव्हाना या चुकांचे मूळ कळून चुकले होते. ते होते या तीनही ठिकाणी वापरलेल्या विदेमध्ये आणि ती विदा एकच होती. यांत्रिक स्वशिक्षणासाठी वापरायचे असे मानवी छायाचित्रांचे फुकट विदासाठे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या तीनही प्रकरणांमध्ये एकच विदासाठा वापरण्यात आला होता. तो तर सदोष होताच. इतरांचेही तसेच होते. म्हणजे नेमकं काय झालं होतं या विदासाठ्यांना? यासंदर्भात लेबल्ड फेसेस इन दी वाईल्ड नावाच्या एका लोकप्रिय आणि मोफत विदासाठ्याचे उदाहरण बोलके आहे. हा साठा २००७ सालचा.
अनेक ठिकाणी वापरला गेला. पण, सात वर्षांनी अनिल जैन आणि हु हान या अभ्यासकांनी त्याची विविध निकषांवर वैधता तपासली. त्यात आढळलेला दोष थक्क करणारा होता. त्यातली ७७ टक्के छायाचित्रे पुरुषांची होती आणि ८३ टक्के गौरवर्णीयांची. विदासाठ्यामध्ये साऱ्या कृषणवर्णीय महिलांची मिळून जितकी छायाचित्रे होती त्यापेक्षा दुपटीहून जास्त छायाचित्रे एकट्या जॉर्ज बुश या माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची होती. याचा अर्थ इतकाच होता की, प्रातिनिधिकतेच्या निकषावर हा विदासाठा प्रचंड एकांगी होता. कृष्णवर्णीयांचे आणि त्यातही महिलांचे प्रमाण नगण्य होते. असे विदासाठे जॉयला ओळखू शकणार नाहीत, हे उघड होतं. कारण जॉय कृष्णवर्णी होती आणि स्त्री होती.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एक तत्त्व मानले जाते. विदा जितकी जास्त तेवढे भाकीत बरोबर येण्याची शक्यता जास्त. याचाच दुसरा अर्थ असा की, विदा जितकी कमी तितकी भाकीत चुकण्याची शक्यता जास्त. अर्थात विदेतील अल्पसंख्याकांसंबंधीची भाकिते चुकत जाणार, हे उघड होते. जॉय बुओलॉम्विनीला तिच्या कामाची दिशा सापडली. विदेतील अल्पसंख्याकाचा मुद्दा तिने हाती घेतला. त्यावर संशोधन केले. पीएचडी मिळविली. एवढ्यावरच ती थांबली नाही. तिच्यासारखेच अनुभव घेतलेल्या टिमनिट गेब्रु या संगणक तज्ज्ञ महिलेच्या सहकार्याने तिने या विषयावर एक चळवळच उभारली. टिमनिट मूळ इथिओपियाची. जॉयसारखीच कृष्णवर्णीय. या दोघींनी मिळून त्वचेच्या रंगाच्या निकषावर अधिक व्यापक व प्रातिनिधिक ठरेल, असा विदासाठा निर्माण केला.
रवांडा, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, आईसलंड, फिनलंड आणि स्वीडनच्या लोकप्रतिनिधींची छायाचित्रे वापरून केलेला हा विदासाठा त्वचेच्या रंगाच्या निकषावर आजही सर्वोत्तम मानला जातो. त्याच्या साह्याने आयबीएम, मायक्रोसॉफ्ट आणि मेग्वाय या मोठ्या कंपन्यांच्या मुखमापन (फेस रिकग्निशन) बुद्धीच्या चाचण्या घेतल्या. त्यात तिन्ही प्रणालींनी बरीच माती खाल्ली. मग या दोघींनी कंपन्यांकडे त्याचा पाठपुरावा केला. त्यात त्यांना मर्यादित का होईना यश आले. एकोणविसाव्या शतकात कॅमेऱ्याचा शोध लागला तेव्हा तत्कालिन कृष्णवर्णी अमेरिकी नेते फ्रेडरिक डग्लस यांना त्यामध्ये एक अपार आशा दिसली. कारण कॅमेऱ्याआधीच्या काळामध्ये कृष्णवर्णीयांच्या साऱ्या दृश्य नोंदी व्हायच्या त्या मुख्यत्वे गौरवर्णीयांनी काढलेल्या चित्र आणि रेखांकनांमध्ये. त्या नोंदींमध्ये कृष्णवर्णीयांचे चित्र जणू माकडासारखे काढलेले असायचे. कॅमेऱ्याच्या यंत्रामुळे आम्ही कृष्णवर्णीयही माणसंच आहोत हे तरी त्यांना मानावेच लागेल, असे डग्लस म्हणायचे.
कृष्णवर्णीयांनी स्वतःची अधिकाधिक छायाचित्रे काढावी, असा आग्रह ते धरायचे. पण त्यानंतर दोनेकशे वर्षातच यांत्रिक बुद्धीने कृष्णवर्णीय आल्सिनेला कसे माकड ठरवले याचा उल्लेख मागील लेखात होता. डग्लस आफ्रिकन अमेरिकन. जॉय मूळ घानाची. टिमनिट इथिओपियाची. तिच्यासारखेच काम करणारी रेडिट अबेबेही तिथलीच. सारे कृष्णवर्णीय. पण डग्लसप्रमाणे या तिघींनीही उपलब्ध विदेमागील मर्कटबुद्धी दूर करण्याचे चिकाटीने प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांतून आज विदाबुद्धीच्या क्षेत्रात एक नवी ब्लॅक मुव्हमेंट उभी राहत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.