व्हॉट्सअप, फेसबुकवर उसळणारी फेक न्यूजची लाट रोखायची कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 11:15 PM2020-07-23T23:15:16+5:302020-07-23T23:15:22+5:30

कुरुक्षेत्रावरील युद्धात द्रोणाचार्यांचा पाडाव पांडवांच्या सेनेला अशक्य दिसत असताना कृष्णनीती कामी आली.

Black policy of rumors | व्हॉट्सअप, फेसबुकवर उसळणारी फेक न्यूजची लाट रोखायची कशी?

व्हॉट्सअप, फेसबुकवर उसळणारी फेक न्यूजची लाट रोखायची कशी?

Next

फेसबुक फेक न्यूज रोखण्याकरिता आपल्यापरीने काही फिल्टर लावते. काही शब्द, छायाचित्रे यांचा वापर केल्यास तो मजकूर अपलोड होणार नाही किंवा फारच मर्यादित लोकांपर्यंत पोहोचेल, असा प्रयत्न करते. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर केले जाणारे हे प्रयत्न फारच तोकडे पडतात.

..................

कुरुक्षेत्रावरील युद्धात द्रोणाचार्यांचा पाडाव पांडवांच्या सेनेला अशक्य दिसत असताना कृष्णनीती कामी आली. रणांगणावरील अश्वत्थामा हत्ती भीमाने ठार करताच अश्वत्थामा मरण पावल्याची आरोळी ठोकली. ती द्रोणाचार्यांच्या कानी जाताच खातरजमा करण्याकरिता ते सत्यवचनी युधिष्ठिराकडे गेले. त्याने अश्वत्थामा मेला हे सांगितले, पण द्रोणाचार्यांचा पुत्र की हत्ती, हे सांगण्यापूर्वीच कृष्णाने जोरजोरात शंखनाद सुरूकेल्याने युधिष्ठिराचे शब्द द्रोणाचार्यांच्या कानी पडले नाहीत.

पुत्रवियोगाने त्यांनी शस्त्र खाली ठेवताच त्यांचा शिरच्छेद केला गेला. ‘महाभारत’मधील ही कथा आठवली. कारण, फेक न्यूज अर्थात अफवा पसरविण्यात व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकने आघाडी घेतली आहे. कोरोनाच्या काळात अफवा पसरविण्याबाबत ५५२ गुन्हे दाखल झाले आहेत. यात बीड जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सोशल मीडियामुळे अफवा क्षणार्धांत जगभरात पोहोचविण्याचा कुटिल हेतू साध्य होत आहे. परंतु, १९९५ मध्ये जेव्हा सोशल मीडिया भारतात अस्तित्वात नव्हता, तेव्हा ‘गणपती दूध पितो’ ही अफवा काही तासांत देश-विदेशात पोहोचली होती, त्यामुळे अफवा पसरविण्याचे एक तंत्र असून, ते महाभारत काळात जसे अमलात आणले गेले, तसेच ते सोशल मीडिया नव्हता तेव्हाही अमलात आणले गेले.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर वगैरेंनी अफवांचा वेग प्रचंड वाढविला आहे. देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सर्वप्रथम सोशल मीडियाचा खऱ्या-खोट्या बातम्या प्रसृत करण्याकरिता पुरेपूर वापर केला. गुजरातमधील विकासाच्या, उद्योगस्नेही वातावरणाच्या कहाण्या सोशल मीडियाने लोकांपर्यंत पोहोचविल्या. पुढच्या टप्प्यात मूर्तिभंजन करून आपले नेतृत्व सरस असल्याचे दाखविण्याची अहमहमिका सुरूझाली. पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्या तथाकथित चुकांचे दाखले दिले गेले. आता हे तंत्र सर्वच पक्षांनी अवलंबले आहे. तंत्रज्ञानस्नेही तरुणांचा चमू हाताशी धरून विरोधी पक्षाच्या नेत्यांना ट्रोल करणे, त्यांच्याबाबत फेक न्यूज पसरविणे, छायाचित्र-व्हिडिओ यांचे मॉर्फिंग करून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करणाºया फौजा राजकीय पक्ष व नेत्यांनी पोसल्या आहेत.

सोशल मीडिया नसताना एका निवडणुकीच्या तोंडावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केलेल्या एका नेत्याचा काळ्या गॉगलमुळे पसरलेल्या अफवांमुळे पराभव झाला होता. एक व्यक्ती एकापेक्षा अनेक जी-मेल, फेसबुक अकाउंट सुरू करू शकत असल्याने सोशल मीडियावरील अफवांच्या या अ‍ॅनाकोंडाचे तोंड कुठे व शेपूट कुठे हे शोधून काढणे बऱ्याचदा कठीण होते. एखाद्याने तक्रार केली तरच त्याची दखल घेतली जाते, अन्यथा अनेक सर्वसामान्य व्यक्ती ट्रोलिंग अथवा बदनामीच्या शिकार होतात. अनेक राजकीय नेते, उद्योगपती, अभिनेते यांचे कोटी-कोटी फॉलोअर्स असलेले फेसबुक ग्रुप तयार झाले आहेत. रतन टाटा, सुधा मूर्ती यांसारख्या मान्यवरांच्या ग्रुपवरून अनेक उद्बोधक माहिती लोकांना मिळते. मात्र, राजकीय नेत्यांचे समर्थक आपला नेता कसा सरस आहे, हे दाखविण्याकरिता फेक न्यूजचा सर्रास आधार घेत आहेत. सोशल मीडियावरील हा अफवाबाजार रोखण्याकरिता प्रत्येक व्यक्तीच्या पॅनकार्ड, आधारकार्ड अथवा पासपोर्ट नंबरशी त्याचे सोशल मीडिया अकाउंट लिंक करण्यामुळे एकच व्यक्ती भारंभार अकाउंट सुरू करून अफवा पसरविणार नाही किंवा बदनामी करणार नाही, असा पर्याय शोधला तर काहीअंशी यश मिळेल असे वाटते. मात्र, देशात ज्यांनी पॅनकार्ड, आधारकार्ड काढले आहे; पण त्यांचे फेसबुक, टिष्ट्वटर अकाउंट नाही अशा व्यक्तींच्या नावे अकाउंट सुरू करून अफवा पसरविल्या जातील, अशीही भीती आहे.

ध्याच्या शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत सोशल मीडियाचा जबाबदारीने कसा वापर करावा, त्यामधील धोके, सायबर कायदा याचा समावेश नाही. त्यामुळे अनेकांना आपण सहज जो मजकूर अथवा व्हिडिओ पुढे पाठवितो आहोत, त्याच्या परिणामांची कल्पना नसते. ‘फाईव्ह-जी’च्या आगमनाची चाहूल लागल्याने अनेकजण हरखून गेले आहेत; पण त्याचा सकारात्मक वापर आपण कसा करणार, याचा आराखडा उपलब्ध नाही. त्यामुळेच ‘कृष्णनीती’करिता काहींना रान मोकळे आहे.

Web Title: Black policy of rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.