हिंसाचार, दहशतवादाची ही वृत्ती संपवायला हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:43 AM2019-04-23T04:43:02+5:302019-04-23T04:43:11+5:30
श्रीलंकेतील हल्ल्याचे स्वरूप राजकीय नसून धार्मिक असावे, असे दिसते. साऱ्या जगातच धर्मांधांच्या कडव्या संघटनांनी आता डोके वर काढले आहे. अमेरिका आणि फ्रान्ससारख्या प्रगत देशांसोबत भारतातही धर्मांधांच्या संघटना हिंसेवर उतरलेल्या दिसल्या आहेत.
ईस्टर संडे हा ख्रिस्ती सणाचा मुहूर्त साधून श्रीलंकेतील ख्रिस्ती धर्मस्थळे व पंचतारांकित हॉटेलांवर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ले करून २९० निरपराध माणसांचा बळी घेतला आणि त्यात ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या नृशंस हत्याकांडाचा साऱ्या जगाने एकत्र येऊन निषेध केला पाहिजे आणि त्या छोट्याशा देशाला सर्वतोपरी साहाय्य करायला एकत्र आले पाहिजे. हा हल्ला नेमका कुणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तालिबान व अफगाणिस्तानातील दहशतखोरांशी त्याचा संबंध जोडता यावा, असे पुरावे हाती आले आहेत. हा हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना श्रीलंकेच्या सरकारला होती व तसा इशारा त्या देशाचे पोलीसप्रमुख पुजुथ जयसुंदरा यांनी साऱ्यांना देऊन ठेवली होती. त्याआधी काही काळ अगोदरच तेथे झालेल्या अशा दहशती हल्ल्यात २२ जण मरण पावले होते.
वरवर पाहता या हल्ल्याचे स्वरूप राजकीय नसून धार्मिक असावे, असे दिसते. साऱ्या जगातच धर्मांधांच्या कडव्या संघटनांनी आता डोके वर काढले आहे. दक्षिण मध्य आशियाचा सारा प्रदेश त्यांनी उद्ध्वस्त केला आहे. अमेरिका व फ्रान्ससारख्या प्रगत देशांसोबत भारतातही धर्मांधांच्या संघटना हिंसेवर उतरलेल्या एवढ्यातच दिसल्या आहेत. धर्मांधांना शत्रू व मित्र किंवा अपराधी वा निरपराधी यांच्यातील फरक कळत नाही. जो समोर येईल व दिसेल त्यास मारणे हा त्यांचा दुष्ट प्रकार आहे. ख्रिश्चन व मुसलमान या धर्मांतील भांडण सातव्या शतकात सुरू झाले ते १४ व्या शतकात इस्तंबुलच्या तहाने थांबले. त्या तहातच त्यांनी आपापले धार्मिक क्षेत्र वाटून घेतले. वास्तविक ते युद्ध तेथेच थांबून शांत व्हायला हवे होते. परंतु त्याची शिल्लक वैरे अजूनही तशीच आहेत आणि ती पुन: एकवार धर्मांध वातावरणाचा फायदा घेऊन हिंसाचारावर उतरली आहेत असे वाटावयास लावणारे हे चित्र आहे.
श्रीलंका हा चिमुकला देश आहे, त्याची कुणाला भीती वाटावी असे नाही. तरीदेखील ख्रिश्चनांवर असे हल्ले होतात तेव्हा त्याचे स्वरूप धार्मिकच असते. भारतातही उत्तर प्रदेशात किंवा गुजरातमध्ये झालेल्या दंगली अशाच धार्मिक होत्या, राजकीय नव्हत्या. त्या दंगलींमध्ये मग राजकारण उभे होणे ही गोष्ट वेगळी. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमागेही धार्मिक कारणे असल्याचे संदर्भ त्या त्या वेळी सापडले होते. धर्म जेव्हा क्रूर होतो तेव्हा त्याच्या हिंस्रपणाला मर्यादा राहत नाही. ती बेछूट माणसे मग नि:शस्त्रांना मारत किंवा बॉम्बस्फोटांनी नष्ट करत निघतात. ही माणसे संघटित नसतात. त्यांचा कुणीएक नेता नसतो. त्यातला प्रत्येकच जण धर्मांधाने वेडा झाला असतो.
कसाबचे हेमंत करकरे यांच्याशी कोणते वैर होते? आणि त्या प्रज्ञा ठाकूरचा करकरे यांच्याशी राग तरी कोणता आहे? धर्मवेडाने पिसाळलेल्या माणसांना कृती आणि वाचा यांची शुद्ध नसते. त्यामुळे अशा माणसांचा बंदोबस्त त्यांच्या प्रवृत्तींना आळा घालूनच करावा लागतो. दुर्दैवाने आताचे वातावरण त्याच दुष्ट प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारे आहे. अशी धर्माच्या आधारे विचार करणारी माणसे प्रसंगी त्या संदर्भातील न्यायालयांच्या निर्णयाविरुद्धही जातात, हे आपण केरळमध्ये पाहिले आहे. धर्माचा राजकारणात वापर आणि राजकारणासाठी धर्मश्रद्धांचा वापर हे सध्याच्या जगाचे चित्र आहे. हे चित्र कुणालाही सुरक्षित राहूू देणारे नाही. कारण यातील गुन्हेगारांचा कायद्यावर विश्वास नसतो. उलट कायदा हीच बाब त्यांना धर्मविरोधी वाटत असते. अशा धर्मांध वृत्तीने पेटलेल्या माणसांत स्त्रियाही असतात.
जात, वर्ण, धर्म या गोष्टी नुसत्या माणसांना संरक्षणच देत नाहीत, त्यांचे स्वरूप एकदा कडवे झाले की त्या हिंस्र होतात. धर्मसत्ता अनेकदा राजसत्तेला वेठीला धरण्याचा प्रयत्न करतात, पण एखादी राजसत्ता जेव्हा धर्मसत्तेवर अंकुश ठेवू पाहते, तेव्हा त्यातून उफाळणारा संघर्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, हेही जगाने पाहिले आहे. श्रीलंकेतील हिंसाचाराने जगाला पुन्हा या गोष्टींचे दुसरे रूपच दाखविले आहे. ही वृत्ती संपविणे व नाहीशी करणे हाच आता जागतिक सुरक्षेचा मार्ग बनला आहे. जगातील अनेक देशांनी त्याचा धडा घेतला आहे. श्रीलंकेतील हत्याकांड हा त्याचाच पुढला भाग आहे.