भारताच्या प्राचीन व्यापार उदीमाला उजाळा
By admin | Published: July 1, 2015 03:43 AM2015-07-01T03:43:09+5:302015-07-01T03:43:37+5:30
बांगलादेशसोबत नुकताच झालेला करार ऐतिहासिक म्हणावा लागेल. या करारामुळे अनेक वादांचे निरसन झाले. त्यापैकी सीमावादासारखे काही वाद तर काश्मीरइतके जुने आहेत.
- गुरुचरण दास
(विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत)
बांगलादेशसोबत नुकताच झालेला करार ऐतिहासिक म्हणावा लागेल. या करारामुळे अनेक वादांचे निरसन झाले. त्यापैकी सीमावादासारखे काही वाद तर काश्मीरइतके जुने आहेत. या करारामुळे बांगलादेश हे कॉमन मार्केटचा भाग बनले आहे. नरेंद्र मोदींच्या अथक मुत्सद्देगिरीचा उद्देश व्यापार वा गुंतवणूक वाढावी हा आहे. सत्तेवर आल्यापासून आपल्या शेजारी राष्ट्रांच्या गरजा ओळखून कृती केलेल्याला फळ मिळाले आहे. हे करार अनेक वर्षांपासून तयार करण्यात येत होते. पण त्याचे श्रेय इतिहासाकडून मोदींनाच दिले जाईल. सत्ता ही वाडगाभर तांदळापासून मिळत असते, बंदुकीपासून नव्हे, असे माओचे मत होते. पण याबाबतीत मोदी मात्र भारताच्या प्राचीन परंपरांचे अनुसरण करीत आहेत. या परंपरांनी एकेकाळी भारताला फार मोठे व्यापारी राष्ट्र बनविले होते.
मोदींच्या दौऱ्यात झालेला सीमा करार हा त्यांचा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. अर्थात इतर करारही तितकेच महत्त्वाचे होते. आज भारताचा माल सिंगापूरमार्गे बांगलादेशला पोचायला तीन आठवडे लागतात. या करारामुळे भारताचा माल सरळ बांगला देशच्या बंदरात उतरविता येईल. भारतीय कंपन्या बांगलादेशाला वीज विकू शकतील. तसेच बांगला देशमधील विशेष आर्थिक क्षेत्रात भारतीय वस्तूंचे उत्पादन करता येईल. त्यामुळे बांगलादेशमध्ये रोजगारात वाढ होईल. तसेच बांगलादेशची व्यापारी तूट कमी होईल. बांगलादेशला २०० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्यात येईल आणि त्याच्या बदल्यात भारतातून माल निर्यात केला जाईल. त्यामुळे भारतात हजारो रोजगार निर्माण होतील. या करारांमुळे नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान या राष्ट्रांना योग्य इशारा मिळाला आहे. तो म्हणजे संशयाच्या राजकारणाकडून समृद्धीकडे वाटचाल करण्याचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या करारांमुळे भारताच्या प्राचीन व्यापारी वारशाला उजाळा मिळाला आहे.
भारताला पाच हजार मैल लांबीचा किनारा लाभला आहे, ज्यामुळे पूर्वीच्या काळी भारताशी अन्य राष्ट्रांचा व्यापार होत होता. त्याकाळी हा व्यापार एकूण व्यापाराच्या २५ टक्क्यांएवढा होता. तसेच सकारात्मक स्वरूपाचा होता. दोन हजार वर्षापूर्वी केरळच्या म्युझिरिस येथील बंदरात तुम्ही उभे असता तर तुम्हाला सोने लागलेली जहाजे येताना दिसली असती. दर दिवशी रोमन साम्राज्याकडून सोने भरलेले जहाज यायचे आणि परत जाताना भारतीय कापूस, मसाल्याचे पदार्थ आणि अन्य वस्तू घेऊन जायचे. रोमन लोकांनी काय विकत घेतले याची भारतीयांना चिंता वाटत नव्हती, ते सोने व चांदी देऊन माल नेत एवढेच ठाऊक होते. रोम साम्राज्यांचा दोन तृतीयांश पैसा भारतीय वस्तू विकत घेण्यावर खर्च होत होता. एका दाक्षिणात्य राजाने तर रोमला आपला राजदूत पाठवून साम्राज्याकडून घेणे वसूल केले होते! (म्युझिरिस हे शहर चौदाव्या शतकात आलेल्या पेरियार पुरामुळे वाहून गेले. त्याची जागा आधुनिक कोची बंदराने घेतली आहे.)
१५०० वर्षानंतर पोर्तुगीज तशाच तक्रारी करू लागले होते. दक्षिण अमेरिकेकडून मिळणारे सोने व चांदी त्यांना भारताशी व्यापार करताना द्यावी लागत होती. या प्रकाराचा उल्लेख ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सतराव्या शतकात करण्यात आला. कारण त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने परवडणारे कापड भारतातून आयात केले होते. भारताचे कापड आणि मसाले यामुळे जगातील लोकांच्या चवीत बदल झाला. तसेच कापड वापरण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडून आले. रोमन लोकांचे पायघोळ कपडे भारतीय कापडापासून तयार करण्यात येत होते. पंजाबी आणि खत्री लोकांनी उंटावर वस्तू लादून हिमालयामार्गे रशिया आणि पर्शियापर्यंत १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत नेऊन तेथील लोकांच्या जीवन पद्धतीत बदल घडवून आणले. एका फ्रेंच धर्मगुरूने इराणच्या सफाविद राजवटीची तुलना दोन दरवाजे असलेल्या कॅराव्हानशी केली. एका दरवाजातून सोने व चांदी येत होती व दुसऱ्या दरवाजातून ती भारताकडे जात होती. जणू जगातला सारा पैसा भारतात रिचविण्यात येत होता!
भारताचे सोन्याविषयीचे आकर्षण अजूनही कायमच आहे. एकोणीसाव्या शतकातील क्रांती घडून येईपर्यंत सोने हे भारतात व्यापाराची भरपाई करण्यासाठी येतच होते. पण औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये परिवर्तन घडून आले. लँकेशायरकडून येणाऱ्या कापडामुळे भारतातील हातमाग कापड निरर्थक ठरू लागले. हातमाग कापड नाहिसे झाले. त्याचा परिणाम भारताच्या विणकरांना भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर आपण आपला व्यापार करण्याचा भूतकाळ विसरून गेलो. आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणाऱ्या फायद्यावर आपण तुळशीपत्र ठेवले. १९९१ साली सर्वप्रथम आपल्यात जागृती निर्माण झाली. आज मोदी त्या भूतकाळाकडे जाऊ इच्छितात. पण रा.स्व. संघाच्या स्वदेशी जागरण मंचतर्फे त्यांच्या मार्गात अडचण निर्माण केली जात आहे.
भारताची सत्ता ही सदैव मुलायम राहिली आहे. भारताने लष्करी आक्रमण केले नाही. पण वस्तू निर्माण करून जग जिंकले. संस्कृतचे पंडित शेल्डन पोलाक यांच्या मते चौथ्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत भारताचा प्रभाव दक्षिणपूर्व आणि मध्य आशियात पसरला होता. संस्कृत ही न्यायालयाची, व्यवहाराची व साहित्याची भाषा झाली होती, जशी लॅटीन भाषा ही मध्ययुगीन युरोपची भाषा झाली होती. भारतीय संस्कृती ही व्यापाराच्या मार्गानेच बहुधा पसरली असावी. व्यापारी लोक सोन्याच्या शोधात जावा बेटापर्यंत जात असल्याचे उल्लेख तामीळ साहित्यात आढळतात. हे व्यापारी आपल्या जहाजात धार्मिक विधी करण्यासाठी ब्राह्मणांना व बौद्ध भिक्षूंना सोबत नेत असत. मायकेल बूड हा इतिहासकार लिहितो, ‘‘जगातील साम्राज्ये तलवारीच्या जोरावर राज्य करीत. पण भारताने अध्यात्माच्या बळावर जगावर राज्य गाजविले.’’
भारतीय स्वातंत्र्यानंतर आपले शेजारी आपला दु:स्वास करू लागले आहेत. त्यांना आपल्याविषयी संशय वाटतो. पण मोदींचा विचार वेगळा आहे. त्यांनी आपल्या आर्थिक मुत्सद्देगिरीने बांगलादेशला जिंकून घेतले. त्यांनी नव्या शक्यतांचे दरवाजे खुले केले आहेत. त्यांनी हीच गोष्ट आणखी पुढे नेली तर भारताचे शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध बदलतील. आणि सातव्या शतकात एका झुआनझँग नावाच्या चिनी प्रवाशाने म्हटले होते, ‘दूरदूरच्या देशातील भिन्न प्रथा असलेले लोक भारत हे राष्ट्र म्हणून स्वीकारतात’ तसे भारतात दिसू लागेल!