उपहासाचा रक्तरंजित उपहास
By admin | Published: January 8, 2015 11:29 PM2015-01-08T23:29:30+5:302015-01-08T23:29:30+5:30
फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे बुधवारी भरदिवसा जो काही थरारक, जीवघेणा आणि रक्तरंजित प्रकार घडला, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही आणि केलेलेही नाही.
फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे बुधवारी भरदिवसा जो काही थरारक, जीवघेणा आणि रक्तरंजित प्रकार घडला, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही आणि केलेलेही नाही. विशेषत: या अतिभयानक प्रकारामागे असलेले तीन युवक धर्माने मुस्लिम असले आणि प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेबांचा केला जाणारा उपहास सहन न झाल्यानेच त्यांनी दहा पत्रकार-व्यंगचित्रकार आणि दोन पोलिसांची हत्त्या केली असली तरी इस्लामी राष्ट्रांनी आणि विविध इस्लामी संघटनांनीदेखील या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करुन खेदही व्यक्त केला आहे. पॅरीसमधून प्रसिद्ध होणारे चार्ली हेब्दो नावाचे साप्ताहिक प्रथमपासूनच व्यंगात्मक आणि उपहासात्मक रेखाचित्रे आणि मजकूर यासाठी ओळखले जाते. हे व्यंग आणि उपहास बव्हंशी विविध धर्मांसंबंधीच असतो, हेही येथे लक्षात घ्यावयाचे. दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकाने अलीकडेच एक ट्विट करुन ईसीसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याचे एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यात ‘अजून फ्रान्सवर अतिरेकी हल्ला झाला नाही’, असे म्हणून बगदादीचे व्यंगचित्र काढताना त्याच्या तोंडी, ‘जरा थांबा; अजून जानेवारी संपायचा आहे व तोवर नववर्षाची भेट द्यायला वेळ आहे’, असे वाक्य टाकले होते. त्यामुळे बुधवारचा हल्ला ईसीसच्या चाहत्यांनी वा सहप्रवाशांनी केला असावा, असा तर्क निघू शकतो. या हल्ल्याची जबाबदारी अखेर ईसीसने स्वीकारली असून तिच्या एका पाठीराख्याने ट्विट करताना, प्रेषितांच्या केल्या गेलेल्या उपहासाचा हा बदला असल्याचे म्हटले आहे. सदर साप्ताहिकावर याआधीही काही अतिरेकी हल्ले झालेच होते. बुधवारच्या हल्ल्यात जे तिघेजण सहभागी झाल्याचे फ्रान्सच्या पोलिसांनी अधिकृतरीत्या जाहीर केले आहे, त्यातील सर्वात तरुण म्हणजे जेमतेम अठरा-एकोणीस वर्षांचा हमीयाद मौराद पोलिसांना शरण गेला आहे. उरलेले दोघे भाऊ असून त्यातील एकाला यापूर्वी घातपाती कारवायांच्या आरोपाखाली अठरा महिन्यांची शिक्षादेखील झाली होती. चेरीफ कौची नावाचा हा मारेकरी इराकमध्ये जाऊन अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पोलिसांनी जेरबंद केले होते. तो आणि त्याचा भाऊ सैय्यद यांचा शोध जारी असून संपूर्ण फ्रान्समध्ये अति दक्षतेचा इशारा सरकारने दिला आहे. यावरुन एक ढोबळ निष्कर्ष असा निघू शकतो की, आज जगातले कोणतेही राष्ट्र सुरक्षित नाही आणि सुरक्षिततेचा आणि भौतिक प्रगतीचा काहीही संबंध नाही. त्याचबरोबर आधी झालेली दळणवळण क्रांती आणि पाठोपाठची माध्यम क्रांती यामुळे आता जग खूप जवळ आले आहे, लोक परस्परांना समजू लागले आहेत आणि समजूतदार व सह्ष्णिु होत चालले आहेत, असे जे काही सांगितले आणि मांडले जाते, त्यामधील वैय्यर्थ्यही अशा घटना घडून गेल्यानंतर लक्षात येते. ज्याने अद्याप विशीदेखील ओलांडलेली नाही, असा कोवळ्या वयातील एक युवक सहजासहजी मनुष्यहानी करण्यास उद्युक्त होतो, हेदेखील जेव्हां दिसून येते, तेव्हां त्याच्या मनावर कोणते आणि कसे संस्कार केले गेले असतील याचाही अंदाज येतो. तीन इस्लामी अतिरेक्यांनी केलेला बुधवारचा हल्ला म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचेही या संदर्भात म्हटले गेले आहे. एका साप्ताहिकाच्या कचेरीवर आणि तेदेखील या साप्ताहिकाच्या दैनंदिन आणि साप्ताहिक कामकाजाची नीट माहिती करुन घेऊन पूर्वनियोजनाने केलेला हल्ला म्हणून त्याअर्थी हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील हल्ला ठरु शकतो. पण ते केवळ तितकेच. आज संपूर्ण जगभर विविध क्षेत्रातील लोकांकरवी जी मांडणी केली जाते, तिचा मथितार्थ एकच व तो म्हणजे इस्लाम धर्मीय सहिष्णु नसतात. हे जर खरे असेल वा असते, तर भारतात एम.एफ.हुसेन यांच्यपासून आमीर खान यांच्यापर्यंत ज्यांना ज्यांना अतिरेकी कारवायांचा वा वृत्तींचा सामना करावा लागला, त्या कारवाया आणि वृत्ती परमसहिष्णु वर्गात मोडणाऱ्या म्हणायच्या काय? त्यामुळे अशी माडंणीच मुळात अतार्किक आणि विनाधार. तरीही घटकाभर ते खरे आहे असे मानले, तर मग ज्यायोगे समोरची व्यक्ती चिडून आणि संतापून उठते व अंगावर धाऊन येते, याची कल्पना असूनदेखील पुन्ह:पुन्हा तेच करणे याला खोडसाळपणा नाही म्हणायचे, तर काय म्हणायचे. संपादकासह ज्या दहाजणांचा बुधवारच्या घटनेत दुर्दैवी मृत्यु झाला, ती घटना त्यांनी केलेल्या अपराधाच्या तुलनेत कैक पटींनी अधिक आणि पाशवी असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांमधून व्यक्त केली गेली आहे. तरीही या संपूर्ण प्रकरणात एक शंका जरुर उपस्थित केली जाऊ शकते. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले गेले, त्याला आज काही वर्षे उलटून गेली आहेत. पण जेव्हां तो प्रकार लक्षात आला तेव्हां भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये दंगली उसळल्या होत्या. ईसीस वा तिचा म्होरक्या यांना अद्याप बव्हंशी इस्लामी राष्ट्रांनीही मान्यता दिलेली नाही वा जवळ केलेले नाही. त्यामुळे त्याच्या व्यंगचित्राच्या आधारे हल्ला चढविला असे पसरले तर जगभरात त्याची प्रतिक्रिया उमटणार नाही. पण प्रेषितांचे नाव घेतले व त्यांच्या उपहासाचा बदला घेण्यासाठी हल्ला केला असे म्हटले तर त्याची सर्वदूर प्रतिक्रिया उमटू शकते, असा विचार तर हल्लेखोर वा त्यांच्या सूत्रधारांनी केला नसेल?