निळ्या लाटा- सागरी पर्यावरणाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 12:13 AM2020-12-10T00:13:12+5:302020-12-10T00:15:29+5:30

marine environment : सध्या अनेक समुद्रकिनाऱ्यांवर निळ्या लाटा दिसून येत आहेत. नॉकटील्युका सिंटीलांस किंवा ‘सी स्पार्कल’ या प्राण्यामुळे पाण्याचा रंग बदलला आहे.

Blue waves- a threat to the marine environment | निळ्या लाटा- सागरी पर्यावरणाला धोका

निळ्या लाटा- सागरी पर्यावरणाला धोका

googlenewsNext

- डॉ. स्वप्नजा मोहिते
(प्राध्यापक, मत्स्य महाविद्यालय ) 

समुद्रकिनाऱ्यांवर सध्या सगळ्याच ठिकाणी चकाकणाऱ्या निळ्या लाटा दिसताहेत. या लाटा पाहण्यासाठी पर्यटकांचीही तेथे गर्दी होत आहे. पण, नेमके कशामुळे झाले हे? का होते आहे? हे? समजून घेणेही महत्त्वाचे आहे. याचं नेमकं कारण आहे. नॉकटील्युका हा समुद्रातील प्राणी. त्यामुळे पाण्याचा रंग बदललेला दिसतो आहे.

नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने तो ओळखला जातो. सध्या समुद्रात दिसणाऱ्या निऑन लाईट्ससारख्या हिरव्या निळ्या प्रकाशाने तो चर्चेत आला  आहे. सी स्पार्कल म्हणूनही तो ओळखला जातो. सध्या जगभर या प्राण्यावर संशोधन केले जात आहे, ते त्याच्या थंडीमध्ये अचानक येणाऱ्या विंटर ब्लूम्स मुळे! उत्तर अरेबियन समुद्र ते अरेबियन पेनिन्सुलादरम्यान हे प्राणी मोठ्या प्रमाणात सध्या दिसत आहेत. एरव्ही दिवसा लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येत आहे आणि दिवसा पाण्यावर हिरवट शेवाळासारखा थर दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे या प्राण्याने आपल्या शरीरात पेडीमोनाज नॉकटील्युके या शैवालवर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे तो हिरवट दिसतो आणि त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्नही प्राप्त करू शकतो. प्लवंग त्यातही खास करून डायटम्स, डायनोफ्लॅजेलेट्स, माशांची व इतर जलचरांची  सूक्ष्म अंडी, जिवाणू  यावर उपजीविका करणारा हा प्राणी, म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही जगू शकतो. त्यांचे खाद्य जेथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध  असेल तिथे यांचे प्रमाणही वाढते. त्यात मोठ्या  प्रमाणात साठणाऱ्या अमोनियामुळे  जेलीफिश सोडल्यास इतर कोणी त्याला खात नाहीत.  

हा अमोनिया इतर जलचरांना घटक ठरू शकतो. किनाऱ्याकडे  सूक्ष्म खाद्याची उपलब्धता आणि वातावरण असल्याने नॉकटील्युकाचे थवे किनाऱ्याकडे सरकतात. या ब्लूम्समुळे समुद्रातील डायटम्सच्या प्रमाणात मात्र लक्षणीय घाट झाली आहे.  हे खूप चिंतेचे आहे. कारण, डायटम्स हे वनस्पती  प्लवंग समुद्रातील प्राथमिक उत्पादक आहेत आणि समुद्रातील जैव साखळीही या प्लवंगावर अवलंबून असते.  

बायोएल्यूमिनन्स /जैविक प्रकाश कसा  तयार  होतो?
नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव आपल्या शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो.  खळबळणाऱ्या, उसळणाऱ्या  लाटांमुळे हे प्राणी उद्दीपित होतात आणि या निळसर प्रकाशाने चमकू लागतात. या ०.२ ते २ मिमी व्यासाच्या  एकपेशीय प्राण्याच्या शरीरात असणाऱ्या ल्युसिफेरीन हे प्रथिन आणि ल्युसिफेरेज  हे एन्झाईम (विकर) यांच्यातील रासायनिक क्रियेमुळे जैविक प्रकाशाची निर्मिती होते. यासाठी या पेशी उद्दीपित होणे गरजेचे असते.  खळबळत्या लाटा या पेशी उद्दीपित करतात. त्यामुळे फ्लॅश लाईटसारखा चमकणारा प्रकाश आपल्याला लाटांच्या किनाऱ्यावर दिसू शकतो. म्हणूनच त्याला स्थानिक भाषेत ‘‘जर’’ ही म्हटले जाते.  समुद्राच्या पाण्यावर  नॉकटील्युका किंवा इतर जैविक प्रकाश निर्माण करणाऱ्या जलचरांच्या निळ्या प्रकाशाला ‘‘मारेल’’ (mareel) ही म्हटले जाते. भारतात जुलै २०१५ मध्ये केरळमधील अलेप्पी येथे हा प्रकार प्रथम नोंदला गेला.  गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने तसेच केरळच्या मत्स्य व्यवसाय खात्याने यावर अभ्यास केला आणि या ब्लूम्स नॉकटील्युकाच्या असल्याचे समोर आले. 

अचानक या प्राण्याच्या संख्येत अशी प्रचंड  वाढ का झाली असावी हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये २ कारणांचा  उल्लेख करावा लागेल. त्यात समुद्राच्या पाण्यात कमी झालेला ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे वाढलेले प्रमाण,  हिमालयन तिबेटीयन पठारावरील  ग्लेशियर्सचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर झालेला परिणाम ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. समुद्रातील वाढते प्रदूषण, त्याच्या कुजण्याची तयार होणारी ऑक्सिजन विरहित डेड झोन्स हे एक प्रकारे नॉकटील्युकाच्या वाढीस मदतच करतात. म्हणूनच यावर संशोधन करण्याची गरज आहे.  याच्या सुंदर निळसर प्रकाशात चमकणाऱ्या समुद्राच्या लाटा आपल्याला आकर्षित करतात पण या सौंदर्यामागील कारणांवर विचार करणे महत्वाचे ठरेल.  
 

Web Title: Blue waves- a threat to the marine environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.