श्रीलंकेतील बॉम्बस्फोट, इसिस व भारतासमोरील आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 08:38 PM2019-04-27T20:38:51+5:302019-04-27T20:40:38+5:30

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमधील हल्ल्याचा सूड श्रीलंकेत का, या प्रश्नाचे उत्तर इसिसच्या कार्यपद्धतीत सापडते. ओसामा बिन लादेनची अल कायदा व इसिस यांच्या कार्यपद्धतीतही फरक आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यानंतर, भारतानेही सावध राहिले पाहिजे.

bomb blast of shri lanka, isis and challenges before india | श्रीलंकेतील बॉम्बस्फोट, इसिस व भारतासमोरील आव्हान

श्रीलंकेतील बॉम्बस्फोट, इसिस व भारतासमोरील आव्हान

Next

- प्रशांत दीक्षित 

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट ही जगासाठी धक्कादायक घटना होती. ख्रिश्चन नागरिक हे श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाचे मुख्य लक्ष्य होते. काटेकोर नियोजन करून हे स्फोट करण्यात आले. दहशतवाद्यांची प्रभावी यंत्रणा त्यामागे काम करीत होती.

इसिसने या स्फोटांची जबाबदारी उचलली आहे. ख्रिश्चनांना धडा शिकविण्यासाठी स्फोट करण्यात आले, असे इसिसने म्हटले आहे.  गेल्या महिन्यांत
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे मशिदीवर हल्ला करण्यात आला. त्यात अनेक मुस्लिम मारले गेले. हा हल्ला होत असतानाची दृश्ये फेसबुकवरून जगाला दिसली. ख्राईस्टचर्च येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येईल असे इसिसने त्याचवेळी जाहीर केले होते.

ख्राईस्टचर्चच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर श्रीलंकेत कसे, न्यूझीलंडमध्येच प्रतिहल्ला का झाला नाही, असा प्रश्न पडेल. याचे उत्तर इसिसच्या कार्यपद्धतीत आहे. इस्लामी धर्मनिष्ठा आणि अन्य धर्म अशा दोन भागांत इसिसने जगाची विभागणी करून टाकली आहे. त्याचबरोबर सिरीया व इराकचा काही भाग हे मुख्य केंद्र आणि अन्य जग हा परिघ, अशी ही विभागणी केलेली आहे. जगाची अशी दोन भागांत विभागणी झाल्यावर इसिस असे मानते की, एका ठिकाणी हल्ला झाला तर त्याचे प्रत्युत्तर अन्य कोठेही देणे हे इसिसशी निष्ठावंत असणाऱ्यांचे कर्तव्य आहे. श्रीलंकेतील इसिसच्या निष्ठावंतांनी ते कर्तव्य बजावले. त्याचबरोबर सिरीया व इराकमधील इसिसच्या मुख्य केंद्रांवर हल्ले झाले, तर तेथे माघार घेऊन जगात अन्यत्र, प्रतिपक्षावर हल्ले करायचे, असे इसिसचे तंत्र आहे.

सध्या सिरीया व इराकमधील मोठ्या प्रदेशातून इसिसची हकालपट्टी अमेरिका व अन्य देशांतील सैन्याने केली आहे. इसिसचे सरकार आता प्रभावी राहिलेले नाही. मुख्य सरकार प्रभावी नसले, तरी इसिसच्या निष्ठावंतांचे वर्तुळ फार मोठे आहे व ते जगभर पसरलेले आहे. केंद्र दुर्बळ झाले तर या जगभर पसरलेल्या निष्ठावंतांनी प्रतिपक्षावर हल्ले करावे, असा इसिसचा आदेश असतो. जगात कुठेही किंवा प्रत्येक ठिकाणी (anywhere  and everywhere ) आम्ही त्या धर्मावर (ख्रिश्चन) सूड घेऊ, अशी घोषणा अबू हसन अल मुहाजीर या इसिसच्या प्रवकत्याने ख्राईस्टचर्चवरील हल्ल्यानंतर केली होती. श्रीलंकेतील इसिसच्या निष्ठावंतांनी ती पार पाडली. श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आत्मघातकी पथकाचा एक जुना व्हिडिओ ‘अमाक’ या वृत्तसंस्थेने प्रदर्शित केला. अमाक ही इसिसची वृत्तवाहिनी आहे. अबू बक्र अल बगदादी या इसिसच्या प्रमुखाप्रती या पथकातील सदस्य निष्ठा समर्पित करीत असल्याचे त्या व्हिडिओत दाखविले आहे. इसिसच्या अन्य एका वेबसाईटवर इसिसच्या झेंड्याखाली हे आत्मघातकी अतिरेकी दिसतात.

जगात कुठेही सूड घेतला तरी चालेल, असे इसिसचे धोरण आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सिरीया व इराकचा काही भाग हा इसिसचा केंद्रबिंदू आहे. दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने तेथे इसिसचा पराभव केला. इसिसची तेथील खिलाफत कमकुवत झाल्यानंतर, अन्य देशातील कारवायांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय इसिसने घेतला. इसिसच्या मीडियातून हे जाहीरही करण्यात आले. इसिसच्या परदेशातील कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या शाखेला इम्नी म्हटले जाते. हा अरेबिक शब्द आहे. इम्नीच्या मार्फत २०१५-१६ मध्ये अनेक प्रशिक्षित अतिरेकी युरोपमध्ये धाडण्यात आले. या अतिरेक्यांना लपून राहण्यासाठी मदत करणाऱ्या आस्थेवाईक लोकांची यंत्रणाही उभारण्यात आली. नोव्हेंबर २०१५ मधील पॅरीस येथील हल्ला व मार्च २०१६ मधील ब्रुसेल्स येथील हल्ला हे इम्नीच्या कामाचे यश असे इसिस मानते.

ओसामा बिन लादेन याची अल कायदा ही दहशतवादी संघटना व इसिस यांच्यात महत्त्वाचा फरक या दृष्टिकोनात आहे. ओसामा बिन लादेनचे हल्ले हे
शत्रू कोण, हे निश्चित करून होते. हा शत्रू मुख्यत: अमेरिका किंवा हल्ला होणाऱ्या देशातील सरकार हा होता. अमेरिकेवरील हल्ला हा अमेरिकेलाच
धडा शिकविण्यासाठी होता. इसिसचे तसे नाही. अन्य धर्मीयांवर हल्ले करून सूड घ्या इतकाच इसिसचा आदेश असतो. मग ते हल्ले कोठेही होवोत. एखादे राष्ट्र वा त्याच राष्ट्रातील नागरिकांचा सूड असे त्याचे स्वरूप नसते, तर त्या समूहाचे लोक जगात कुठेही असले, तरी त्यांचा नाश करणे हे इसिस आपले कर्तव्य मानते. ख्राईस्टचर्च येथील हल्लेखोराचा श्रीलंकेतील ख्रिश्चनांशी तसा काहीच संबंध नव्हता. उलट श्रीलंकेतील ख्रिश्चनांना वंशवादी ऑस्ट्रेलियन आपले मानत असतील का, याची शंका आहे; मात्र तरीही श्रीलंकेतील ख्रिश्चनांचा बळी पडला, ते ख्रिश्चन आहेत इतकेच इसिसच्या निष्ठावंतांसाठी पुरेसे होते. आंतरखंडीय दहशतवाद असे त्याचे स्वरूप आहे. याचा आणखी एक अर्थ असा की, जगातील कोणत्याही देशावर इसिसकडून हल्ला होऊ शकतो. भारतही त्याला अपवाद नाही.

इसिस व अल कायदा यांच्यातील दुसरा फरक असा की, केवळ हल्ले करून भय निर्माण करणे हे ओसामा बिन लादेनचे उद्दिष्ट नव्हते. हल्ले हे लक्ष वेधण्यापुरते असावेत; पण मुख्य फोकस हा जास्तीत जास्त मुस्लिमांना एकत्र करणे किंवा अन्य धर्मीयांना इस्लामकडे खेचणे याकडे असावा, असे ओसामा मानीत असे. याउलट इसिसचा कल हा अधिकाधिक क्रूर हल्ले करण्यावर आहे. इस्लामचे कडक धर्मबंधन न मानणाऱ्या इस्लामी लोकांवरही हल्ला करणे हे आपले कर्तव्य आहे असे इसिस मानते. अल कायदा व इसिस यांच्यातील फरकाचा बराच अभ्यास युरोप व अमेरिकेत झालेला आहे. अल कायदापेक्षा इसिस ही अनेक पट धोकादायक आहे, असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

युरोप व अमेरिकेत उजव्या राजकीय शक्ती प्रबळ होत असल्याने इसिस अधिक आक्रमक होत आहे, असे तेथील उदारमतवादी बुद्धिमंतांना वाटते. अमेरिका व युरोपमध्ये कडव्या उजव्या विचारसरणी वाढलेल्या आहेत, हे निश्चित. जेराल्ड बैटन हा कडव्या उजव्या विचारसरणीचा नेता आहे. श्रीलंकेतील हल्ला हा इस्लामचा ख्रिश्चनांवरील हल्ला आहे; पण प्रस्थापित यंत्रणा ते मान्य करणार नाहीत, असे टवीट बैटन याने लगेचच केले. त्याच्यासारखी वक्तव्ये जाहीरपणे करणाऱ्यांची संख्या अलीकडील काळात वाढत आहे. आक्रमक जिहादला युरोप- अमेरिकेतील उजव्या गटांकडून आक्रमक प्रत्युत्तर सुरू झाले. त्याचा सूड घेण्यासाठी इसिस आणखी क्रूर हल्ले करू लागली असे हे चक्र आहे;  मात्र यातील मुख्य फरक असा की, इसिस ही धर्मांधांची संघटना आहे. हल्ले करणाऱ्यांना रितसर प्रशिक्षण देणारी संघटना आहे. प्रशिक्षण घेताना धर्मनिष्ठा कडव्या केल्या जातात. फार मोठी यंत्रणा त्यासाठी काम करते. युरोप-अमेरिकेतील उजव्या गटांचे तसे नाही. हे उजवे अतिरेकी मुख्यत: एकलकोंडे आहेत. तिरीमिरीतून हल्ला करणारे आहेत. त्यांच्यामागे यंत्रणा नाही वा त्यांना धार्मिक वा राजकीय आधारही नाही. ख्राईस्टचर्च येथील हल्लेखोराची सर्व थरातून निर्भत्सना करण्यात आली. याकडे इसिसने लक्ष दिले नाही. उलट अशा एकलकोंड्यांनी केलेल्या हल्ल्याची मोठी किंमत अन्य देशांतील बहुसंख्यांना मोजावी लागेल याकडे लक्ष दिले. या उजव्या हल्लेखोरांकडे इसिस, ते एकटे-दुकटे आहेत, हा हल्ला सामूहिक नाही अशा नजरेने पाहात नाही, तर एकट्याने केलेला असला तरी तो इस्लामवरील हल्ला आहे अशाच नजरेने पाहते.

हे सर्व थांबवायचे कसे, हा यातील मुख्य प्रश्न आहे. त्याचे थेट उत्तर अद्याप कोणत्याच देशाला वा तेथील नेत्यांना मिळालेले नाही. हल्ला-प्रतिहल्ला, त्याला उत्तर म्हणून पुन्हा हल्ला हे चक्र कधी संपणारे नाही. या चक्रातून काही साध्य होणार नसले, तरी भोळसट उदारमतवादही येथे कामाचा नाही. युरोपमधील सर्व राजवटी उदारमतवादी आहेत. आचार-विचारांचे स्वातंत्र्य आहे व पैसाही आहे. तरीही तेथे दहशतवादी सक्रिय होतात. कारण, आचार-विचारांचे स्वातंत्र्य यालाच ते शत्रू मानतात. तेव्हा कणखर धोरणही अवलंबावे लागते; पण या कणखरपणाचे स्वरूप काय असावे, हा कळीचा मुद्दा आहे. हा कणखरपणा सर्वसमावेशक असावा की दोन समुहात तेढ निर्माण करून संघर्ष तीव्र करणारा असावा, यामध्ये फरक करता आला पाहिजे. सध्या आपल्याकडे कणखर धोरणाची बरीच तारीफ सुरू आहे. सध्याच्या नेतृत्वाचे ते महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. भारताला कणखर नेतृत्व हवे हे काही प्रमाणात खरे आहे; पण प्रशासनात ढिलाई असली व समाजात तेढ असली, तर कणखर उपाय लवकरच कुचकामी ठरतात. इसिसने युरोपमधील अनेक देशात दहशतवादी पाठविले. त्यातील फक्त पॅरीस व ब्रुसेल्स येथील कारवाया यशस्वी ठरल्या. अन्य अनेक शहरात अतिरेकी आधीच पकडले गेले. याचे कारण अतिरेक्यांना गुप्तपणे व सफाईने काम करता येईल, अशी परिस्थिती त्या शहरांमध्ये नव्हती. नागरिक जागरूक होते व इस्लामी नागरिकही अतिरेक्यांना मदत करणारे नव्हते. पॅरीस व ब्रुसेल्स येथे मात्र अतिरेक्यांना आश्रय मिळाला. सध्या काश्मीरमधील काही जिल्ह्यांमध्ये ज्या प्रमाणे पाकिस्तानी अतिरेक्यांना आश्रय मिळतो तशीच परिस्थिती ब्रुसेल्समध्ये होती. त्याचा फायदा उठवून दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केले. राष्ट्रवाद ही आवश्यक भावना असली, तरी उत्तम प्रशासन व सामाजिक सामंजस्य यांची त्याला जोड असावी लागते. ती नसेल तर इसिसला हातपाय पसरायला सोपे जाते हे लक्षात घेतले पाहिजे. अतिरेकी कारवाया पूर्णपणे कधीच थांबविता येत नाहीत; पण उत्तम प्रशासन; तसेच एकजुटीची भावना यातून त्याला मोठ्या प्रमाणात आवर घालता येतो.

Web Title: bomb blast of shri lanka, isis and challenges before india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.