बॉन्डचे ओठ कापणार !

By admin | Published: November 23, 2015 09:41 PM2015-11-23T21:41:45+5:302015-11-23T21:41:45+5:30

मोदी सरकारातील काही शहाण्यांनी देशाला धार्मिकच नव्हे तर ‘नीतीमान’ बनविण्याचाही विडा उचलला आहे. कामसूत्रासारखा प्रणयावरील जगन्मान्य ग्रंथ जन्माला घालणाऱ्या

Bond's lips will cut! | बॉन्डचे ओठ कापणार !

बॉन्डचे ओठ कापणार !

Next

मोदी सरकारातील काही शहाण्यांनी देशाला धार्मिकच नव्हे तर ‘नीतीमान’ बनविण्याचाही विडा उचलला आहे. कामसूत्रासारखा प्रणयावरील जगन्मान्य ग्रंथ जन्माला घालणाऱ्या आणि कोणार्क आणि खजुराहोची विश्वविख्यात मंदिरे घडविणाऱ्या या देशात जेम्स बॉन्ड या ब्रिटीश हेराच्या चित्रपटातील चुंबनांची दृष्ये कापण्याचा व ती अर्धवटच दाखवण्याचा निर्णय या सरकारच्या सेन्सॉर बोर्डाने घेतला आहे. जेम्स बॉन्डचे चित्रपट साऱ्या जगाएवढेच भारतात लोकप्रिय आहेत आणि हा देश त्यातील चुंबनदृष्यांसह गेली चार-पाच दशके ते कमालीच्या आवडीने पाहतही आला आहे. ही दृष्ये हिंदी व देशी भाषेतील चित्रपटात आली तर मुले बिघडतात आणि समाजाच्या नीतीमत्तेवर त्यांचा विपरित परिणाम होतो या भयाने वा भ्रमाने ती त्यात दीर्घकाळ आली नाहीत. आता मात्र जेव्हा ती आली तेव्हा त्यामुळे मुले बिघडली नाहीत आणि समाजही बिचकला नाही. त्याहून उत्तान व उघड्या प्रणयक्रीडांची दृष्ये मोबाईलवरच पाहता येणे शक्य झाल्याचा हा काळ आहे. त्यामुळे साधे चुंबन ही फारशी चविष्ट वा पाहण्यासारखी बाब आहे हेच अनेकांना वाटेनासे झाले आहे. त्यातून चुंबनांना आपल्या पवित्र पौराणिक ग्रंथांचा दैवी आधार आहे. त्यामुळे ते आधुनिकतेएवढेच परंपरेतही बसणारे आहेत. परंतु सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पेहलाज निहलानी यांना तसे वाटत नाही. हिंदी चित्रपटातल्या चुंबनांएवढीच किंबहुना त्याहूनही अधिक जेम्स बॉन्डच्या चित्रपटातली चुंबने नीतीविरोधी, धर्मविरोधी, संस्कृतीविरोधी आणि नव्या पिढ्यांवर अनिष्ट परिणाम करणारी आहेत असे त्यांचे मत आहे. त्यातूनच जेम्स बॉन्डच्या चित्रपटातील ओष्ठमीलनाची दृष्ये कापून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तो घेतल्याने आणि चुंबनांवाचूनचा बॉन्ड देशाला दाखविल्याने तो व विशेषत: त्यातली तरुण पिढी चांगल्या मार्गावर राहील असे त्यांचे म्हणणे आहे. काही काळापूर्वी प्रथम मुलींना व नंतर स्त्रियांना मोबाईल देऊ नये असा फंडा काही शहाण्यांनी पुढे आणला होता. मोबाईलमुळे मुली नाही तरी मुले आणि स्त्रिया बिघडतात किंवा बिघडण्याची संधी त्यांच्या हाती येते असे त्यांचे म्हणणे होते. मात्र देशातील मोबाईलधारकांची संख्या ९५ कोटींच्या पुढे गेली आणि शाळकरी मुले व मुलीही त्याचा वापर करू लागली. तेवढ्यावरही नीतीमत्तेच्या मार्गावरचा देश जेथल्या तेथेच राहिला. त्याची नैतिक तब्येतही पूर्वीएवढीच चांगली ठणठणीत राहिली. दक्षिणेत प्रदर्शित होणारे चित्रपट, विशेषत: तामिळ आणि मल्याळम भाषेतले सिनेमे जेम्स बॉन्डच्या सिनेमांहून आणि त्यातील प्रणयदृष्यांहून अधिक आघाडीवर आहेत. ते नुसते सूचक नाहीत तर प्रत्यक्ष सारे काही उघड करून दाखवणारे आहेत. भोजपुरी या बोली भाषेतल्या सिनेमांनीही जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना फार मागे टाकले आहे. काही बड्या नटांच्या हिंदी चित्रपटातही ही दृष्ये आता मोकळेपणी पाहता येणारी आहेत. हिंदी चित्रपटातले पहिले चुंबनदृष्य त्याच्या आरंभकाळी म्हणजे १९३० च्या दशकातच पडद्यावर आले. पुढे मुगले-आझममधील दिलीपकुमार व मधुबालेच्या चुंबनदृष्याने त्याला प्रतिष्ठाही प्राप्त करून दिली. आता ही दृष्ये समाजाच्या नीतीमत्तेत कुठलाही बिघाड न आणता सर्वत्र येऊ लागली आहेत. आपल्या जुन्या पिढ्यांहून नवी पिढी ही जास्तीची मोकळी व पुरेशी समंजस आहे. त्यांच्यातील मैत्री संबंधांत चोरटेपणा नाही. असलाच तर एक उघड प्रामाणिकपणा आहे. त्यांना तामिळ वा मल्याळम सिनेमे मोबाईलवर पाहता येणारे आहेत. शिवाय कोणत्याही चित्रपटाची सीडी घरात आणून पाहणे त्यांना शक्य आहे. मात्र तेवढ्यावरही आपली सामाजिक नीतीमत्ता पूर्वीच्या टक्केवारीत कुठे कमी झाली असे दिसत नाही. मात्र सनातनी मने फार संवेदनशीलच नव्हे तर संकुचितही असतात. त्यातून तशाच भूमिका असणारी सरकारे सत्तेवर असतील तर त्यांना रिझवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे समजणारी निहलानींसारखी सत्तापदांवर असतील तर त्यांना जेम्स बॉन्ड चालला तरी त्याचे चुंबन चालणार नाही. आपल्या मंदिरांवरची शिल्पे आणि जुन्या ग्रंथांतील वंदनीय दैवतांविषयीचे चित्रण या समाजाला बिघडवू शकले नाही त्याला बॉन्डचे काही सेकंदाचे चुंबन बिघडवून टाकील असे निहलानींना वाटत असेल तर त्यांना समाजाएवढी त्याची नवी पिढी आणि पाश्चात्त्य सिनेमेही समजत नाहीत असे म्हटले पाहिजे. बॉन्डचे चित्रपट ज्या अमेरिकेत तयार होतात त्यातल्या (काहींच्या मते) अगोदरच बिघडलेल्या पिढ्यांवर आणखी बिघडण्याचा परिणाम करीत नसतील तर त्याचा संस्कार आपल्या समाजावर होणार असल्याच्या भयगंडाला काय म्हणायचे असते? पण निहलानींचा निर्णय त्यांचा एकट्याचा असेल असे वाटत नाही. त्यांच्यासारखा विचार करणारी अनेक माणसे आणि संघटना देशात आहेत. आपल्या मर्जीविरुद्ध वा समजाविरुद्ध जाणारे सारेच नीतीबाह्य व धर्मबाह्य आहे असे वाटण्याएवढा त्यांचा नीतीगंड मोठा आहे. पाकिस्तान हे धर्मसत्तेची पकड असलेले राष्ट्र आहे. तरीही त्या देशाने जेम्स बॉन्ड जसाच्या तसा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचे ओठ कापण्याचा आपला निर्णय भारताला, तो जगात नीतीमत्तेचा एकमेव व अखेरचा खंदा रक्षक असल्याचा मान मिळवून देईल यात शंका नाही.

Web Title: Bond's lips will cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.