सीमेवरही ‘ती’ लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 12:02 AM2017-06-08T00:02:15+5:302017-06-08T00:02:15+5:30
चूल आणि मूल या पुरते मर्यादित असणारे ‘तिचे’ जग आता खऱ्या अर्थाने बदलू लागले आहे.
चूल आणि मूल या पुरते मर्यादित असणारे ‘तिचे’ जग आता खऱ्या अर्थाने बदलू लागले आहे. शिक्षण, क्रीडा, विज्ञान, उद्योग, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिने आपला ठसा उमटवला आहे. कर्तृत्वाचे अवकाश विस्तारण्याची आणखी एक संधी तिच्या दिशेने आता नव्याने चालून आलेली आहे. तिच्या अस्तित्वाचा परीघ नव्याने विस्तारणार आहे. ते नवे अवकाश आहे भारतीय लष्कराचे ! भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय लष्करात महिलांना थेट सीमेवर लढण्यासाठी जाण्याची वाट खुली करून दिली आहे. लोकशाही आणि समानतेचा पुरस्कार करणाऱ्या सामर्थ्यशाली राष्ट्राने उचललेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानायला हवे. त्याचबरोबर हे स्त्री-पुरुष समानतेसाठी या माध्यमातून आणखी एक ठोस भूमिका घेतलेली आहे. समानता हा निव्वळ उच्चारून गौरवण्याचा शब्द नसून तो जगण्याचा स्थायिभाव बनवणे गरजेचे आहे. तेव्हाच ती समाजात रुजेल आणि उत्तमरीतीने प्रस्थापित होईल. पुरोगामित्व यातच आहे, की जिथे जिथे समानता आणणे शक्य आहे आणि जिथे कुठे वाव आहे तिथे त्याची ुसुरुवात व्हायला हवी. त्यादृष्टीनेच भारतीय लष्कराची घोषणा अत्यंत स्वागतार्ह आहे. लष्कराचे अभिनंदनीय असे पाऊल आहे. लष्करात महिला नव्हत्या असे नाही; पण त्यांनी थेट सीमेवर दोन हात करण्याची संधी नव्हती. आता या नव्या घोषणेमुळे तेदेखील शक्य होणार आहे. सध्या महिला पोलीस जवान यापासून त्याची सुरुवात होऊन टप्प्याटप्प्याने त्यांना थेट सीमेवर जाता येणार आहे. आजवरची जगभरातील लष्कराची परंपरा पाहिली तर जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, स्वीडन, इस्रायल असे काही मोजके देश आहेत ज्यांनी देशाच्या सीमेवर लढण्यासाठी महिलांना पाठवण्यासाठी पाऊल उचलले आहे. आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना भारतीय लष्कराने उचललेले हे पुरोगामी पाऊल महत्त्वाचे आहे. त्यामुळे निश्चितपणे आपली मान जगाच्या नकाशावर उंचावणार आहे.