सीमेवरची अशांतता

By admin | Published: October 10, 2014 04:09 AM2014-10-10T04:09:46+5:302014-10-10T04:09:46+5:30

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हजर राहतात, तेव्हा पाकिस्तानी सेनेची भारताच्या पूंछ क्षेत्रात घुसखोरी सुरू असते

Border unrest | सीमेवरची अशांतता

सीमेवरची अशांतता

Next

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हजर राहतात, तेव्हा पाकिस्तानी सेनेची भारताच्या पूंछ क्षेत्रात घुसखोरी सुरू असते. भारतात असेपर्यंतचा सारा काळ नवाज शरीफ हे सभ्य माणसासारखे हसत व बोलत असतात. त्याही काळात काश्मिरात त्यांच्या घुसखोर टोळ्या आतंक माजवितच असतात. नंतरच्या काळातही या दोन पंतप्रधानांच्या भेटी होतात आणि त्याही काळात भारताची पश्चिम सीमा पाकच्या आक्रमणाने खचतच असते. परवापर्यंत नुसत्या शांततेच्याच गप्पा सुरू असताना, पाकिस्तानी सैन्याने जम्मूच्या अरनिया या क्षेत्रात गोळीबार करून, भारताची निरपराध माणसे ठार मारली व अनेकजणांना प्राणांतिक जखमा केल्या. मृत्युमुखी पडलेल्यांत महिलांचाही समावेश आहे. अशा गोळीबारात सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा अलीकडच्या काळातला मोठा प्रकार आहे. अशावेळी सामान्य माणसाला पडणारा खरा प्रश्न, आपल्याला चुकीची माहिती देऊन कोण बनवीत असतो हा आहे. पाकिस्तानचे शासक की खुद्द आमचेच सरकार? ‘आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप गुंतागुंतीचे असते. त्याकडे काळे-पांढरे असे सरळ पाहता येत नाही. त्या क्षेत्रातील कोणत्याही पुढाऱ्याचे बोलणे त्याच्या शब्दांवर पुरता विश्वास ठेवून स्वीकारायचे नसते. त्या शब्दांमागे दडलेले सत्यच तेवढे शोधायचे असते. पण, हेच खरे असेल तर मग या बनवाबनवीचे शिकार कोण ठरत असतात? बोलणारे, ऐकणारे, ऐकून सांगणारे की त्यावर विश्वास ठेवणारे? जिनपिंग यांनी भारताला फार मोठी मदत देऊ केली असे म्हणायचे, चीनच्या व भारताच्या संबंधांना चांगले व विश्वसनीय स्वरूप आले असल्याचे भारत सरकारने सांगायचे आणि हे दोन देश कधी नव्हे तेवढे एकमेकांच्या जवळ आले, असे प्रसारमाध्यमांनी लोकांना ऐकवायचे. प्रत्यक्षात मात्र सीमेवर तणाव असतो, तेथे सेनेची रस्सीखेच चालते आणि त्यांची आपल्या प्रदेशातील घुसखोरी चालूच असते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांचा आपल्याला असलेला हा अनुभव असाच राहिला आहे. या महिन्यातच
पाकिस्तानने भारताची सीमा अनेकवेळा ओलांडली आहे. काश्मिरातील पाकिस्तानची घुसखोरी गेल्या साठ वर्षांत
कधी थांबली नाही आणि दर वेळी या घुसखोरांशी भारतीय जवानांच्या लढतीच्या बातम्या देश ऐकत व वाचत
आला आहे. प्रत्येक लढतीनंतर भारत सरकारने पाकिस्तान सरकारला निषेधाचा खलिता द्यायचा किंवा यापुढे असे कराल तर तुम्हाला खंबीर जबाब देऊ, अशी घोषणा त्याने करायची. मात्र, त्याचा कोणताही परिणाम पाकिस्तान सरकारवर वा त्याच्या पाठीशी असलेल्या समर्थ लष्करावर होत नाही. सीमेवरची ही अस्थिरता देश थेट स्वातंत्र्य प्राप्तीपासून
आतापर्यंत अनुभवत आलेला आहे. सरकारने पुन्हा एकवार पाकिस्तानला खंबीर उत्तर देण्याची भाषा केली आहे.
या दोन देशांत युद्ध व्हावे, अशी कोणाचीही इच्छा नाही. मात्र, त्यांच्यातील संबंध सन्मानपूर्वक राहणार नसतील, तर
एक दिवस जनतेचाच सरकारच्या शब्दावरील विश्वास
संपणार आहे. जनतेची विश्वसनीयता टिकवण्यासाठी,
तरी या संदर्भात काही खंबीर पावले उचलली जाणे आवश्यक आहे; अन्यथा चीन वा पाकिस्तानशी होणाऱ्या तथाकथित मैत्रीपूर्ण बोलण्यावर कोणी कधीही विश्वास ठेवणार नाही. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात येतात, तेव्हा चिनीसेना भारताची उत्तर सीमा ओलांडून भारतात प्रवेश करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते साबरमतीच्या किनाऱ्यावर ढोकळा आणि फाफडा खात शांततेची बोलणी करतात, तेव्हा त्यांचे आरमार भारताभोवतीचा आपला वेढा आवळत असते. भारताच्या आश्रयाला आलेले तिबेटचे धर्म व राज्यप्रमुख दलाई लामा जिनपिंग यांना स्वच्छ मनाचे प्रशस्तिपत्र देऊन त्यांची तिबेटवरील प्रभुसत्ता आपल्याला मान्य असल्याचे सांगतात, तेव्हा चीनचे राज्यकर्ते भारताच्या अरुणाचल या राज्यावर हक्क सांगणारे नकाशे प्रकाशित करतात. नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट यशस्वी झाल्याचे सांगितले जाते तेव्हाही चीनने भारताच्या सीमावर्ती प्रदेशावरील दावा मागे घेतलेला नसतो. १९६२ च्या अखेरीस सुरू झालेली सीमाविषयक चर्चा २०१४ हे वर्ष संपत आले, तरी चालूच राहते. ही स्थिती या दोन देशांतील शांतता चर्चेचे यश सांगणारी असते की अपयश सांगणारी? नेमकी हीच बाब पाकिस्तानबाबतही खरी आहे.

Web Title: Border unrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.