सीमारेषेपारही माणुसकी...
By admin | Published: March 20, 2016 03:38 AM2016-03-20T03:38:22+5:302016-03-20T03:38:22+5:30
लाहोरला राजकीय नाटक करणाऱ्या काही नाट्यसंस्थांनाही आम्ही भेटी दिल्या. अन्यायकारक राजसत्ता आणि धर्मांध लोकांचा विरोध स्वीकारून ही मंडळी फार धाडसीपणाने काम करीत होती.
(महिन्याचे मानकरी)
- सुव्रत जोशी
एनएसडीमार्फत लाहोरला नाटकाच्या प्रयोगाला गेल्यावर आलेले अनुभव आपण गेल्या आठवड्यात वाचले. त्याचा हा उत्तरार्ध
लाहोरला राजकीय नाटक करणाऱ्या काही नाट्यसंस्थांनाही आम्ही भेटी दिल्या. अन्यायकारक राजसत्ता आणि धर्मांध लोकांचा विरोध स्वीकारून ही मंडळी फार धाडसीपणाने काम करीत होती. एका अशक्त होत चालेल्या लोकशाही व्यवस्थेत कलेची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी होते, ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले. ते लोक त्यांच्या कलेसाठी मोजत असलेली किंमत पाहून आम्हाला स्फूर्तीही मिळाली.
दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या नाटकाचा प्रयोग करायचा, असे ठरविले. सगळ्यांच्या मनात उत्साह, उत्कंठा आणि भय एकत्र दाटून आले होते. प्रयोगाला किती गर्दी असेल याबद्दलही शंका होती, पण आदल्या दिवशीच्या घटनेनंतरही प्रयोग आदल्या दिवशीप्रमाणेच ‘हाउसफुल्ल’ होता. म्हणजे प्रेक्षकांंनीही झालेल्या भ्याड हल्ल्यासमोर झुकण्याचे नाकारले होते. प्रयोग करताना काही विपरित घडणार नाही ना, याची भीती सगळ्यांनाच वाटत होती. सुदैवाने मात्र तसे काही घडले नाही. उलट प्रयोग अधिकच रंगला.
त्या दिवशी पंजाब पोलीस (पाकिस्तान)चे एक मोठे अधिकारी आमचे नाटक पाहायला आले होते. ते नाटक पाहून अतिशय खूश झाले आणि त्यांनी आम्हाला जेवण्यासाठी आग्रह केला. आम्ही सगळे अर्थातच तयार होतो. लाहोरच्या मध्यवर्ती असलेल्या या ‘खाऊगल्लीत’ संध्याकाळी ५.३0 ते ६ ला खाण्याचे स्टॉल्स लागतात आणि ते मध्यरात्री ३.३0 - ४ पर्यंत उघडे असतात. ही गल्ली ज्या भागात आहे, त्या भागात स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू वस्ती होती. त्या काळी त्याचे नावही ‘गोपालगंज’ असे काहीतरी होते. अजूनही तेथील काही घरांच्या दारावरील फरशांवर कृष्ण -राधेची अथवा इतर काही हिंदू देव-देवतांची फिकी पडलेली चित्रे पुसटशी दिसत होती.
पंजाबी लोक पट्टीचे खवय्ये आणि मांसाहारावर त्यांचा भर. तिथे आम्ही मला अमुक ‘एक प्लेट’ मला तमुक ‘एक प्लेट’ असे सांगितल्यावर, आम्हाला घेऊन आलेली पोलीस अधिकारी खळखळून हसली. मग ‘किलो’ च्या मापातच आमची आॅर्डर दिली. होय, पाकिस्तानात ‘किलो’च्या मापातच खाण्याची आॅर्डर देतात. त्या दिवशी आणखी एक मोठी असामी आमचे नाटक पाहायला आली होती. आमच्या शिक्षिका आणि नाटकाच्या रंगभूषाकार अम्बा साव्याल यांचे ते स्नेही. त्यांनी अम्बा मॅडमना जेवायला घरी बोलाविले. अम्बा मॅडमनी त्यांच्याबरोबर विद्यार्थी असल्याचे सांगितले. आमचा संघ मोठा होता. तरी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण संघाला जेवायला यायचे आमंत्रण दिले. आम्हीही एक सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंब पाहायला मिळणार म्हणून उत्सुक होतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला घेऊन जाण्यासाठी भल्या थोरल्या चार-पाच गाड्या उभ्या होत्या. हा माणूस खूपच श्रीमंत होता आणि मोठा कलासक्तही. ज्या खोलीत आमची खानपानाची व्यवस्था केली होती, त्या खोलीला दगडी भिंतच नव्हती. ती सर्व कोठी काचेची होती. त्यात त्यांचा संगीत फितींचा, चित्रांचा आणि संगीताचा संग्रह अप्रतिम होता. हडप्पा आणि मोहोजोदडो येथील उत्खननात सापडलेली नाणी आणि शिल्पेही त्यांच्या संग्रहात होती. विशेष म्हणजे, त्यांच्या संगीत फितीच्या संग्रहात पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, पं. किशोरी आमोणकरपासून ते आताच्या गायकापर्यंत सर्वांच्या ध्वनिफित होत्या. भारतीय संगीताचे त्यांचे ज्ञान पाहून आम्ही आवाक् झालो. लाहोरमध्ये आम्ही काही स्थळांना भेटी दिल्या. तेथील जामा मशीद पाहिली. दिल्लीतील जामा मशिदीशी अगदी मिळतीजुळती. जो काही आणि जितका संबंध आमचा पाकिस्तानी लोकांशी आला, त्यात एक गोष्ट ढोबळमनाने जाणवली की, तिथे टोकाच्या आर्थिक दऱ्या आहेत. आमचे नाटक बघायला आलेले लोक तर उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतच होते. सर्वांचे एखादे घर परदेशात आणि कुटुंबातील मुली आंग्लाळलेली. त्यांची शिक्षणे इंग्लड अथवा अमेरिकेत झालेली. त्यामुळे विचार आणि राहणीमान याबाबतीत अत्याधुनिक. सामान्य माणसे गरीब आणि काहीशी त्रस्तच वाटली. आम्ही २५ नोव्हेंबरला भारतात परतलो. आमच्या पाकिस्तानच्या आठवणी अगदी ताज्या होत्या, तोच २६ नोव्हेंबरला मुंबईवर तो भयानक अतिरेकी हल्ला झाला. हा हल्ला चढविणारे अतिरेकी पाकिस्तानातूनच आले होते. एका दुसऱ्या देशात झालेल्या हल्ल्यात आम्ही बचावलो. मात्र, माझ्या देशात त्याच दुसऱ्या देशातून येऊन हे क्रूर अतिरेकी कृत्य केले.
नंतरच्या काही वर्षांत तर पाकिस्तानातही यासारखे भयानक हल्ले झाले, तेव्हा संपूर्ण मानवजातीची शत्रू असलेल्या या अतिरेकी भावनांशी दोन्ही देशांनी एकत्र येऊन दोन हात करायला हवेत. तेथील सरकारी यंत्रणा त्यासाठी भारताला सहकार्य देतील, अशी किमान आशा आहे, असो. आजही मला तिथले सामान्य लोक, त्यांचे आदरातिथ्य, मनमोकळा आणि गोड स्वभाव आठवतो. वाटते, लवकरात लवकर या शेजाऱ्यांशी चाललेले भांडण मिटावे. सीमारेषा धूसर व्हाव्यात आणि दारूगोळ्यांऐवजी प्रेमाचा वर्षाव व्हावा.
जिने लाहोर नही देख्या...
प्रयोगनंतर जेवणाची उत्तम सोय होती. आयोजकांनी आमच्यासाठी खास भारतीय
डिश केली होती. ‘शलजम गोश्त’ त्याचे नाव. हा पदार्थ त्या आधी कधीही खाल्ला नव्हता, त्यामुळे मी हा पदार्थ भारतातील कुठल्या भागातील असल्याचे विचारले, त्यावर त्यांनी ‘अरे, यह तो कश्मिरी है’ असे उत्तर दिले. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. ‘काश्मीर कोणाचे’ या प्रश्नावर आपल्याशी काय युद्ध पुकारणार हा देश, पण या देशातील खानसाम्याने आम्हा भारतीयांचे आदरातिथ्य करण्यासाठी बनविलेला ‘भारतीय’ पदार्थ हा ‘काश्मिरी’ होता.
(लेखक हे सिने व नाट्यक्षेत्रात अभिनेता आहेत.)