कर्जबाजारी शेतकऱ्याचा जोडधंद्याचा मंत्र उभारी देणारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:58 AM2018-03-24T03:58:22+5:302018-03-24T03:58:22+5:30

नापिकी तसेच पेरणी-लागवडीचा खर्चही वसूल न होणा-या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना, नाशिक जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतक-याने निराश न होता स्वकृतीतून दिलेला जोडधंद्याचा मंत्र अन्य शेतकरीबांधवांसाठी निश्चितच उभारी देणारा म्हणावा लागेल.

Borrowing farmer's mantra springs up! | कर्जबाजारी शेतकऱ्याचा जोडधंद्याचा मंत्र उभारी देणारा !

कर्जबाजारी शेतकऱ्याचा जोडधंद्याचा मंत्र उभारी देणारा !

Next

- संजय वाघ

नापिकी तसेच पेरणी-लागवडीचा खर्चही वसूल न होणा-या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना, नाशिक जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतक-याने निराश न होता स्वकृतीतून दिलेला जोडधंद्याचा मंत्र अन्य शेतकरीबांधवांसाठी निश्चितच उभारी देणारा म्हणावा लागेल.
‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असे म्हणण्याचे दिवस कधीच इतिहासजमा झालेत. एकवेळ अशी होती की, शेती व्यवसायाकडे सन्मानाने पाहिले जायचे. ती स्थिती आता राहिलेली नाही. शेती करणारा जीवनसाथी नाकारण्याइतपत मानसिकता हल्लीच्या युवतींची झाल्याचे दिसून येते. त्यास कारणेही तशीच आहेत. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. पिकले तर विकले जात नाही, आणि विकले तर पुरेसा भाव मिळत नाही. अशा अवस्थेत शेतकरी वर्ग कसा तग धरेल, हा खरा प्रश्न आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग, नापिकी तसेच उत्पादन खर्चही वसूल न होणे या कारणांमुळे व्यथित झालेल्या अनेक शेतकºयांनी कर्जाला वैतागून आत्महत्येची वाट धरली आहे. १९९५ ते २०१५ या २० वर्षांच्या कालावधीत देशातील सुमारे सव्वातीन लाख शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात असून, त्यातील ४५ टक्के प्रमाण एकट्या महाराष्टÑातील आहे. देश कृषिप्रधान असल्याचे मोठ्या गौरवाने केवळ म्हटले जाते, मात्र शेतकरीहिताचे निर्णय घेताना त्याची प्रचिती येत नाही. कर्जमाफी आणि हमीभाव या तशा जुन्याच मागण्या आहेत. या मागण्या मान्य केल्या तरी शेतकºयांच्या गळ्यातील फास बºयापैकी सैल झाल्यावाचून राहणार नाही. हे होईल तेव्हा होईल, परंतु पूर्णत: शासनाच्या भरवशावर अवलंबून न राहता आपल्या जगण्याचा मार्ग शेतकºयांनीच सुकर करण्याची वेळ आली आहे. केवळ कर्जापायी आपला लाखमोलाचा जीव झाडाला टांगून घेण्याइतपत टोकाची भूमिका घेण्यात नुकसान कुटुंबीयांचेच होणार आहे. कर्ज झाले म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा कर्ज होणार नाही, याची काळजी घेतली तरी शेतकºयांचे आयुष्य वाढू शकेल. नेमका हाच धागा पकडून नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी या छोट्याशा गावातील दिनकर वाकेराव संगमनेरे या अल्पभूधारक शेतकºयाने अन्य कर्जबाजारी शेतकºयांसमोर वेगळा असा आदर्श उभा केला आहे. त्यांच्याकडे तीन बिघे जमीन असून, शेतमालाला भाव नसल्यामुळे चार-पाच वर्षांत प्रपंचापोटी साडेसात लाखांचे कर्ज झाले. त्या कर्जामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत अप्रिय निर्णय न घेता त्यांनी जोडधंद्याचा विचार केला. मोटारसायकलीवर बेकरी पदार्थ घेऊन परिसरातील खेड्यापाड्यात विक्री सुरू केली. त्यास उत्तम प्रतिसादही लाभू लागला आहे. त्यांनी मोटारसायकलीच्या पाठीमागे एक फलक लावला आणि त्यावर लिहिले, ‘मी एक शेतकरी, कर्ज फेडण्यास असमर्थ म्हणून मी हताश नाही झालो. पोटाची खळगी भरण्याकरिता जसा व्यवसाय निवडला, त्याचप्रमाणे माझ्या असंख्य शेतकरी बांधवांना माझे हेच सांगणे आहे की, आपण कोणत्याही व्यवसायाबद्दलची संकल्पना मनात रुजवा आणि सुरुवात करा. परंतु चुकून आत्महत्या करू नका. माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणून जगू द्या.’ एका कर्जबाजारी शेतकºयाचा त्याच्याच जातकुळीतील शेतकºयांना फलकाद्वारे उभारी देणारा हा मंत्र निश्चितच वाखाणण्याजोगा असून, स्वावलंबी बनविणारा आहे. याच वाटेवरून चालण्याचा प्रयत्न जरी केला तरी आत्महत्येचा विचार कुणाच्याच मनाला शिवणार नाही.

Web Title: Borrowing farmer's mantra springs up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी