उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण!
By यदू जोशी | Published: May 17, 2024 07:35 AM2024-05-17T07:35:13+5:302024-05-17T07:35:59+5:30
शिवसेनेचा मतदार ‘उद्धव ठाकरे ते राहुल गांधी’ हा पर्याय स्वीकारतो, की ‘एकनाथ शिंदे ते नरेंद्र मोदी’ या कनेक्टवर शिक्कामोर्तब करतो ते पाहायचे!
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
राज्याचे शेवटचे टोक असलेल्या गडचिरोलीपासून लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झाला होता, आता २० मे रोजी राज्यातील पाचवा व शेवटचा टप्पा मुंबईत संपणार आहे. मुंबईतील सहा आणि महामुंबईतील चार अशा दहा जागांचा फैसला त्यात होणार आहे. शिवाय, धुळे, दिंडोरी, नाशिक याही जागा आहेतच. एकत्रित शिवसेनेत असतानाही ठाणे हा एकनाथ शिंदेंचा गड मानला जात असे.
आता ठाणे, कल्याणचा गड राखतानाच मुंबईचा गड सर करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. एका अर्थाने असली शिवसेना कोणाची आणि नकली कोणाची याचा निकाल लागणार आहे. ठाकरे-शिंदे दोघांसाठीही हा पाचवा पेपर सर्वात कठीण आहे. मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंसोबत दिसतात.
मोदी-शहांविरुद्ध ठणकावून बोलणारा नेता म्हणून मुस्लिमांमध्ये ठाकरेंबद्दल आकर्षण वाढत आहे. मुंबईतील मराठी मतांवर मदार असतानाच मुस्लीम मते ही ठाकरेंसाठी बोनस आहेत. त्यात वर्षा गायकवाडांची उमेदवारी आणि एकूणच महाविकास आघाडीकडे असलेला कल लक्षात घेता दलित मतदार जोडला गेला तर महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. शिवसेनेचा मतदार ‘उद्धव ठाकरे ते राहुल गांधी’ हा पर्याय स्वीकारतो, की ‘एकनाथ शिंदे ते नरेंद्र मोदी’ या कनेक्टवर शिक्कामोर्तब करतो, ते पाहायचे.
मराठी मतांवर केवळ उद्धव ठाकरेंचे एकहाती वर्चस्व आहे असे नाही, एकनाथ शिंदेही त्यात वाटेकरी आहेत. राज ठाकरे तर आधीपासूनच आहेत. भाजपने शिवसेनेच्या सावलीखालून निघून मराठी पट्ट्यातही स्वत:ची ताकद वाढविली आहे. शिवाय, गुजराती, हिंदी आणि दाक्षिणात्य मतदार मोठ्या प्रमाणात भाजपसोबत आहेत. त्यामुळेच यावेळच्या लढती अटीतटीच्या आहेत. २०१७ मध्ये राज्यात सत्तेत असूनही भाजप व शिवसेना मुंबई महापालिकेत एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यांना अनुक्रमे ८२ व ८४ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर दोघे पहिल्यांदाच आमनेसामने आहेत.
भाजप हमखास जिंकेल अशी जागा उत्तर मुंबईची (पीयूष गोयल) मानली जाते. इतर पाच ठिकाणी काही सांगता येत नाही. मोदींच्या रोड शोने मिहिर कोटेचांना उत्तर-पूर्व मुंबईत बळ मिळाले आहे. एखाद्या ठिकाणी चुकीच्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसू शकतो. मोदी-राज ठाकरेंची सभा आणि महाविकास आघाडीची संयुक्त सभा किती परिणाम साधणार, हेही महत्त्वाचे असेल. ॲड. उज्ज्वल निकम विरुद्ध प्रा. वर्षा गायकवाड ही लढत सर्वात अटीतटीची आहे. उत्तर-पूर्व मुंबईत शिंदेसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल हे उद्धव सेनेकडून लढत आहेत आणि कालपर्यंत उद्धवसेनेत असलेले आ. रवींद्र वायकर शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. वायकर यांची ‘मातोश्री’शी असलेली नाळ पूर्णपणे तुटली नसल्याचे त्यांच्या विधानांवरून वाटते आहे. ते मनापासून लढत असल्याचे चित्र दिसत नाही. भिवंडीत अपक्ष निलेश सांबरे किती मते घेतात, यावर भाजपच्या कपिल पाटलांचे भवितव्य अवलंबून आहे, पालघरमध्ये कमळाचा मुकाबला शिट्टीशी दिसतो.
‘घासून’ शब्दाची चलती
या निवडणुकीतील एक शब्द प्रत्येकाची धडधड वाढवत आहे. तो शब्द आहे, ‘घासून’. ‘आमच्याकडे कोणीही येऊ शकते, घासून फाईट होणार’ असे बहुतेक ठिकाणांहून ऐकायला मिळत आहे. पाच वर्षे विविध सत्ताप्रयोगांद्वारे मतदारांची गंमत घेणाऱ्या नेत्यांची गंमत आता मतदार घेत आहेत. सध्या नेते बोल बोल बोलत आहेत, पण मतदार शांत आहे. ४ तारखेच्या निकालात मतदार बोलेल आणि भल्याभल्यांची बोलती बंद होईल. जातीय समीकरणांच्या आधारे महाविकास आघाडी ‘मोदी मॅजिक’वर मात करू पाहत आहे तर मोदींचा करिष्मा सर्वच मुद्द्यांवर भारी पडेल असे महायुतीला वाटत आहे. महायुतीचा सर्वात मोठा विरोधक त्यांच्याविरुद्ध विरोधकांनी तयार केलेला नरेटीव्ह (कथन/विमर्श) हा आहे आणि तो फेक असल्याचे पटवून देण्यात भाजपच्या माध्यम यंत्रणेला अजूनतरी यश आलेले नाही. उमेदवारांच्या जातींपातींवरून सोशल मीडियात हिणकस अपप्रचार यावेळी केला गेला, उद्या निकालात कोणी एकच जण जिंकेल; पण या निमित्ताने जातीयवादाचे झालेले किळसवाणे प्रदर्शन आणि त्यातून दुभंगलेली मने जोडायला बराच काळ जावा लागेल.
दिल्ली बोले, मुंबई डुले
भाजपने दोन मित्र पक्ष जोडणे ते महायुतीच्या जागावाटपापासून उमेदवार ठरविण्यापर्यंतचे जे काही निर्णय झाले ते दिल्लीतून झाले, शिंदे-फडणवीस-पवार यांनी त्याला मम् म्हटले. निवडणूक निकालात दिल्लीने लादलेल्या गोष्टींमुळे झालेले महायुतीचे नुकसान निदर्शनास आणून देण्याचे धाडस कोण दाखवेल? मात्र, त्या चुका दिल्लीनेच दुरुस्त केल्या तर विधानसभा निवडणुकीत फायदा होईल. महाराष्ट्राचे राजकारण हे महाराष्ट्राच्या अंगाने, येथील वेगवेगळ्या संदर्भांच्या आधारे चालले पाहिजे, याचे भान चार-पाच मतदारसंघांमधील निकाल भाजपश्रेष्ठींना आणून देईल.
काँग्रेसचे काय सुरू आहे?
पहिल्या दोन टप्प्यात दिसली तशी राज्यातील काँग्रेस नेत्यांची एकी नंतर दिसत नाही. राहुल गांधी ३ मेनंतर महाराष्ट्रात फिरकलेले नाहीत. त्यांच्या चारच सभा झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १७ झाल्या. अमित शाहांच्या वेगळ्या. इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या संयुक्त सभेलाही राहुल गांधी, प्रियांका गांधी येणार नाहीत. महायुतीच्या शेवटच्या सभेसाठी मोदी येत आहेत. मुंबईच्या मैदानात गांधींनी ठाकरेंना एकटे तर सोडले नाही ना?