श्रेयासाठी चढाओढ
By admin | Published: March 5, 2016 03:19 AM2016-03-05T03:19:47+5:302016-03-05T03:19:47+5:30
मंजुरीचे आदेश आणणे आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम घेऊन विकास कामांचे स्वप्न दाखविणे असा एककलमी कार्यक्रम खान्देशात सुरु आहे.
मंजुरीचे आदेश आणणे आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम घेऊन विकास कामांचे स्वप्न दाखविणे असा एककलमी कार्यक्रम खान्देशात सुरु आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या एखाद्या मंत्रालयाकडून मंजुरीचे आदेश आणायचे आणि धडाक्यात भूमीपूजन उरकायचे. मोठा कार्यक्रम घेऊन जणू काम पूर्ण झाल्याचा आव आणायचा. बरं कामंदेखील थोडीथोडकी नव्हे तर कोटीच्या कोटी उड्डाणे...सामान्य माणसाने दिपून जावे, असा सगळा देखावा. कार्यक्रम उरकल्यानंतर महिना-दोन महिन्याने कुणी विचारले तर सर्वेक्षण सुरु आहे, निविदाप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे, राज्य सरकारचे योगदान बाकी आहे, मंत्र्यांकडे वेळ मागितली आहे, असे उत्तर तोंडावर मारुन फेकले जाते.
यापेक्षा अधिक करमणूक होते, श्रेयासाठी चढाओढ लागल्यावर. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. धुळेकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. यापूर्वी चारवेळा या मार्गाचे सर्वेक्षण झाले. यंदा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पावले आणि या मार्गासाठी ४९८४ कोटी रुपयांची तरतूद केली. एकूण ९९६८ कोटी रुपये खर्च या प्रकल्पाला लागणार आहे. उर्वरित रक्कम महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारांना द्यावी लागणार आहे. मंजुरीचा आनंद धुळेकरांना झाला असला तरी सत्ताधारी भाजपाच्या आमदार आणि खासदारांमध्ये श्रेयावरुन चढाओढ सुरु झाली. भाजपा आणि गोटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसंग्राम यांनी स्वतंत्रपणे आनंदोत्सव साजरा केला. खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत श्रेय स्वत:कडे घेताना दावा केला की, खासदार झाल्यापासून दिल्लीत शंभरावर चकरा मारल्या त्या केवळ याच रेल्वे मार्गासाठी. आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून खासदारांसोबत आपणही प्रयत्न केल्याचा दावा केला.
अनिल गोटे प्रथमच भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. यापूर्वी ते अपक्ष आमदार होते. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे सूर अद्याप जुळलेले नाही. त्याचा भडका अधूनमधून उडतो. गोटेंच्या टीकेमुळे भाजपा नेते चांगलेच खवळले. ज्येष्ठ नेते हिरामण गवळी यांनी तर पक्षशिस्तीचे पालन न करणाऱ्या गोटेंविरोधात सरळ संघर्ष करण्याची तयारी दर्शवली. अखेर गोटे यांनी नमते घेत दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
आठवड्यात दुसऱ्यांदा भाजपा आमदारांमध्ये श्रेयवाद सुरु झाला. निमित्त ठरले ते शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा योजनेला केंद्र सरकारच्या मंजुरीचे. २२६० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला राज्य सरकारच्या वित्त विभागाची मान्यता अद्याप मिळालेली नाही. परंतु अनिल गोटे आणि शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यात चढाओढ सुरु झाली. ही योजना मंजूर करुन आणण्यासाठी किती दिल्लीवारी केल्या, केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारतींना कसे साकडे घातले याचे दाखले दोन्ही आमदार देत आहेत.
गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्यातही ही चढाओढ दिसून आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महाआरोग्य शिबीर घेतले. महाजन यांचे आरोग्य क्षेत्रात कार्य असल्याने मुंबई, पुण्याचे मोठे डॉक्टर आले होते. गोरगरीब रुग्णांची तपासणी करण्यात आली. काहींच्या शस्त्रक्रिया झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटनासाठी आले. नेमक्या याचवेळी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे परदेशात गेले होते. त्यांचे समर्थक शिबिरापासून अंतर राखून होते, तर विरोधक शिबिरात आघाडीवर होते.
त्यानंतर खडसे यांनी १६०० कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या शुभारंभाचा धडक कार्यक्रम भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेतला. मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
श्रेयासाठी चढाओढ करणारी ही मंडळी प्रत्यक्ष कामे होण्यासाठी कधी प्रयत्न करणार हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. - मिलिंद कुलकर्णी