बोम्मन आणि बेल्ली : द एलिफन्ट व्हिस्परर्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 08:35 AM2023-03-14T08:35:02+5:302023-03-14T08:36:09+5:30

रघू या हत्तीच्या पिल्लावर अपार प्रेम करणाऱ्या बोम्मन आणि बेल्ली या जोडप्याची ही प्रगल्भ कथा कुणालाही स्पर्शून जाईल अशीच आहे!

bowman and belly the elephant whisperers | बोम्मन आणि बेल्ली : द एलिफन्ट व्हिस्परर्स!

बोम्मन आणि बेल्ली : द एलिफन्ट व्हिस्परर्स!

googlenewsNext

गणेश मतकरी, चित्रपट अभ्यासक – समीक्षक

भारतासाठी ऑस्कर मिळवणारा पहिला चित्रपट कोणता असेल, हा चित्रपटप्रेमींना अनेक वर्षे सतावणारा प्रश्न २०२३ मधे अचानक सुटलेला आहे, पण सर्वांची अपेक्षा होती तसा नाही. ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॅाम्बे’, ‘लगान’ अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात मिळालेल्या नामांकनानंतर त्याच विभागात कोणीतरी ही करामत करून दाखवेल अशी आपली खात्रीच होती, परंतु तसं काही झालेलं नाही. विजेता ठरलाय तो लघु-माहितीपट विभागातला ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ हा कार्तिकी गोन्जाल्विस दिग्दर्शित चित्रपट. 

यंदा भारताला आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात नामांकन नसलं, तरी मुख्य स्पर्धेत एक सोडून तीन नामांकनं होती, आणि त्यातली दोन माहितीपट विभागातलीच होती. ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ हा लघुपट, आणि शौनक सेन दिग्दर्शित ‘ऑल दॅट ब्रीद्स’, हा पूर्ण लांबीचा माहितीपट. ‘ऑल दॅट ब्रीद्स’देखील सनडान्स आणि कॅन चित्रपट महोत्सवापासून अनेक ठिकाणी विजेता ठरलेला होता आणि ऑस्करवर लक्ष ठेवून असलेल्या प्रेक्षकांना या दोघांकडूनही आशा होती. गंमत म्हणजे हे दोन्ही माहितीपट मानवजगत आणि निसर्ग यांना जोडणारा धागा शोधणारे होते. ‘ऑल दॅट ब्रीद्स’ दिल्लीच्या वजीराबाद भागात पक्ष्यांसाठी दवाखाना चालवणाऱ्या नदीम शहजाद आणि मोहम्मद सौद या भावांबद्दलचा आहे, तर ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’मधे मांडली आहे, ती रघू या हत्तीच्या पिल्लावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करणाऱ्या बोम्मन आणि बेल्ली या जोडप्याची प्रगल्भ कथा. 

जागतिक सिनेमा वर्गात जे चित्रपट गणले जातात, त्यांचं वैशिष्ट्य हे, की त्यांचा तपशील हा प्रादेशिक, त्या त्या प्रांताशी जोडलेला असला, तरी आशय  वैश्विक असतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला हे चित्रपट कळायला अवघड जात नाहीत, ते त्याच्याशी सहज संवाद साधू शकतात. त्या दृष्टीने  एलिफन्ट व्हिस्परर्सला जागतिक सिनेमाशीच साधर्म्य असणारा चित्रपट म्हणायला हरकत नाही. त्यात दाखवलेलं जिव्हाळ्याचं नातं सर्व वर्गीय, प्रांतीय, देशीय समाजाला जवळचं वाटणारं आहे. ‘व्हिस्परर’ म्हणजे प्राण्यांशी संवाद साधू शकणारा, आणि इथले व्हिस्परर्स आहेत तामिळनाडूतल्या आदिवासी समाजाचा भाग असलेले बोम्मन आणि बेल्ली. तिथल्या मदूमलाई नॅशनल पार्कसाठी हे दोघं काम करतात. बोम्मन एकेकाळी मोठ्या हत्तींबरोबर काम करत असे, पण एकदा सुळ्याने झालेल्या इजेनंतर त्याने हे काम थांबवलं. बेल्लीच्या पतीचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेला आहे. हत्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या थेप्पकडू एलिफन्ट कॅम्पमध्ये सोपवलेली जबाबदारी म्हणून ‘रघू’ या हत्तीच्या पिल्लाचा सांभाळ ही दोघं करायला लागतात, आणि या तिघांचं एक कुटुंबच तयार होतं. 

फिल्म लांबीने फार मोठी नसली, तरी बराच कालखंड व्यापणारी आहे आणि त्यामुळे एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्यात कथानकाचे ठळक टप्पे दिसतात. आयुष्याचा यातनादायक अनुभव घेतल्यानंतर या दोघांच्या आयुष्यात रघूचं येणं आणि त्या निमित्ताने या प्रौंढांचं पालकांच्या भूमिकेत जाणं, त्याचबरोबर एकमेकांच्या जवळ येणं, हे सरळच एखाद्या प्रेमकथेसारखं आहे. या दोघांचं बदलतं नातं हळूहळू, चित्रपटाप्रमाणेच छोट्या-छोट्या प्रसंगांमधून उलगडत जातं. रघूचा सांभाळ, त्यानंतर नव्याने आलेलं पिल्लू ‘अम्मू’, या चौघांमध्ये तयार होणारे बंध, हा या माहितीपटाचा मोठा भाग आहे.

दुसरा रंजक भाग आहे, तो या बाल हत्तींच्या कारवायांचा. त्यांचं लहान बाळासारखं  वागणं,  त्यांचा प्रचंड आकार, तरीही त्यांच्या पालकांचे त्यांना सांभाळून घेण्यासाठी चाललेले प्रयत्न, हे अतिशय गुंतवणारं आहे. माहितीपटाचा दृश्य भाग, हा एका बाजूला या कुटुंबावर केंद्रित राहतो, तर दुसऱ्या बाजूला हे प्रचंड जंगल, त्यातले इतर वन्यप्राणी, आणि खासकरून या कथानकाचे सूत्रधार असल्यासारखी माकडं, यांच्याभोवती फिरतो. हे सारं चित्रित करण्यासाठी कार्तिकी गोन्जाल्विसने पाच वर्षांचा कालावधी घेतला.  या काळात तिला या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातले चढउतार मिळाले असले, तरी ते सुटसुटीतपणे थोडक्या कालावधीत मांडायचे, तर त्यासाठी नेटकी संहिताही आवश्यक आहे. जी जबाबदारी कार्तिकीची आई प्रिसिला हिने सांभाळली आहे. 

माहितीपटांकडे आपण रुक्ष काहीतरी असल्यासारखं पाहतो. केवळ माहिती देण्यापलीकडे त्याला काही हेतू असू शकत नाही, असा समज प्रचलित दिसतो. पण ओटीटी प्लॅटफॅार्म्सच्या उदयानंतर हा समज बदलण्याची  शक्यता आहे. आज या चॅनल्सवर विविध प्रकारचे असंख्य माहितीपट पहायला मिळतात, ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’देखील नेटफ्लिक्सवर  उपलब्ध आहेच. 

- या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्याचा आनंद जरुर करावा, पण हा सन्मान का  मिळाला असावा याचाही विचार आपण करायला हवा. ते आपल्या लक्षात आलं, तर या स्पर्धेतल्या आपल्या कामगिरीत फरक पडायला वेळ लागणार नाही.
ganesh.matkari@gmail.com

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bowman and belly the elephant whisperers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर