ब्रह्मपुत्रेकडे होतेय दुर्लक्ष
By admin | Published: October 15, 2014 12:33 AM2014-10-15T00:33:53+5:302014-10-15T00:33:53+5:30
देशात जेवढी जलविद्युत निर्माण होते, त्याच्या एकतृतीयांश वीज एकट्या ब्रह्मपुत्रेतून निर्माण होऊ शकते. पण या संबंधात साधी पाहणीही झाली नाही.
डॉ. अलका सरमा
आसाममधील राजकीय कार्यकर्त्या
आपल्या राष्ट्रगीतामध्ये एक ब्रह्मपुत्रा सोडली तर साऱ्या प्रमुख नद्यांचा उल्लेख आहे. गंगा-यमुना या नद्यांच्या काठावरील संस्कृतीबद्दल बरेच काही लिहिले गेले; पण बलाढ्य ब्रह्मपुत्रेच्या काठावरील संस्कृतीबद्दल फार थोडी माहिती आहे. ब्रह्मपुत्रेला ४१ मोठ्या उपनद्या आहेत. उत्तर किनाऱ्यावर २६ आणि दक्षिण किनाऱ्यावर १५ आहेत. ब्रह्मपुत्रा ही आंतरराष्ट्रीय नदी आहे. तिबेट, भारत आणि बांगलादेशातून ती वाहते. एकंदर २८८० किलोमीटर लांबीच्या या नदीचा १६२५ किलोमीटर भाग तिबेट (चीन)मध्ये आहे. भारतात ९१८ किलोमीटर आहे तर बांगलादेशात ३३७ किलोमीटर आहे. भारतात अरुणाचल प्रदेश आणि आसाम या दोन राज्यांतून ती वाहते. बांगलादेशमध्ये ती गंगेला मिळते आणि पुढे बंगालच्या उपसागराला. नदीला जीवनदायिनी म्हटले आहे. सातत्याने बदल हा आयुष्याचा नियम आहे. नदीचेही तसेच आहे. नदीचेही पाणी सारखे नसते. ती स्थिर नसते, वाहत असते. कुठे ती संथ असते तर कुठे खळाळती. नदीप्रमाणेच नदीच्या खोऱ्यातील संस्कृतींचीही कहाणी आहे. ब्रह्मपुत्रेबद्दल तर बरेच सांगता येईल.
आसामी नागरिकांसाठी ब्रह्मपुत्रा नदी तर आसामचा आत्मा आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश ही दोन राज्ये ब्रह्मपुत्रेचे पाणी पितात. भारतीय नद्यांमध्ये ही एक अतिशय महत्त्वाची नदी आहे. पण देशाचे तिच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले.
पं. नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या पुस्तकात ब्रह्मपुत्रेचा उल्लेख आढळतो. साध्यासाध्या नद्यांवर धरणं आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आले; पण याबाबतही ब्रह्मपुत्रेच्या नशिबी उपेक्षाच आली. ईशान्य भारताचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सामाजिक, आर्थिक चेहरा बदलण्याची ऊर्जा ब्रह्मपुत्रेमध्ये आहे. देशात जेवढी जलविद्युत निर्माण होते, त्याच्या एकतृतीयांश वीज एकट्या ब्रह्मपुत्रेतून निर्माण होऊ शकते. पण या संबंधात साधी पाहणीही झाली नाही. या नदीवर दोन पूल १९६२ साली बांधले गेले, यावरून तिच्याकडे किती अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे याची कल्पना येईल.
सांस्कृतिक वैविध्याने नटलेल्या या प्रदेशात अनेक जातिपंथाचे लोक राहतात. पण, सत्ताधाऱ्यांकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने ईशान्य भारत हा राजकीयदृष्ट्या कमालीचा संवेदनशील भाग बनला. इंग्रज येईपर्यंत इथली खेडी स्वयंपूर्ण होती. ब्रिटिशांनी चालवलेल्या शोषणामुळे आर्थिक आधार दुबळा होत गेला. स्वातंत्र्यानंतरही हेच सुरू राहिले. त्यामुळे दुजाभाव वाढला. हा भाग पाच देशांनी वेढला आहे. या भागाची ९० टक्के सीमा आंतरराष्ट्रीय आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जनतेमधली परकेपणाची भावना काढून टाकण्यासाठी या भागाचा आर्थिक विकास हा एकच उपाय आहे. त्यामुळे इथली जनता भारतीय मुख्य प्रवाहात झपाट्याने सामील होईल.
ब्रह्मपुत्रेचे खोरे हा भारताचा उत्तर पूर्व कोपरा आहे. दुर्गम आहे. पण पूर्वीच्या काळात ब्रह्मपुत्रा खोरे हे आशियातील वाढती व्यापारपेठ होती. राजकीय कारणांमुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांचे या खोऱ्यातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले. कोलकत्याकडे जाणारा नदीचा मार्ग १९६५ मध्ये बंद करण्यात आला. हा अखेरचा तडाखा होता. जुन्या काळात ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर महान संस्कृती नांदत होती. चारही बाजूच्या शेजाऱ्यांशी मैत्रीचे घट्ट नाते होते. ब्रह्मपुत्रेचे खोरे आर्थिक भरभराट आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचे एक केंद्र होते. स्वतंत्र भारतात आज त्याची अवस्था पूर्वेकडील चौकीसारखी आहे.
अन्याय, सावत्रपणाची वागणूक, उपेक्षा या गोष्टी दुजेपणाची भावना घेऊन येतात. आपल्याला परकेपणाने वागवले जाते असे इथल्या लोकांना वाटते. बांगलादेशातून बेकायदा येणाऱ्या लोंढ्यांमुळे ही समस्या आणखी तीव्र बनली. आधीच आर्थिक विकास नाही. त्यात हे बाहेरचे लोंढे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपसातील गटबाजीने राजकीय अस्थैर्य वाढते आहे. एकेकाळचा हा संपन्न
भाग कोणत्याही तयारीविना जागतिक स्पर्धेशी
तोंड द्यायला कसा तयार होणार? अशा गोष्टींमुळे
वैफल्य आणखी वाढते. केंद्र आणि राज्यातील सरकारांची भूमिकाही निराशाजनक राहिली. अक्षम्य दुर्लक्ष, अन्याय... ब्रह्मपुत्रेकडे पाहिले तर सारी उत्तरं मिळतील. ब्रह्मपुत्रा नदी दुर्लक्षित आहे, तिचा उपयोग करून घेतला जात नाही. एके काळी हीच ब्रह्मपुत्रा
दोन्ही हाताने भरभरून द्यायची, निर्माण करायची.
आज तिने प्रलय चालवला आहे. केंद्रीय जलऊर्जा आयोगाने ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील जलविद्युत क्षमतेबाबत प्राथमिक अंदाज काढला. देशाच्या क्षमतेच्या ४१ टक्के क्षमता इथे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. ही क्षमता सर्वोच्च आहे; पण ६७ वर्षे उलटूनही इथली १० टक्केही क्षमता वापरली गेलेली नाही. देशाचा ३० टक्के पाणीसाठा ईशान्येत आहे; पण त्याचा उपयोग केला जात नाही. सिंचन असो की जलविद्युत असो, मत्स्योद्योग असो की पर्यटन विकास असो, कसल्याही बाबतीत लक्ष दिले गेले नाही. विकासाच्या दृष्टीने गंभीरपणे प्रयत्न झाले नाहीत. ब्रह्मपुत्रा सध्या वरदान ठरण्याऐवजी नाशाला कारणीभूत होत आहे. नदीच्या पाण्याचा वापर केला जात नाही. पण दर वर्षी येणारा पूर होत्याचे नव्हते करून जातो. पावसाला अनुकूल अशा भागात आसाम
वसला आहे. भूकंपप्रवण म्हणूनही हा भाग कुप्रसिद्ध आहे. १९५० च्या भूकंपाने ब्रह्मपुत्रेच्या पात्रात बदल झाला. त्यामुळे पूर आला की मोठे नुकसान होते. या भागातील सर्व राज्ये पर्वताळ आहेत. फक्त आसामच खोऱ्यात आहे. जंगलतोडीने वेगळेच प्रश्न वाढले आहेत. ब्रह्मपुत्रेच्या हाकेला ओ देण्याची ही वेळ आहे. आसामची सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.