आरक्षण नसल्याने ब्राह्मण जातात विदेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 01:26 PM2018-12-18T13:26:34+5:302018-12-18T14:22:52+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अन्य समाजही आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी करू लागला आहे.

Brahmins go abroad because of no reservation | आरक्षण नसल्याने ब्राह्मण जातात विदेशी

आरक्षण नसल्याने ब्राह्मण जातात विदेशी

Next

- ल. कृ. पारेकर गुरुजी
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अन्य समाजही आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी करू लागला आहे. त्यात ब्राह्मण समाजालाही आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवे असा सूर लावला जात आहे. ब्राह्मणांनाही आरक्षण हे मिळायले हवे. ते किती टक्के द्यावे हे सरकारने ठरवावे. जर आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे झाल्यास आताचे आरक्षण रद्द करून पुन्हा नव्याने रचना करावी लागले, पण ते अशक्य आहे. कुठलाही राजकीय पक्ष आर्थिक निकषावर आरक्षण देऊ शकत नाही. इतरांच्या आरक्षणांना धक्का लागू नये म्हणून आर्थिक निकषाचे कारण पुढे केले जात आहे. पण ते दाखवलेले गाजर असेच म्हणावे लागेल.

खरं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत संतुलन राखायचे असेल तर राखीव असलेल्यांना तेथेच ठेवावेत त्यांना खुल्या प्रवर्गात आणू नये. शिक्षण, नोकरी अगदी राजकारणासाठी हा निकष लावला गेला पाहिजे. कारण काय होते बरेच जण राखीव कोट्यातून शिक्षण घेतात आणि खुल्या गटातून नोकरी मिळवतात, यातून अडचण होते. राजकारणाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर जर एखादा प्रभाग खुल्या गटासाठी असेल तर तेथे राखीवमधील लोकांनी येऊ नये. तेथे खुल्या गटातील व्यक्तीस उभे करावे. यातून त्यांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. हे करायचे असेल तर सर्व राजकीय पक्षांनी मिळून एक ओळीचा ठराव करून तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावा. पण हे कितपत शक्य हे सांगणे कठीण आहे.

शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात आजही उत्पन्न हे आठ ते दहा हजारांच्या आसपास आहे. अशा तुटपुंज्या उत्पन्नात खाणारी चार तोंडे असतात. पण अशाही परिस्थितीत ब्राह्मण कधी दुसऱ्यापुढे हात पसरत नाही. उलट तो भिक्षा मागून दुस-यांना आशीर्वादच देत असतो. आज ब्राह्मणांना आरक्षण मिळत नसल्याने अनेक प्रश्न उभे आहेत. त्यातील महत्वाचा म्हणजे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. ब्राह्मणांच्या मुली अन्य समाजातील मुलांशी विवाह करत आहेत. त्यांना माहीत आहे ब्राह्मण मुलाशी लग्न करून आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. अशा या परिस्थितीमुळे कुटुंब संस्था बिघडत चालली असून अशा प्रकारचे विवाह सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नसल्याने घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रातही आरक्षण नसल्याने गरीब घरातील ब्राह्मण मुलांचे नुकसान होत आहे. जास्त गुण मिळवूनही तो आरक्षणाच्या कक्षेत बसत नसल्याने त्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणे अवघड होऊन बसले आहे. मात्र असे असले तरी ब्राह्मणाने कधीही भ्रष्टाचार केला नाही. मुलांचे शिक्षण म्हणा किंवा घरखर्चासाठी कधीही अशा मार्गाचा अवलंब केला नाही. जे भ्रष्टाचार करतात ते ब्राह्मण नाही. अशी मंडळी ही सरकारी कार्यालयात असल्याने कामे वेळेत होत नाही, सरकारी यंत्रणा नीट राबवली जात नाही. एकूण ही परिस्थिती पाहता ब्राह्मण घरातील मुलगा आज परदेशात नोकरी करण्यास प्राधान्य देतो.

ही मुले परदेशात जाऊन आपल्या शिक्षणाचा फायदा तेथील देशासाठी करतात. भविष्यातील चित्र पाहता प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, भरपूर शिका. परदेशात जा, पैसा कमवा आणि आपल्या समाजासाठी पैसे आणा, भले करा अशा आशयाचे फलक लावण्याची वेळ आली आहे. तसे पाहिले गेल्यास ब्राह्मणांची टक्केवारी ही तीन टक्के आहे. म्हणजे तेही एका प्रकारे अल्पसंख्याक आहेत, असे म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यकाळात ब्राह्मणांनी अन्याय केला असे म्हटले जाते. पण ते कपोलकल्पित आहे. अन्याय झाल्याचा एकतरी पुरावा द्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आरक्षण पाच ते दहा वर्षे द्यावे, असे सांगितले होते. मात्र आज राजकीय पक्षांनी आपली व्होटबँक जाऊ नये म्हणून ते कायम ठेवले आहे.

आज प्रत्येक समाजाला आरक्षण हवे आहे. ते न दिल्यास काय होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आरक्षण न दिल्यास दुहेरी नुकसान होते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. आंदोलनात बळी गेलेल्यांना भरपाई द्यावी लागते. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची मागणी केली जाते. हे सगळे टाळण्यासाठी सरकारने सरसकट सर्वांना आरक्षण देऊन टाकले पाहिजे. राजकारण्यांसाठी सध्या बरे दिवस नाहीत. त्यांनी सावध राहायला हवे.

>ब्राह्मणांना आर्थिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण मिळणे कठीण आहे. मात्र शिक्षण, नोकरी यामध्ये ब्राह्मण मुला-मुलींवर अन्याय होत असल्याने अनेक जण विदेशात जातात. परिणामी ब्राह्मणांच्या ज्ञानाचा लाभ त्या देशांना होतो. हे टाळायचे तर अन्य समाजाबरोबरच ब्राह्मणांनाही आरक्षण हवेच.
>जातीवाचक टीकेचा त्रास
आज सरकारी कार्यालयात एखादी व्यक्ती प्रामाणिक काम करत असेल तर अन्य त्यात आडकाठी करतात. आज ब्राह्मणांनाही जातीवाचक बोलले जाते. पण त्यांच्याकडे कोणतेही अस्त्र नाही. अशा परिस्थितीत ब्राह्मणांनाही एखाद्या कायद्याचा आधार असला पाहिजे.
>कर भरूनही फायदा नाही
ब्राह्मण सर्वाधिक कर भरतात. मात्र त्याचा फायदा त्यांना होत नाही. या पैशातून अन्य समाजाचा उद्धार होतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
>मालिका, चित्रपटांचा प्रभाव
आज ब्राह्मण घरातील मुली अन्य समाजातील मुलांसोबत पळून जाऊन लग्न करू लागल्या आहेत. हा सगळा मालिका, चित्रपटांचा प्रभाव आहे. यातून विवाह संस्था धोक्यात येऊ लागली आहे. पुढचामागचा कसालाही विचार या मुली करीत नाही. पश्चाताप झाल्यावर त्या दु:ख करीत बसतात. मालिका, चित्रपटांतून दाखवले जाते ते खोटे असते, अभिनय असतो हे या मुलींनी समजून घेणे गरजेचे आहे.
>सकल ब्राह्मण समाजाने केलेल्या मागण्या
संपूर्ण शिक्षण विनामूल्य करावे
मुलामुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह असावे
स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ किंवा आयोग स्थापन करून वार्षिक ५०० कोटींची तरतूद करावी
पुरोहितांना दरमहा ५००० मानधन द्यावे
नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण द्यावे
कूळ कायद्यातंर्गत गेलेल्या जमिनी परत करा, मंदिरे परत द्या
ब्राह्मण समाजाविरोधात लिखाण, अर्वाच्य भाषेत बोलणा-यांना तातडीने अटक करून कारवाई करावी
विनातारण कर्ज द्यावे
(लेखक : ज्योतिषाचार्य, कथा निरूपणकार आहेत)
शब्दांकन : निलेश धोपेश्वरकर

Web Title: Brahmins go abroad because of no reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.