दारू सोडवण्यासाठी बसवली मेंदूत चिप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 05:08 AM2023-05-08T05:08:00+5:302023-05-09T16:49:50+5:30

अनेकांना अनेक गोष्टींचं व्यसन असतं. अलीकडच्या काळात इंटरनेट, मोबाइल आणि सतत ऑनलाइन राहण्याचं एक नवंच व्यसन लोकांना, त्यातही तरुणांना जडलं आहे.

Brain chip installed to solve alcohol | दारू सोडवण्यासाठी बसवली मेंदूत चिप!

दारू सोडवण्यासाठी बसवली मेंदूत चिप!

googlenewsNext

अनेकांना अनेक गोष्टींचं व्यसन असतं. अलीकडच्या काळात इंटरनेट, मोबाइल आणि सतत ऑनलाइन राहण्याचं एक नवंच व्यसन लोकांना, त्यातही तरुणांना जडलं आहे; पण त्यातही सर्वांत जुनं आणि अगदी सर्वसामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत रुजलेलं एक व्यसन म्हणजे दारू. याच दारूनं आजवर अनेकांचं व्यक्तिगत आयुष्य तर बर्बाद केलंच; पण त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्याचेही तीनतेरा वाजवले आहेत.

हे व्यसन लागलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्यामुळे किती त्रास साेसावा लागतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ज्याला दारूच्या व्यसनाची लत लागलेली आहे, त्यालाही हे निश्चित माहीत असतं, की या व्यसनामुळे आपण किती बर्बाद होत आहोत ते. त्यामुळे बऱ्याचदा त्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि स्वत: ती व्यक्तीही दारू सोडवण्याचा प्रयत्न करीत असते. मात्र, अनेकदा त्यात अपयशच येतं. अलीकडं दारू सुटावी यासाठी काही औषधं बाजारात आली आहेत, काही वेळा ही औषधं व्यसनी व्यक्तीच्या आहारात मिसळली जातात, त्यामुळे त्याला दारू पिण्याची इच्छा होत नाही, असं म्हटलं जातं. याचाही फारसा फायदा झाल्याचं ऐकिवात नाही. दारूचं व्यसन सोडवण्यासाठीचा रामबाण उपाय त्यामुळे अजूनही तसा गुलदस्त्यातच आहे.

चीनमध्ये मात्र एका व्यक्तीवर नुकताच एक ‘जालीम’ उपाय करण्यात आला. त्यामुळे त्या व्यक्तीची दारू कायमची सुटेल असं सांगण्यात येत आहे. या व्यक्तीचं नाव आहे लिऊ. ३६ वर्षांच्या या लिऊला दारूची किती सवय असावी? सकाळ झाली की नाश्त्याच्या आधीच लिटरभर दारू तो रिचवतो. त्यानंतरही दिवसभर त्याचा ‘कार्यक्रम’ सुरूच असतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी, अगदी ऑफिसमध्ये ड्यूटीवर असताना, रात्रीही तो ‘टल्ली’ असतो. मुख्य म्हणजे दारू प्यायल्यावर तो अतिशय हिंसक व्हायचा, वाट्टेल ते बरळायला तर लागायचा; पण बऱ्याचदा हातापायीवरही उतरायचा. त्यामुळे आजवर अनेक नोकऱ्यांतून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला, कुटुंबीयांबरोबरचे त्याचे संबंध बिघडले, गर्लफ्रेंड सोडून गेली, आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू झाल्या. आपली ही दारू एकदाची सुटली तर बरं, असं त्यालाही वाटायला लागलं; पण मनाशी कितीही ठरवलं, तरी सकाळ झाली की त्याचा हात आपोआप दारूच्या बाटलीकडे जायचाच.

तब्बल १५ वर्षांपासून तो अट्टल दारुड्या होता. अजूनही आहे; पण आपली दारू आता कायमची सुटेल अशी आशा आता त्याला वाटू लागली आहे. त्याचंही एक कारण आहे. सेंट्रल चायनाच्या हुनान ब्रेन हॉस्पिटलमध्ये त्याच्या मेंदूत नुकतीच एक चिप बसवण्यात आली. या चीपमुळे आता त्याला दारू पिण्याची इच्छा होणार नाही, असं म्हटलं जातंय. एका ‘क्लिनिकल ट्रायल’चा हा भाग होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे’ उपाध्यक्ष हाओ वेई आणि त्यांच्या टीमनं लिऊवर ही शस्त्रक्रिया केली. ही चिप मेंदूमध्ये प्रत्यार्पित केल्यानंतर नाल्ट्रेक्झोन हे रसायन शरीरात स्रवतं. शरीर ते रसायन शोषून घेतं आणि त्याद्वारे मेंदूतील चेतातंतूंना लक्ष्य केलं जातं. नाल्ट्रेक्झोन हे असं रसायन आहे, जे सामान्यत: कुठलंही व्यसन सोडवण्याच्या उपचारांमध्ये वापरलं जातं; पण ही चिप थेट मेंदूतच बसवल्यामुळे अतिशय कार्यक्षमतेनं ती काम करेल आणि दारू कायमची सुटेल, मेंदूत चीप बसवल्यानंतर साधारण पाच महिन्यांच्या आत दारू आयुष्यभरासाठी सुटेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. दारू सोडवण्यासाठी मेंदूत चिप बसवणारा लिऊ हा चिनमधील पहिलीच व्यक्ती आहे.

मेंदूत चिप बसवण्याची शस्त्रक्रिया म्हणजे खूप किचकट आणि धोक्याची बाब असेल, असं आधी लिऊला वाटलं होतं. दारू सोडवण्यासाठी मेंदूशी छेडछाड करण्यात काही अर्थ नाही, आपली दारू तर सुटणार नाहीच; पण शस्त्रक्रिया करताना मेंदूत काही गडबड झाली, लोचा झाला तर आपले हाल कुत्राही खाणार नाही, अशी भीती त्याला वाटत होती; पण रोज दारू पिऊन असंही आपण काय आयुष्य जगतो आहोत? त्यापेक्षा ही शस्त्रक्रिया करवूनच घेऊ, असा निर्णय त्यानं घेतला आणि या शस्त्रक्रियेला तो सामोरा गेला.

मेंदूत चिप बसवायला फक्त ५ मिनिट!

लिऊ सांगतो, या शस्त्रक्रियेची आधी मला भीती वाटत होती; पण ही शस्त्रक्रिया करण्यासाठी साधे पाच मिनिटही लागले नाहीत, इतकी ती साधी आणि सोपी होती. पूर्वी दारू मिळाली नाही तर मी अतिशय अस्वस्थ व्हायचो, डिप्रेशन यायचं, मात्र आता मेंदूत चिप बसवल्यानंतर माझी दारू कायमची सुटेल, अशी मलाही आशा वाटते आहे. इतर लोकांप्रमाणे मीही आता सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल...

Web Title: Brain chip installed to solve alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.