याचा मेंदू त्याच्या डोक्यात बसवता आला तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 08:08 AM2022-03-05T08:08:43+5:302022-03-05T08:09:14+5:30

‘दिया और तुफान’ सिनेमात मिथुन चक्रवर्तीचा मेंदू त्याच्या प्रेयसीला बसवला होता. ही जादू प्रत्यक्षात करण्यामागे सध्या शास्त्रज्ञ लागले आहेत!

brain transplant and research over in the world | याचा मेंदू त्याच्या डोक्यात बसवता आला तर?

याचा मेंदू त्याच्या डोक्यात बसवता आला तर?

googlenewsNext

- अच्युत गोडबोले

१९६२ साली ‘दि ब्रेन दॅट वुडंट डाय’ नावाच्या एका चित्रपटात एक डॉक्टर आपल्या अपघातात मरण पावलेल्या प्रेयसीचं डोकं दुसऱ्या तरुणीच्या शरीरावर बसवण्याचा कसा प्रयत्न करतो आणि मग त्याची प्रेयसी त्याला कसा धडा शिकवते वगैरे दाखवलं होतं. १९९५ साली ‘दिया और तुफान’ नावाच्या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीचा कसा खून होतो; त्याचं शीर जपून (चक्क फ्रीजरमध्ये) कसं ठेवलं जातं; ते त्याची प्रेयसी मधू हिच्या शरीरावर कसं प्रत्यारोपित केलं जातं; त्या मेंदूतून आपल्या प्रियकराच्या खुनाबद्दलची तिला माहिती कशी मिळते आणि मग ती कसा बदला घेते वगैरे दाखवलं होतं. हे सगळं चित्रपटांमध्ये किंवा साहित्यामध्ये ठीक आहे. पण अशा प्रकारचं मेंदूचं प्रत्यारोपण पुढच्या काही शतकांमध्ये शक्य होईलही असा चक्क दावा केला जातोय !

पण हे खरंच शक्य आहे का ? यात तात्विक आणि तांत्रिक असे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. एखाद्या माणसाला दुसऱ्याच माणसाचा मेंदू बसवला, तर प्रत्यारोपण झालेल्या माणसाची ओळखच बदलेल. याचं कारण त्या नवीन मेंदूत डोनरच्या स्मृती, आवडीनिवडी, स्वभाव, वैचारिक पातळी असं सगळंच असेल. त्याच्या जुन्या स्मृती, आवडीनिवडी, स्वभाव हे सगळंच नव्या मेंदूनुसार बदललेलं असेल. तो आपल्या सगळ्यात जवळच्या आप्तांनाही ओळखू शकणार नाही !

दुसरा प्रश्न हा तांत्रिक आहे. प्रत्यारोपणाच्या वेळी प्रक्रियेदरम्यान मेंदूचा रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहू शकेल असं तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेलं नाहीये. शिवाय ज्यावर प्रत्यारोपण झालं आहे ते शरीर त्या मेंदूचा/डोक्याचा स्वीकार करेल का ? कारण अनेकदा प्रत्यारोपण झाल्यावर आपलं शरीर तो अवयव सहजासहजी स्वीकारत नाही. मेंदूच्या बाबतीत असं झालं तर त्या माणसाचं तोवर काय होईल ? याशिवाय डोक्यातल्या मेंदूची (ब्रेन) अदलाबदल करावी की संपूर्ण डोक्याची (हेड)? असे अनेक प्रश्न आहेत.

मेंदूच्या प्रत्यारोपणावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहेत हे मात्र खरं. 

१९०८ साली चार्ल्स गर्थी यानं एका कुत्र्याचं शीर दुसऱ्या कुत्र्याच्या शरीरावर बसवलं.१९५० च्या सुमारास अशाच एका प्रयोगात एका कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याचं शीर जोडलं. त्यामुळे हा कुत्रा चक्क दोन तोंडांचा झाला होता. पण तोही अल्पायुषी ठरला. मेंदू प्रत्यारोपणाकडे यशस्वी पावलं १९५८ सालानंतर पडायला सुरुवात झाली. त्यावर्षी व्लादिमिर डेमीखोव नावाच्या एका रशियन सर्जननं एक उपकरण बनवलं. या उपकरणाच्या मदतीनं त्यानं पूर्ण वाढ झालेल्या कुत्र्याच्या डोक्यावर एका लहान कुत्र्याच्या पिल्लाचं डोकं बसवून दाखवलं होतं. १९७० साली एका ऱ्हीसीस माकडाचं शीर दुसऱ्या माकडाला जोडलं. यात यश मिळालं असलं तरी ते यश परिपूर्ण नव्हतं. हे माकड ऐकू आणि बघू शकत होतं, पण तेही अल्पायुषी ठरलं.

२०१३ साली ‘सर्जिकल न्यूरोलॉजी इंटरनॅशनल’ या वैद्यकीय जर्नलमध्ये सर्जो कॅनॅवेरो या इटलीच्या न्यूरोसर्जननं ‘मेंदूचं प्रत्यारोपण’ करणं कसं शक्य आहे आणि त्याची प्रक्रिया कशी असेल याबद्दल एक लेख लिहिला होता. २०१७ साली आपण मानवी शीर दुसऱ्या मानवाच्या शरीराला जोडून इतिहास घडवणार आहोत अशी घोषणाही त्यानं केली होती. त्याच्या आत्मविश्वासानं  सगळ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं !

माणसांवर हा प्रयोग करण्याआधी कॅनॅवेरोनं माकडांवर केलेला प्रयोग पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. कारण प्रत्यारोपण केलेलं माकड फक्त २० तास जिवंत राहू शकलं. असं असलं तरी तो खचला नाही. २०१६ साली त्याला एका रशियन कोट्यधीशाकडून आर्थिक मदतही मिळाली. त्यानं आपला सहकारी डॉ. शाओपिंग रेनच्या मदतीनं चीनच्या हर्बिन मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मृत शरीरांच्या शीराची अदलाबदल केली. ती यशस्वीही झाली. आता जिवंत माणसावर प्रयोग करायला ही मंडळी तयार झाली होती. असं प्रत्यारोपण करवून घेण्यासाठी वॅलेरी स्पिरीर्डोनोव्ह नावाचा एक रशियन आयटी तज्ज्ञ तयार झाला होता. लहानपणापासूनच एका गंभीर आजारामुळे त्याला शारीरिक अपंगत्व होतं. तो केवळ ३ वर्षं जगेल असं त्याच्या डॉक्टरनं सांगितलं होतं. हे प्रत्यारोपण यशस्वी झालं तर आपण पूर्ण बरे होऊ आणि सक्षम आयुष्य जगू शकू अशी त्याला आशा वाटत होती. २०१८ सालच्या ऑक्टोबर महिन्यात जगातली सगळ्यात पहिली मेंदूच्या अदलाबदलाची शस्त्रक्रिया पार पडणार होती.

कॅनॅवेरोला आपण जे करतोय त्याबद्दल दांडगा आत्मविश्वास असला, तरी वैद्यकीय जगतात याबद्दल प्रचंड चर्चा आणि नाराजी पसरलेली होती. दरम्यान स्पिरीर्डोनोव्हनं या प्रयोगात सहभागी व्हायला नकार दिला. गुंतवणूकदारानंही आपली आर्थिक मदत थांबवली. एकूण वातावरण कॅनॅवेरोच्या विरोधात गेलं आणि जिवंत शरीरावरचा हा प्रयोग होऊच शकला नाही ! पण भविष्यात ‘मेंदू’चं प्रत्यारोपण’ ही आता अतर्क्य वाटणारी कल्पना कदाचित प्रत्यक्षात उतरू शकेल अशी तज्ज्ञांना आशा वाटते आहे.

या प्रत्यारोपणा संदर्भातली प्रश्नावली बरीच मोठी आहे. एखादा मागच्या जन्मीचा राजा जर या जन्मी भिकारी असेल, तर त्याचे विचार कदाचित राजासारखे असतील, पण तो इतरांसाठी मात्र भिकारीच असेल असं १७ व्या शतकातल्या जॉन लॉक या प्रसिद्ध तत्वज्ञानं ‘आत्मा आणि शरीर’ यांच्यावर भाष्य करताना एकदा म्हटलं होतं. मेंदूच्या प्रत्यारोपणामध्येही नेमकं असंच काही तरी घडण्याची शक्यता आहे. तरीही उद्याच्या जगात ‘ब्रेन ट्रान्सप्लांट’चं तंत्रज्ञान विकसित होऊ शकलंच तर अनेकांना जीवनदान आणि सक्षमतेनं जगण्याची अजून एक संधी मिळेल; पण गोंधळही प्रचंड वाढेल यात शंका नाही !
godbole.nifadkar@gmail.com

Web Title: brain transplant and research over in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.