शिर्डीच्या साई मंदिराच्या शाखा काढणे आहेत !
By सुधीर लंके | Published: October 7, 2023 12:15 PM2023-10-07T12:15:38+5:302023-10-07T12:16:00+5:30
देशभरात साई मंदिराच्या शाखा, जास्त 'देणगी' देणाऱ्या भक्ताला जास्त 'सुविधा' आणि साई मंदिरांची संघटना बांधणे; ही साई संस्थानची 'उद्दिष्टे' काय सांगतात?
सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत,अहमदनगर
चहावाल्यांच्या गावोगाव शाखा निघाल्या. त्यातून एकाच नावाचा चहा गावोगावी पोहोचला. साखळी पद्धतीमुळे एकाच नावाचे मॉल देशभर विविध शहरांत दिसतात. नामवंत ब्रॅण्डच्या फ्रेंचाइसी आता गावोगावी दिसतात, मग मंदिरांच्या शाखा का नकोत? म्हणूनच बहुधा साई मंदिराच्या शाखा उभारण्याचे धोरण शिर्डीच्या साईबाबा संस्थानने घेतलेले दिसते.
या संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गत आठवड्यात तीन धोरणे जनतेसमोर चर्चेसाठी ठेवली आहेत. साईबाबांच्या शिकवणुकीच्या प्रचार, प्रसारासाठी देशभर त्यांची मंदिरे निर्माण करायची; हे त्या तीनपैकी एक महत्त्वाचे धोरण होया एखाद्या राज्याचे सरकार अथवा कोणाही संस्थेने पाच एकर जागा दिल्यास शिर्डीचे साई संस्थान तेथे जाऊन शिर्डीसारखे साई मंदिर उभारेल. रुग्णालय व अन्नदानासारख्या सुविधा तेथे निर्माण केल्या जातील. समजा, हे असे मॉडेल काही कारणाने शक्य नसेल तर जे कुणी साई मंदिर उभारेल त्यांना बांधकामाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा पन्नास लाख रुपये देण्याचीही साई संस्थानची तयारी आहे. चर्चेसाठी समोर ठेवलेले दुसरे धोरण संस्थानने भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांबाबत आखले आहे. म्हणजे साई संस्थानच्या दानपेटीत भक्त जेवढे दान / देणगी देतील; त्या तुलनेत त्यांना दर्शन, आरती या सुविधा मिळतील. याचा सोपा अर्थ असा, की ज्याचे धन जास्त त्याला आरतीची अधिक सुविधा!
तिसरे धोरण म्हणजे देशभरात (कशाला?-आपण जगभरात म्हणू) जेथे कोठे साई मंदिरे आहेत त्यांची एक असोसिएशन म्हणजे संघटना बांधणे. देशात मंडल आणि कमंडल याचे राजकारण झाले. देव, धर्म, प्रार्थनास्थळे राजकारणासाठी वापरली गेली. आता साईबाबा संस्थाननेही अधिकृतपण मंदिर बनाएंगेचा नारा दिला आहे. या संस्थानचा कारभार पाहण्यासाठी राज्य सरकार विश्वस्त मंडळ नियक्त करते. सध्या सरकार नियुक्त विश्वस्त मंडळ कार्यरत नाही. अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती मंदिराचे कामकाज पाहते.समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही तीन प्रमुख धोरणे जाहीर केली.
पहिला प्रश्न निर्माण होतो की, केवळ पर्यायी व्यवस्था म्हणून कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीला असा धोरणात्मक निर्णय का घ्यावासा वाटत आहे? समितीला असे अधिकार आहेत का? दुसरा मुद्दा, साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करायचा म्हणजे नेमके काय करायचे? साईबाबा हिंदू होते की मुसलमान? हे निश्चितपणे सांगता येत नाही, असे संस्थानने प्रसिद्ध केलेल्या साई चरित्रातच अधिकृतपणे म्हटलेले आहे. साईबाबा बोलताना आपणाला परमेश्वराचा सेवक म्हणजे 'बंदा' म्हणवून घेत. आशीर्वाद देताना 'अल्ला भला करेगा' हे शब्द ते वापरत. ते कधीही 'मीच परमेश्वर आहे असे म्हणत नसत. 'यादे हक्क' म्हणजे मी परमेश्वराची 'याद' करतो, स्मरण करतो, असे ते सांगत. साईबाबा मशिदीत राहत. त्यांना एकदा प्रश्न विचारला गेला की तुमचा धर्म व पंथ कोणता? त्यावर त्यांनी उत्तर दिले कबीर' तुमची जात व पोटजात काय? यावर त्यांचे उत्तर होते 'परवरदिगार', साईबाबा ज्या मशिदीमध्ये राहत असत, तिला द्वारकामाई म्हणतात. येथून रामनवमीची मिरवणूक काढण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. जी आजही सुरू आहे. हे सगळे पाहिले तर साईबाबांचे वागणे धर्मनिरपेक्ष दिसते.
मग, केवळ साई मंदिरे बांधून त्यांच्या विचारांचा प्रसार कसा काय होईल? अधिकची मंदिरे बांधल्याने साईबाबा एका (च) धर्मात बंदिस्त होणार नाहीत हे कशावरून? साईबाबांच्या निर्वाणानंतर साई संस्थान समिती स्थापन झाली. त्यात फातीया बाबा पै (पीर) मोहम्मद यांचा समावेश होता. त्यानंतर सामी खातीब या मुस्लीम व्यक्तीला विश्वस्त मंडळात स्थान मिळाले. साईबाबांचे मुस्लीमही भक्त होते. मात्र, वरील अपवाद वगळता काँग्रेस व भाजप सरकारच्याही काळात मुस्लिमांना विश्वस्त मंडळात फारसे स्थान दिले गेलेले नाही. तसा विचारच केला गेला नाही. म्हणून मंदिर निर्माणातून काय साधायचे आहे? ही शंका उत्पन्न होते.
परभणी जिल्ह्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मगाव असल्याचा दावा झाला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ शोधण्यामागे त्यांची जात व गोत्र कोणते? हे सांगण्याचा काही मंडळींचा प्रयत्न आहे. त्यासाठी पाथरीचा वाद उपस्थित केला जातो, असा शिर्डी ग्रामस्थांचा आरोप आहे. हा वाद जिवंत असताना आता मंदिर निर्माणाचा नवीनच अजेंडा पुढे आला आहे. या धोरणाला शिर्डीतून विरोध सुरू झाला आहे. शिर्डी संस्थान हे धनवान आहे. असे असताना या गावात अलीकडे वरिष्ठ महाविद्यालय आले. नगर जिल्ह्यात एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. संस्थान असे महाविद्यालय निर्माण करू शकते; पण तसा प्रयत्न होत नाही. अनेक ठिकाणी शाळांना इमारती नाहीत. साई संस्थानचे धन शाळा उभारायला, मोडक्या शाळा सावरायला, गोरगरिबांसाठी आरोग्याच्या सुविधा दवाखाने उघडायला वापरायचे की देशभरात जाऊन साईबाबांच्या मंदिराच्या शाखा काढायच्या? हा खरा प्रश्न आहे... त्या प्रश्नाने खुद्द साईबाबाही अस्वस्थ असतील!