भाजपाच्या विजय मार्गात गोटेंचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 02:54 AM2018-11-23T02:54:26+5:302018-11-23T02:54:50+5:30

धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाविरुद्ध पुकारलेले बंड हे पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे. भाजपामध्ये अलीकडे सुरू झालेल्या एककल्ली कारभाराला टक्कर देण्यासाठी गोटे पूर्ण तयारीने मैदानात उतरलेले दिसत आहेत.

 Break the knot on BJP's Vijay Marg | भाजपाच्या विजय मार्गात गोटेंचा खोडा

भाजपाच्या विजय मार्गात गोटेंचा खोडा

Next

- मिलिंद कुलकर्णी (निवासी संपादक, लोकमत)

धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाविरुद्ध पुकारलेले बंड हे पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे. भाजपामध्ये अलीकडे सुरू झालेल्या एककल्ली कारभाराला टक्कर देण्यासाठी गोटे पूर्ण तयारीने मैदानात उतरलेले दिसत आहेत. नाना पटोले, आशिष देशमुख, एकनाथराव खडसे यांच्यापेक्षा वेगळा मार्ग चोखाळत त्यांनी जनतेच्या न्यायालयात पक्षश्रेष्ठी आणि पक्षांतर्गत विरोधकांना खेचले आहे. महापालिका निवडणुकीतील हार-जीतपेक्षा आपण तत्त्वाची लढाई लढलो, असा संदेश देण्याची पार्श्वभूमी गोटे यांनी अतिशय खुबीने तयार केली असून त्यात ते रोज भर घालत आहेत.
विदर्भातील मूळ रहिवासी असलेले गोटे हे वडिलांच्या नोकरीमुळे खान्देशातील धुळ्यात आले. अभ्यासू, चळवळ्या पिंड असल्याने जनसंघात गेले. प्रचारक झाले. पुढे शेतकरी संघटनेत गेले. (संघाने मला शेतकरी संघटनेत पाठविले, असे गोटे सांगतात. पण संघ स्वत:चा भारतीय किसान संघ असताना असा आदेश कसा देईल, असा सवाल स्थानिक स्वयंसेवक विचारतात) २८ वर्षे पत्रकारिता केली. शरद जोशी यांच्याशी बिनसल्याने स्वत:ची लोकसंग्राम संघटना आणि महाराष्टÑ समाजवादी पक्ष स्थापन केला. बेरोजगारांच्या विषयावर आंदोलने केली. १९९५ मध्ये पहिल्यांदा धुळ्यातून अपक्ष आमदार निवडून आले. गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक झाली. तेथून सत्तेच्या वर्तुळात स्थिरावले. किसान ट्रस्टच्या माध्यमातून शिवतीर्थाची उभारणी करीत असताना बनावट स्टॅम्प पेपरच्या घोटाळ्यातील आरोपी तेलगीकडून घेतलेली देणगी आणि घोटाळ्यात असलेला कथित सहभाग, चार वर्षांची तुरुंगवारी हा खळबळजनक प्रवासदेखील गोटे यांनी केला. एवढ्या व्यापातही त्यांनी धुळे शहरावर पकड कायम ठेवली ती त्यांच्या स्वभाव व कार्यशैलीने. अतिक्रमण हटाव मोहीम, विकासकामे ही त्यांची बलस्थाने आहेत. प्रत्येक वेळी विरोध झाला असता विरोधकांना अंगावर घेण्याच्या वृत्तीमुळे जनसामान्यांमध्ये ते लोकप्रिय झाले. २००१ मध्ये पत्नी हेमा गोटे या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. राष्टÑवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे हे त्यांचे विधानसभा निवडणुकीतील परंपरागत प्रतिस्पर्धी तर अलीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी. तीन वेळा धुळे शहराचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध लढाई असेच प्रत्येक निवडणुकीला स्वरूप दिले. यंदा त्यांचे लक्ष्य डॉ. भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल आहेत. सत्ता राबवित असताना सगळ्यांचे संपूर्ण समाधान करता येत नाही. त्यामुळे असंतुष्ट, असमाधानी लोकांची संख्या मोठी असते. गोटे यांचा जोर याच असंतुष्टांवर आहे. प्रस्थापित विरुद्ध निष्ठावंत, गुंडगिरी विरुद्ध कोरी पाटी, भ्रष्टाचारी विरुद्ध प्रामाणिक, बहुजन विरुद्ध अल्पसंख्य असे स्वरूप त्यांनी निवडणुकीला दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आमदारकीचा राजीनामा दिला नसला तरी लोकसंग्रामच्या माध्यमातून उमेदवार उभे करून बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. जळगावात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन हे प्रभारी असले तरी आमदार सुरेश भोळे हे निवडणूक प्रमुख होते, हा न्याय धुळ्याला लावण्यात आला नाही. हाच मुद्दा गोटे मांडत असून महाजन यांच्या ‘जळगाव पॅटर्न’, संकटमोचक या प्रतिमेला आव्हान देत आहेत. खडसे यांना ‘गुरुबंधू’ संबोधून लढाईला वेगळी दिशा गोटेंनी जाणीवपूर्वक दिली आहे.

Web Title:  Break the knot on BJP's Vijay Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.