‘ब्रेकींग’ आणि ‘शोध’
By admin | Published: October 27, 2016 04:39 AM2016-10-27T04:39:33+5:302016-10-27T04:40:11+5:30
देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टाटा उद्योग समूहाच्या नेतृत्वात नुकताच जो बदल झाला, त्यातून दोन बाबी ठळकपणे समोर आल्या. सटरफटर बातम्यादेखील ‘ब्रेकींग न्यूज’
देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टाटा उद्योग समूहाच्या नेतृत्वात नुकताच जो बदल झाला, त्यातून दोन बाबी ठळकपणे समोर आल्या. सटरफटर बातम्यादेखील ‘ब्रेकींग न्यूज’ म्हणून सादर करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आणि शोध पत्रकारितेत आपला हातखंडा असल्याचा डिंडिंम वाजवित राहाणाऱ्या एकूणातीलच माध्यमांचे पितळ उघडे पडले आणि त्याचवेळी अशा महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत किती आणि कशी गोपनीयता बाळगणे गरजेचे असते याचा वस्तुपाठ जगासमोर आला. कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी आणि म्हटले तर धक्कादायक बाब अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत एकालाही ती ‘ब्रेक’ करता आली नाही वा शोध पत्रकारिता करणाऱ्या नाकांपैकी एका नाकालाही तिचा वास लागला नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे या दोन्ही बाबी म्हणजे माध्यमांचीदेखील एकप्रकारची बुवाबाजीच असते. माध्यमांच्या जगतात अलीकडच्या काळातील ज्या एकमात्र बातमीचा खऱ्या अर्थाने ब्रेकींग न्यूज म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो ती बातमी म्हणजे ‘प्रिन्सेस डायना’चा अपघाती मृत्यू! या बातमीच्या जोडीनेच जगाला ‘पॅपराझी’ या शब्दाची नव्याने ओळखही झाली. शोध पत्रकारितेच्या बाबतीतही असेच. कोणत्याही संस्थेच दोन अथवा अधिक गट असतात व त्यातील एखादा गट ‘आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर’ माध्यमांना माहिती पुरवतो व त्यातूनच शोध पत्रकारितेचा जन्म होतो. अलीकडच्या काळात पुन:पुन्हा प्रत्ययास येणारी बाब म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठका. पूर्वी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री किंवा त्यांचा प्रतिनिधी माध्यमांना अधिकृतपणे जे आणि जेवढे सांगेल तेच प्रसिद्ध होत असे. आता मात्र बैठक सुरु असतानाच आतील बातम्या ‘लीक’ होत असतात. इतकेच कशाला, केन्द्रीय अर्थसंकल्प छपाईच्या प्रारंभी अर्थमंत्री शिरा वगैरे करतात आणि गोपनीयतेचे पर्व सुरु होते. पण अर्थसंकल्पही तसा राहात नाही हे अनेकदा आढळून येते. अखेर गोपनीयतेचेदेखील एक महत्व असते.