ब्रिटिश संसदेत भारतीयांचे प्रतिनिधित्व वाढणार!

By admin | Published: June 11, 2017 06:13 PM2017-06-11T18:13:03+5:302017-06-11T20:26:57+5:30

ब्रिटनच्या मध्यावधी निवडणुकीत हाऊस आॅफ कॉमन्समध्ये निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या १२ खासदारांचे मी अभिनंदन करतो. १८९२ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या

British representation will increase in the British Parliament! | ब्रिटिश संसदेत भारतीयांचे प्रतिनिधित्व वाढणार!

ब्रिटिश संसदेत भारतीयांचे प्रतिनिधित्व वाढणार!

Next

 -राजेंद्र दर्डा 
(लेखक लोकमतचे एडिटर इन चिफ आहेत)

ब्रिटिश हाऊस आॅफ कॉमन्सकरिता (लोकसभा) पंतप्रधान थेरेसा मे यांनी खेळलेला मध्यावधी निवडणुकीचा जुगार फसला आहे. ६५० सदस्यांच्या हाऊस आॅफ कॉमन्समध्ये सत्तारुढ हुजूर पक्षाला ३१८ तर मजूर पक्षाला २६१ जागा मिळाल्या आहेत. इतर छोट्या पक्षांच्या मदतीने थेरेसा मे पंतप्रधानपदी कायम राहतील, अशी अपेक्षा आहे.
मध्यावधी निवडणुकीत हाऊस आॅफ कॉमन्समध्ये निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या १२ खासदारांचे मी अभिनंदन करतो. १८९२ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या रुपाने पहिल्यांदाच हाऊस आॅफ कॉमन्समध्ये भारतीय नागरिकाला संधी मिळाली होती. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात आणखी दोन पारशी बांधव हाऊस आॅफ कॉमन्समध्ये निवडून गेले. १५० वर्षे भारतावर राज्य करणा-या ब्रिटिश सत्तेत भारतीय वंशजांना प्रवेश मिळणे सोपे नव्हते. विसाव्या शतकात भारतात स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. ब्रिटिश साम्राज्य भारतावरील पकड सैल करण्यास मुळीच तयार नव्हता. ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्याही कमी होती. त्यामुळे नंतर दीर्घकाळ खासदार म्हणून भारतीय निवडून आला नाही. अनेक वर्षानंतर १९८७ मध्ये भारतीय किथ वाझ हाऊस कॉमन्समध्ये निवडून आले. या निवडणुकीत बाजी मारून ते आठव्यांदा हाऊस आॅफ कॉमन्समध्ये गेले आहेत.
मला आठवते, १९७२ साली विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये मी दीर्घकाळ वास्तव्यास असताना ब्रिटिशांचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार चांगला नव्हता. त्याच काळात एक आगळीवेगळी घटना घडली.  युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन याने अचानक एकाच रात्रीतून युगांडामधील सर्व भारतीयांना चलो जावो चा आदेश दिला आणि १९७२ च्या आॅगस्टमध्ये युगांडामधून ३० हजार भारतीय शरणार्थी ब्रिटनमध्ये आले. यात गुजराती नागरिकांची संख्या मोठी होती. एक मात्र नक्की, त्यावेळी या सर्व भारतीयांची व्यवस्था तातडीने केली गेली. आज बघता बघता ब्रिटनमधील भारतीयांची संख्या १४ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळेच या मध्यावधी निवडणुकीत कॉन्झरवेटिव्ह (हुजूर) पक्षाने १७ आणि लेबर (मजूर) पक्षाने १४ भारतीय वंशाच्या नागरिकांना उमेदवारी दिली होती. येथील भारतीयांमध्ये पंजाबी व गुजराती बांधवांची संख्या मोठी आहे. हे सर्व सुशिक्षित आणि मेहनती आहेत. यातील बहुतांश मध्यमवर्गीय व उच्चमध्यम वर्गीय आहेत. या सर्वांबद्दल तेथे आदर आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच लंडनला गेलेल्या यवतमाळ अमरावतीच्या आजीबाई बनारसे या अशिक्षित महिलेने लंडनमध्ये निर्माण केलेली स्वत:ची ओळख सर्वांनाच स्फूर्ती देणारी आहे. आजीबाई बनारसे यांच्या गोल्डन्स ग्रीनमधील २५ हूपलेन हे त्यांचे घर आमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडे असायचे.
या निवडणुकीत प्रीतकौर गिल आणि तनमनजितसिंग धेसी हे शिख भारतीय विजयी झाले आहेत. यापैकी प्रीत कौर या पहिल्या शीख महिला खासदार ठरल्या आहेत, तर धेसी यांच्या रुपाने हाऊस आॅफ कॉमन्समध्ये पहिल्यांदाच शीख पगडी दिसणार आहे. प्रीती पटेल सारख्या तरुण गुजराती महिला तेथे सत्तेत आहेत. या सर्वांमुळे भविष्यात जास्तीत जास्त भारतीय वंशज तेथील सत्तेत येतील, याची मला खात्री आहे. या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !

 

Web Title: British representation will increase in the British Parliament!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.