संत काव्याचे व्यापकत्व
By admin | Published: January 19, 2017 12:00 AM2017-01-19T00:00:58+5:302017-01-19T00:00:58+5:30
संख्यात्मक भूमिकेतून मराठी साहित्यातील आणि काव्य विश्वातील त्यांचे व्यापकत्व अबाधित आहे.
मराठी साहित्यसृष्टीत विचारतत्व आणि प्रबोधनतत्वाने जसे संत साहित्य हे व्यापक आहे तसेच संख्यात्मक भूमिकेतून मराठी साहित्यातील आणि काव्य विश्वातील त्यांचे व्यापकत्व अबाधित आहे. प्राचीन संतकाव्याचे ज्येष्ठ संशोधक जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांनी प्राचीन मराठी संतकवी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, एकंदर जुनी मराठी कविता किती आहे, असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर त्याला मी एवढेच उत्तर देईन की, जगातील दुसऱ्या कोणत्याही भाषेत एवढी कविता नाही.
कमीतकमी १५ लाखाहून अधिक जुनी मराठी कविता आज उपलब्ध आहे आणि त्यातील १० लाखाहून अधिक काव्यसंख्या ही केवळ संतकाव्याची किंवा संत कवितेची आहे. त्यात अभंग, गौळण, भारुड, ओवी, पदे, रुपके यांचा समावेश आहे. नुसत्या ज्ञानदेवांची ओवी आणि अभंगरचना १० हजाराहून अधिक आहे. संत एकनाथांनी साठ हजार, रामदासांची दहा हजार, रामी रामदासांची दहा हजार, तुकाराम महाराज साडेचार हजार, नामदेवरायांची तीस हजार, याशिवाय निळोबाराय चोखोबा, जनाबाई, रमावल्लभदास, कृष्णदयार्णव, मुक्तेश्वर, सावतोबा, कान्होपात्रा, दासतुका, नरहरीमहाराज, शेख महंमद, गोरा कुंभार, जगमित्र नागा, माणकोजी बोधला, सेनान्हावी, कान्होपाठक, चांगदेव, बहिरा पिसा या संतांच्या काव्याचा समावेश करावा लागेल. या साऱ्या संतांचा कालखंड हा बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतचा आहे. त्या कालखंडातील राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता व छपाईची, प्रसाराची, लोकसंपर्काची माध्यमे नसतानाही त्यांचे काव्य मराठी मुलुखातील सामान्य माणसापर्यंत पोचले होते. काव्याची मुख्य तीन लक्षणे सांगितली जातात. १) प्रसाद २) माधुर्य आणि ३) ओज. मराठी संतांची कविता तिच्यातील भावपूर्ण भक्तिरसामुळे प्रासादिकतेने ओथंबलेली आणि शब्दसौंदर्यामुळे माधुर्याने नटलेली तर प्रबोधनाच्या भूमिकेतून ‘ओज’ तत्वाने भारलेली होती. ज्ञानोबांनी एक सुंदर रुपक मांडले आहे.
अंगाचेनि सुंदरपणे।
लेणिया अंगचि होय लेणे।
तेथ अलंकारिले कवन कवणे।
हे निर्वचेना।।
एखाद्या सौंदर्यवतीने अंगावर दागिने घालावेत व ती आणखी सुंदर दिसावी. अशा वेळी तिला वाटते की, मी मुळचीच सुंदर आहे. म्हणून माझ्यामुळेच दागिने नटले आहेत व दागिन्यांना वाटते, ही आमच्यामुळे सुंदर दिसते आहे. इथे कुणी कुणाला सुंदर केले वा अलंकारिले हे समजत नाही. तसेच संत काव्यामध्ये भावसौंदर्याने शब्द नटले की, शब्द सौष्टवाने भावतरंग उमटले. हे समजत नाही. पण संत काव्याच्या शब्दसौष्टवाने मराठी भाषा मात्र नटली हे निश्चित.
-डॉ. रामचंद्र देखणे