भाई वैद्य एक दंतकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 11:01 PM2018-04-02T23:01:50+5:302018-04-02T23:01:50+5:30

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा ऐकण्याची सवय झालेल्या आपल्या वर्तमानाला भाई वैद्य दंतकथा वाटावेत. पुलोद सरकारमध्ये ते गृह राज्यमंत्री होते (१९७८-१९८०). तेव्हा ३ लाख रुपयांची लाच घेऊन आलेले एका मोठ्या स्मगलरचे साथीदार त्यांनी पोलिसांच्या हवाली करुन तुरुंगात पाठवले. 

Brother Vaidya a legend | भाई वैद्य एक दंतकथा

भाई वैद्य एक दंतकथा

Next

- कपिल पाटील, आमदार

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा ऐकण्याची सवय झालेल्या आपल्या वर्तमानाला भाई वैद्य दंतकथा वाटावेत. पुलोद सरकारमध्ये ते गृह राज्यमंत्री होते (१९७८-१९८०). तेव्हा ३ लाख रुपयांची लाच घेऊन आलेले एका मोठ्या स्मगलरचे साथीदार त्यांनी पोलिसांच्या हवाली करुन तुरुंगात पाठवले. 

समाजवादी पक्षाची निशाणी होती वडाचं झाड. भाई वैद्य पुरातन वटवृक्षासारखे होते. १९४६ ला काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया आणि एस. एम. जोशी यांनी केली. तेव्हा मिसरुडही न फुटलेले तरुण भाई वैद्य त्या चळवळीत सामिल झाले होते. पक्षाचं नाव बदललं पण समाजवादाचा झेंडा, सोशलिस्ट पार्टीचा झेंडा भाईंनी अखेरपर्यंत खाली ठेवला नाही. भाई कट्टर सत्यशोधक. फुले आणि आंबेडकरांना मानणारे. स्वातंत्र्यांच्या चळवळीत आणि गोवामुक्ती चळवळीत भाई वैद्य जसे होते त्याहून अधिक तडफेने ते समतेच्या संगरात सामिल होत होते. हमीद दलवाइर्ना भाईंनी दिलेली साथ आणि मुस्लिम सत्यशोधक चळवळीत त्यांनी स्थापनेपासून दिलेलं योगदान पुन्हा पुन्हा आठवावं असं आहे. आणीबाणी लागू झाली तेव्हा ते पुण्याचे महापैार होते. पण मिसा बंदी होऊन १९ महिने तुरुंगात गेले. आणीबाणी गेली. जनता सरकार आलं. पुलोद सरकारमध्ये भाई गृहराज्यमंत्री बनले. त्यांनी पहिलं काय केलं असेल, तर हाफ पॅन्टीतील पोलिसांना फुल पॅन्टीत आणलं. पोलिसांना प्रतिष्ठा दिली. पोलिसांना त्यांनी लोकांमध्ये आणलं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं विधेयक त्यांनीच सर्वप्रथम विधानसभेत मांडलं. भारत यात्रेत चंद्रशेखर यांच्या समवेत ते कन्याकुमारी - दिल्ली असे चार हजार किलोमीटर चालले. राष्ट्र सेवा दलाचे ते काहीकाळ अध्यक्ष होते. मंडल आयोगाच्या चळवळीतलं त्यांचं वैचारिक मार्गदर्शन मोलाचं ठरलं. अलिकडच्या काळात शिक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी देशभर जागृतीची मोहीमच हाती घेतली होती. सेवा दल आणि समाजवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या शिबिरांमधून भाई अगदी परवा परवा पर्यंत अभ्यासवर्ग घेत होते. गांधीवादी ते नक्षलवादी. आंबेडकरवादी ते कम्युनिस्ट. साऱ्यांनी लोकशाही समाजवादी विचारांसाठी एकत्र यावं यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्न करत होते. 

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भाई अधिकच अस्वस्थ होते. शरीर थकलं होतं तरी दौरे थांबवत नव्हते. खणखणीत आवाज आणि तल्लख स्मरणशक्ती यांनी त्यांना अखेरपर्यंत साथ दिली होती. त्या जोरावर सामान्य कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय नेत्यांपर्यंत प्रत्येकाशी ते बोलत होते, सांगत होते एकत्र यायला हवं.  एकत्र तर यायलाच हवं पण आधार द्यायला आधारवड कुठे असणार आहे?

 

Web Title: Brother Vaidya a legend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.