Bruce Lee: ...जास्त पाणी प्याल्याने ब्रूस लीचा मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 02:40 PM2022-11-25T14:40:13+5:302022-11-25T14:44:03+5:30

Bruce Lee: ब्रूस ली सारखा फिट माणूस या आयुष्यातून इतक्या अकाली कसा काय निघून जाऊ शकतो, यावर आजही अनेकांचा विश्वास नाही. त्याच्या मृत्युबद्दल अनेक शंकाकुशंका तेव्हाही व्यक्त करण्यात आल्या होत्या. पण, त्याचं खरंखुरं उत्तर काेणालाही मिळू शकलं नाही.

...Bruce Lee died from drinking too much water? | Bruce Lee: ...जास्त पाणी प्याल्याने ब्रूस लीचा मृत्यू?

Bruce Lee: ...जास्त पाणी प्याल्याने ब्रूस लीचा मृत्यू?

Next

ब्रूस ली ! ओळखता तुम्ही या व्यक्तीला? जुलै १९७३ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी म्हणजे सुमारे ५० वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. पण, आजही जुन्या आणि नव्या पिढीतल्या अनेक लोकांना ब्रूस ली माहीत आहे. नव्हे, तो त्यांच्या काळजात बसलेला आहे. कारण त्याच्या काळात तो जगातला अतिशय उत्कृष्ट असा मार्शल आर्टिस्ट समजला जात होता. मार्शल आर्टवरील त्याचे चित्रपट आणि त्याच्या अचाट सामर्थ्यानं, शक्तीनं, मार्शल आर्टवरच्या त्याच्या प्रभुत्वामुळे संपूर्ण जगभरात त्यानं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्या वेळच्या तरुणांच्या गळ्यातला तर तो ताईत होता आणि प्रत्येकालाच आपण ब्रूस ली व्हावं असं मनापासून वाटत होतं. त्यामुळे संपूर्ण जगभरातच त्याच्या मार्शल आर्टची, त्याच्या ॲक्शन्सची कॉपी केली जात होती. ब्रूस ली हा ‘ब्रूस ली’ कसा झाला, याबद्दल सगळ्यांनाच अतिशय कुतूहल होतं आणि त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण, आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना अगदी अचानक वयाच्या ३२ व्या वर्षी त्याचं निधन झालं. त्याचं निधन म्हणजे सगळ्यांनाच एक मोठा धक्का होता. 

ब्रूस ली सारखा फिट माणूस या आयुष्यातून इतक्या अकाली कसा काय निघून जाऊ शकतो, यावर आजही अनेकांचा विश्वास नाही. त्याच्या मृत्युबद्दल अनेक शंकाकुशंका तेव्हाही व्यक्त करण्यात आल्या होत्या. पण, त्याचं खरंखुरं उत्तर काेणालाही मिळू शकलं नाही.

ब्रूस लीच्या मृृत्यूची चार प्रमुख कारणं त्यावेळी सांगितली जात होती. त्यातलं पहिलं कारण म्हणजे ड्रग माफियांनी ब्रूस लीची हत्या केली. दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे ब्रूस ली विवाहित असूनही त्याचे  विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे त्याच्या अभिनेत्री पत्नीनंच ब्रूस लीचा विष पाजून खून केला! तिसऱ्या कारणावर अनेकांचा विश्वास आहे, ते म्हणजे ब्रूस ली मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं  सेवन करीत होता. ड्रग्जच्या अतिरेकी सेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असं मानलं जातं. त्याच्या मृत्यूचं आणखी एक कारण सांगितलं जातं, ते मात्र थोडं विचित्र आहे. यासंदर्भात काहीजण सांगतात, ब्रूस ली हा जन्मत:च ‘शापीत’ होता. त्यामुळेच कारकीर्द आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्याला हे जग सोडून जावं लागलं. 

ब्रूस लीचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी ‘सेरेब्रल एडेमा’ किंवा मेंदूला सूज आल्याने  त्याचा मृत्यू झाला असं कारण देण्यात आलं होतं. ब्रूस ली जी वेदनाशामक औषधं घेत होता, त्यातून आलेल्या प्रतिक्रियेमुळे हा मृत्यू झाला, असं त्यांचं निदान होतं. आता मात्र संशोधकांनी त्याच्या मृत्यूचं नवंच कारण समोर आणलं आहे. शरीरातील अतिरिक्त पाणी शरीराच्या बाहेर टाकण्यास त्याची किडनी असमर्थ ठरल्यानेच ब्रूस लीचा मृत्यू झाला! अर्थातच अतिरेकी प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे ब्रूस लीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे. स्पेनमधील किडनी-तज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘क्लिनिकल किडनी जर्नल’च्या ताज्या आवृत्तीमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. ब्रूस लीचा आहारच असा होता की, त्यात द्रव पदार्थांचं प्रमाण खूपच जास्त प्रमाणात होतं. भरपूर पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, प्रथिनांचा (प्रोटिन्स) खूपच जास्त प्रमाणात समावेश असलेली पेयं आणि गांजासारखे अंमली पदार्थ यांचा वापर ब्रूस ली मोठ्या प्रमाणात करीत असे, असं मानलं जातं. यामुळे जास्त प्रमाणात तहान लागते आणि द्रव आहार आणखी वाढत जातो. अशावेळी रक्तातील सोडियमची पातळी आणखी कमी होते. त्यालाच हायपोनेट्रेमिया असं म्हणलं जातं. अभ्यासकांच्या मते ब्रूस लीचा मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या. द्रव पदार्थ फिल्टर करण्यास त्याच्या किडन्या पूर्णपणे असमर्थ होत्या. त्यामुळे त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पाण्याचा वेळीच निचरा होऊ न शकल्यानं त्याच्या मेंदूलाही सूज आली आणि त्यातच ब्रूस लीचा मृत्यू झाला..

जास्त पाण्यानं खरंच मृत्यू होतो?
ब्रूस लीच्या मृत्युबद्दल करण्यात आलेल्या ताज्या दाव्यामुळे आणखी एका नव्याच प्रश्नाची चर्चा आता जगभर सुरू झाली आहे. खरंच अतिरिक्त पाणी प्याल्यामुळे मृत्यू होतो का? काहीजण मुळातच ‘जास्त’ पाणी पितात किंवा काही वेळा डॉक्टरही आपल्या रुग्णांना ‘जास्त’ पाणी पिण्याचा सल्ला देतात. मग पाण्याचं ‘योग्य’ प्रमाण नेमकं किती, यावरूनही आता अभ्यासकांमध्ये दोन गट पडले आहेत. काही जणांचं म्हणणं आहे, गरजेपेक्षा खूप जास्त पाणी प्यायल्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत किडनी फेल होऊ शकते, तर काही जणांचं म्हणणं आहे, अशी शक्यता दुर्मीळात दुर्मीळ आहे.

Web Title: ...Bruce Lee died from drinking too much water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.