बौद्ध समाजाने आता थोडेसे आत्मपरीक्षण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 04:15 AM2016-10-11T04:15:35+5:302016-10-11T04:15:35+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ साली नागपूर मुक्कामी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बुद्ध धम्माची जी दीक्षा घेतली, त्या ऐतिहासिक

The Buddhist community now has a little self-examination | बौद्ध समाजाने आता थोडेसे आत्मपरीक्षण करावे

बौद्ध समाजाने आता थोडेसे आत्मपरीक्षण करावे

Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ साली नागपूर मुक्कामी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बुद्ध धम्माची जी दीक्षा घेतली, त्या ऐतिहासिक घटनेस आता ६० वर्षे पूर्ण होत आहेत. धम्म स्वीकारामुळे बौद्ध समाजाचा स्वाभिमान जागा होऊन त्यांच्यात एक मूलगामी परिवर्तन आले. माणसे शिकू लागली. नोकऱ्याचाकऱ्यात प्रवेश करु लागली. उच्चपदस्थ होऊ लागली. बौद्ध समाज लिहू लागला व त्याने लिहिलेले साहित्य जागतिक स्तरावर दखलपात्र ठरू लागले. मूलत: मीपण माणूस आहे व मलाही इतरांसारखीच मान-सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे ही भावना बौद्ध समाजात निर्माण झाली. पण प्रारंभीच्या काळी धम्म स्वीकारामुळे बौद्ध समाजात जी एक अभूतपूर्व नवविचारांची क्रांतदर्शी लाट आली होती, ती आता काहीशी मंदावून आपला प्रवास परिवर्तनाकडून स्थितीवादाकडे सुरू झालेला दिसतो व ही बाब चिंताजनकच आहे.
बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवरून बौद्ध समाजास दिलेला बुद्ध हा विपश्यना, ध्यान, समाधी करणारा बुद्ध नसून तो समाजक्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणारा बुद्ध आहे. त्यांचा बुद्ध हा गूढवादी नसून तो बुद्धिवादी, प्रज्ञाशील आणि करुणामय समाजनिर्मितीचा भाष्यकार आहे. बाबांच्या बुद्धास कर्मकांड मान्य नाही. तो इहवादी आहे. बाबासाहेबांनी बौद्धांना समतावादी समाज निर्माण करणारा बुद्ध दिला. स्वर्गात जाणारा, मोक्षप्राप्ती करणारा बुद्ध दिला नाही. त्यांचा बुद्ध समाजाला जातीमुक्त शोषणमुक्त करणारा बुद्ध आहे. पण बाबासाहेबांच्या या परिवर्तनवादी बुद्धाचा विसर पडून बौद्ध समाजातील सुस्थापितांचा एक मोठा वर्ग आज विपश्यना म्हणजे बौद्धधम्म होय, असे मानून डोळे मिटून विचारशून्य अवस्थेत बसून ध्यान करू लागला आहे. या सुस्थिर बौद्धांचे अंधानुकरण ‘नाहीरे’ वर्गातील विस्थापित बौद्ध समाजही करु लागला आहे. विपश्यनेचा खरा अर्थ विपश्यना म्हणजे विशेष दृष्टी असा आहे. बाबासाहेबांनी सामाजिक समतेचा जो देदीप्यमान इतिहास घडविला तो विपश्यना करून नाही. महात्मा फुलेंनी जी ग्रंथनिर्मिती केली ती डोळे मिटून केली नाही.
प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडले पाहिजे असे बाबासाहेबांनी सांगून ठेवले. पण बौद्ध मध्यम वर्गीयांना याचाच नेमका सोयवादी विसर पडला. कालचा श्रमजिवी समाजशिक्षण आणि नोकऱ्यांमुळे मध्यम वर्गीय बनला. हा वर्ग तोंडाने आंबेडकरवाद जरी म्हणत असला तरी या वर्गाचा आंबेडकरी चळवळीशी फारसा संबंधच राहिलेला नाही. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ याऐवजी ‘स्वहिताय स्वसुखाय’ ही त्यांची घोषणा झाली. राखीव जागांमुळे या वर्र्गाला व्यवस्थेत एक हक्काची जागा मिळाली. प्रस्थापित व्यवस्थेचा हा वर्ग एक भाग झाल्यामुळे व्यवस्था परिवर्तनाशी त्याचा संबंधच तुटला. त्याचे व्यवस्थेशी कुठलेच भांडण राहिले नाही. धम्म परिषदातून भाग घेऊन आपण एक धम्मकार्यच करीत आहोत असे लटके समाधान मिळविण्यात धन्यता मानतो. गावोगाव भरणाऱ्या या धम्म परिषदांचा कर्मकांड वगळता माणसाच्या जीवन-मरणाच्या बुुनियादी प्रश्नांशी काही संबंध असतो असेही नाही. जागतिकीकरणाची समस्या, दलित समाजाचे सामाजिक शैक्षणिक, आर्थिक प्रश्न दलित शेतमजूर, भूमीहिनांच्या समस्या, दलित अत्याचाराचा प्रश्न, दलित बौद्ध तरुणांची बेकारी, सामाजिक सामंजस्य आदि समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांची चर्चाच धम्म परिषदातून होत नाही. बुद्धास वर्ण वर्ग शोषण नि जातीमुक्त बुद्धवादी समाज हवा होता. या अनुषंगाने धम्मपरिषदातून चर्चा का होऊ नये ? पण ती होत नाही. समाजात आता हुंडा प्रथा बोकाळत आहे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे विचारांचा जागर न ठरता नाचण्या-गाण्याचा उत्सव ठरत आहे. बाबासाहेबांच्या अस्थींचीही मिरवणूक निघत आहे. स्वर्गलोक, पुनर्जन्म, आत्मा नाकारणाऱ्या बुद्धानुयायी बाबासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून ६ डिसेंबरला परित्राण पाठही होत आहेत. या सर्व प्रकारांना आंबेडकरवादी बौद्ध धम्म संस्कृती म्हणता येईल काय याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार केलेला बरा!
धम्म चळवळीला ही जी ग्लानी आली आहे ती थांबविण्याची जबाबदारी अर्थातच भिख्खू संघाची आहे. बुद्धाने समाज परिवर्तनासाठीच भिख्खू संघाची स्थापना केली होती. बाबासाहेबांनी म्हटले, धम्मावर जर काही संकट आले तर भिख्खूंनाच जबाबदार धरावे लागेल. हे भिख्खू लोकांना ज्ञान न देता आपला वेळ ध्यानात व आळसात घालवितात. पुरातन काळातील भिख्खूंचा सेवाभाव हा आदर्श होता. तक्षशिला व नालंदा विश्वविद्यालयांची त्यांनी स्थापना केली. आपले सन्माननीय भिख्खू बाबासाहेबांनी सांगितलेल्या धम्म कसोटीस उतरतात काय याचा शोध भंतेगणांनीच घेतलेला बरा असे म्हटले तर त्यांनी रागावू नये ही नम्र अपेक्षा. दुसरे काय?

Web Title: The Buddhist community now has a little self-examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.