budget 2021 : आरोग्यसेवा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा व्यापक वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 02:46 AM2021-02-02T02:46:15+5:302021-02-02T02:47:36+5:30
budget 2021: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते. त्यानुसार, आरोग्य क्षेत्राकडे यंदा सरकारने गांभीर्याने पाहिल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. गुस्ताद डावर
(वैद्यकीय सल्लागार, रिलायन्स फाउण्डेशन हॉस्पिटल )
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते. त्यानुसार, आरोग्य क्षेत्राकडे यंदा सरकारने गांभीर्याने पाहिल्याचे दिसून येत आहे. आरोग्य क्षेत्राच्या निधीमध्ये केंद्र शासनाने १३७ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांसाठी ही दिलासादायक बाब आहे. यंदा पहिल्यांदाच शासनाने आरोग्यसेवा क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे, त्यात संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार नियंत्रणात येण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने पुढील सहा वर्षात आरोग्यसेवेचा टप्प्याटप्प्यात दर्जा सुधारण्याचा सकारात्मक मानस व्यक्त केला आहे. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी सरकारने सहा वर्षांची योजना तयार केली आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाला यामुळे फायदा होईल. या योजनेत ग्रामीण भारतात १७,००० आणि शहरी आणि निमशहरी भागात ११,००० नवीन आरोग्यसेवा केंद्रे उभारली जातील.
आरोग्यसेवा केंद्र आणि लॅब यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा असून, तीव्र संक्रमण काळात सर्व यंत्रणांसमोर चाचणी, निदान व तपासणी याचे आव्हान निर्माण झाले होते.
मात्र या अत्याधुनिक लॅबची निर्मिती करताना याला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे महत्त्वाचे आहे. डिजिटल साधनांचा योग्य तो आधार घेऊन आरोग्यसेवा क्षेत्रातील द्स्ताऐवज जमा करणे महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या सेवा-सुविधांप्रमाणे अर्थसंकल्पात शुद्ध पाणी-हवा मिळावी, तसेच प्रदूषणाची पातळी कमी व्हावी यासाठी जैविक कचऱ्याच्या विघटनासाठी पावले उचलली आहेत.
कोरोनाकाळातून धडा गिरवून केंद्र शासनाने देशातील फार्मा उद्योग क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे होते. जेणेकरून, उत्तम दर्जाचे आणि अत्याधुनिक वैद्यकी साहित्य आपल्या देशात उपलब्ध होईल, शिवाय स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. त्याचप्रमाणे, अन्य देश-राष्ट्रांवरील आपले अवलंबित्व कमी होईल. गेली अनेक वर्षे आपल्याकडील आरोग्य यंत्रणा सीटीस्कॅन, एक्स-रे, एमआरआय, व्हेंटिलेटर यांसारख्या निदान आणि उपचारासाठीच्या उपकरणांसाठी परेदशातील तंत्रज्ञानावर अवलंबून आहे.
कोरोनानंतर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची गरज आहे. याखेरीज, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत आरोग्याच्या उत्तम सेवा पोहोचण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. समाजातील तळाच्या वर्गांना सरकारी आणि खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या दरांत आरोग्यसेवा मिळाल्या पाहिजेत. शेवटी एक महत्त्वाची बाब. आरोग्य क्षेत्रासाठी वाढविलेला निधी हा खर्चासाठी नसून भविष्याच्या दृष्टिकोनातून केलेली ती उत्तम गुंतवणूक आहे!