budget 2021 : शेअर बाजाराला धक्का नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 02:32 AM2021-02-02T02:32:15+5:302021-02-02T02:32:58+5:30
budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये सादर केलेले अंदाजपत्रक धाडसी स्वरूपाचे, सर्वसमावेशक व विकासाला चालना देणारे आहे.
- नंदकुमार काकिर्डे
(अर्थकारणाचे अभ्यासक )
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये सादर केलेले अंदाजपत्रक धाडसी स्वरूपाचे, सर्वसमावेशक व विकासाला चालना देणारे आहे. अर्थमंत्र्यांनी बाजाराची अपेक्षा बर्याच अंशी पूर्ण केल्यामुळे शेअर बाजारात त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रामुख्याने पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा क्षेत्र, भांडवली क्षेत्राला चांगली चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
मुंबई शेअर निर्देशांकाने तब्बल २३१४.८४ अंशांची, तर निफ्टीमध्ये ६४६.६० अंशांची जोरदार उसळी या सत्रात मारली. निर्देशांकांच्या प्रमुख ३० कंपन्यांपैकी जवळजवळ २७ कंपन्यांची भाव पातळी जोरदार वर गेली, तर केवळ तीन कंपन्यांचे भाव मात्र खाली घसरलेले होते. या अंदाजपत्रकामुळे गुंतवणूकदारांचे भांडवली मूल्य तब्बल पाच लाख २० हजार कोटी रुपयांनी या सत्रात वर गेले.
या अंदाजपत्रकातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी विविध भारतीय कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एक लाख ९७ हजार कोटी रुपयांची पुढील पाच वर्षात तरतूद करण्याचेही जाहीर केले. देशांतील उद्योगांसाठी व विशेषत: मध्यम व छोट्या आकाराच्या उद्योगांना चांगला, हातभार या अंदाजपत्रकाने दिलेला आहे. या वर्षातील भांडवली खर्चामध्ये पाच लाख ५४ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात तब्बल ३५ टक्के वाढ झालेली आहे.
केंद्र सरकारने विकासासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चात वाढ केल्यामुळे स्वाभाविकच वित्तीय तूट वाढणार यात शंका नाही. मात्र तरीही अर्थमंत्र्यांनी एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या ९.५ टक्क्यांपर्यंत ही तूट राहील असे अपेक्षित धरले आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार कर्जे काढण्यावर जास्त भर देणार असून, केंद्राकडील बचत खात्यातील गुंतवणूक, अल्पमुदतीची कर्जे घेणार आहे. आगामी काळात १३ हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्यासाठी केंद्र सरकार ३.३ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच महामार्ग व रस्ते वाहतुकीसाठी १ लाख ८ हजार २३० कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्यसेवेसाठी दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद केलेली असून, गेल्या वर्षभरात देशातील आरोग्यसेवेची जी बिकट स्थिती पहावयास मिळाली त्यात आमूलाग्र बदल करण्याची मोठी संधी अर्थमंत्र्यांनी यानिमित्ताने घेतलेली दिसते.
अर्थमंत्र्यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपात केल्याने सोन्याच्या किमती सोमवारच्या सत्रात प्रतिदहा ग्रॅम १८०० रुपयांनी घसरलेल्या होत्या. एकंदरीत हे अंदाजपत्रक शेअर बाजारासाठी कोणताही प्रतिकूल धक्का देणारे नाही. मात्र रोखे बाजारामध्ये काहीशी अनपेक्षित हालचाल होण्याची अपेक्षा आहे.