Budget 2024: निर्मला सीतारामन कामात आहेत.. तुम्ही?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 08:41 AM2024-01-29T08:41:42+5:302024-01-29T08:42:07+5:30
Budget 2024: येत्या १ फेब्रुवारीला आपल्या देशाच्या अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्जुन : कृष्णा, येत्या १ फेब्रुवारीला आपल्या देशाच्या अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याबद्दल काही सांगा.
कृष्णा : सरळ सोप्या भाषेत अर्थसंकल्प म्हणजे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजित उत्पन्न व खर्च यांचे बनविलेले पत्रक. त्याच्या आधारेच सरकार आर्थिक निर्णय घेते. सामान्य माणसाने स्वत:चे वैयक्तिक बजेटदेखील बनवले पाहिजे, ज्यामध्ये मासिक अंदाजित उत्पन्नानुसार मासिक खर्चाचे नियोजन करता येईल. वैयक्तिक बजेटचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे.
१. कुटुंबातील सर्व खर्चाचे नियोजन : मासिक बजेटद्वारे आपण आपल्या कुटुंबाला लागणारे सर्व खर्च ओळखून त्यांचे योग्य नियोजन करू शकतो. जसे की, मुलांचा शैक्षणिक खर्च, विमा आदी.
२. खर्चावर नियंत्रण : दर महिन्याच्या खर्चाचे नियोजन केल्याने अनावश्यक खर्च ओळखून तो पुढील महिन्यात टाळू शकतो आणि खर्चांवर नियंत्रण आणू शकतो.
३. आर्थिक शिस्तीची शिकवण : बजेट तयार करून आपण आपल्या मुलांना व इतर कुटुंबांतील सदस्यांना आर्थिक शिस्तीबद्दल शिकवण देऊ शकतो.
४. बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेणे : बजेट तयार करून आपण बदलत्या जीवनशैलीनुसार आपले जगणे कसे जुळवून घ्यावे, त्यासाठी खर्चाची तजवीज कशी करावी, आपल्या उत्पन्नानुसार जीवनशैलीबद्दलच्या अपेक्षा कशा जुळवून घ्याव्यात, हे ठरवू शकतो.
अर्जुन : सामान्य माणसाने कर्जाचे नियोजन कसे आणि का करावे?
कृष्णा : सध्या कर्ज मिळवणे खूप सोपे झाले आहे; परंतु या कर्जाची परतफेड करताना त्याच्या पुढील खर्चांवर काय परिणाम होईल, याचा तो विचार केला जातोच, असे नाही. याकरिता कर्जाचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. परतफेडीची रक्कम ही मासिक उत्पन्नाच्या ३० टक्क्यांपर्यंतच असावी. कर्ज नियोजनाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे :
१. स्वत:वरील आर्थिक ओझे कमी करणे.
२. व्याज आणि इतर खर्चांवर योग्य नियंत्रण आणणे.
३. भविष्यामध्ये कर्ज घेण्यात अडचण येऊ नये, याकरिता सामान्य आपला क्रेडिट स्कोअर उच्चतम ठेवणे इत्यादि.