धनुष्य-बाणात जुंपली
By admin | Published: June 17, 2017 03:14 AM2017-06-17T03:14:02+5:302017-06-17T03:14:02+5:30
भाजपा-शिवसेनेतील कलगीतुरा महाराष्ट्राला नवीन नाही. केंद्र व राज्यात सत्तेत एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र रोज पहायला
भाजपा-शिवसेनेतील कलगीतुरा महाराष्ट्राला नवीन नाही. केंद्र व राज्यात सत्तेत एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र रोज पहायला मिळत आहे. परंतु खान्देशातील जळगावात मात्र या दोन्ही पक्षातील नेते गटबाजीतून स्वकीयांवरच निशाणा साधत आहेत. भाजपामधील अस्तित्वाच्या लढाईत शिवसेनेचे नेते साथसंगत करीत आहे. भाजपा नेते एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आहेत. त्या व्हाईस चेअरमन असलेल्या मुक्ताई या खासगी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने ५१ कोटी रुपयांचे कर्ज दिले. हे कर्ज मंजूर करताना प्रशासनाने नकारात्मक टिपणी दिली असताना ती डावलण्यात आल्याची माहिती बाहेर आली आणि खडसे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला. हा कारखाना पूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सहकार तत्त्वावर सुरू केला होता. पुढे आर्थिक अडचणीमुळे राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला आणि पुण्याच्या डॉ.शिवाजी जाधव यांनी तो विकत घेतला. डॉ. जाधव हे चेअरमन, तर रोहिणी खडसे या व्हाईस चेअरमन आहेत. ५१ कोटींच्या कर्जाचा मुद्दा प्रतिभातार्इंचे भाचे आणि काँग्रेसचे नेते उदय पाटील यांनी सुरुवातीला उचलला. त्यानंतर जलसंपदामंत्री व बॅँकेचे संचालक गिरीश महाजन यांनी आक्षेप घेतला. नोटाबंदी, एनपीएचे कारण दाखवून जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना खासगी साखर कारखान्याला कर्ज का देता, असा सवाल त्यांनी केला. सहकार राज्यमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी महाजन यांच्या तक्रारीची दखल घेत सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश तातडीने दिले. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेवर टीकास्त्र सोडताना मुक्ताई कारखान्याला कर्ज देताना शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीस मात्र जिल्हा बँक कर्ज देत नसल्याचा आरोप केला. सेनेचा आमदार जिल्हा बँकेत व्हा.चेअरमन असताना शिवसेनेविषयी दुजाभाव होत असल्याचे पक्षश्रेष्ठींसमोर त्यांनी ठासून मांडले. खडसे यांनी या खेळीला काटशह देत चेअरमन असलेल्या कन्येऐवजी बँकेचे व्हाईस चेअरमन व शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना पुढे करत बँकेची बाजू मांडायला लावली. भाजपासोबत शिवसेनेतील गटबाजीदेखील या कर्जप्रकरणामुळे नव्याने समोर आली. सेनेच्या तीन आमदारांपैकी दोघे जिल्हा बँकेचे संचालक आहेत, तर मंत्री पाटील मात्र संचालक नाहीत. बँक विषयावर ते पक्षात एकटे पडत असतात.