अपेक्षांचे ओझे

By admin | Published: January 18, 2015 12:20 AM2015-01-18T00:20:59+5:302015-01-18T00:20:59+5:30

आजच्या धावपळीच्या जमान्यात नात्यांनात्यांमधला संवादच हरवत चालला आहे.

The burden of expectations | अपेक्षांचे ओझे

अपेक्षांचे ओझे

Next

आजच्या धावपळीच्या जमान्यात नात्यांनात्यांमधला संवादच हरवत चालला आहे. मात्र ही हरवत चाललेली नाती पुन्हा सांधण्याचा प्रयत्न करणेही गरजेचेच आहे की! ‘हिंदोळे नात्यांचे’ या दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या सदरातून आम्ही हाच संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत!

ठाण्याला राहणारे अंगदचे बाबा सकाळीच अंगदला माझ्या कार्यालयात सोडून गेले होते. तब्येतीने किरकोळ असलेला, चष्मा घातलेला २० वर्षांचा अंगद शांत बसून होता. माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नव्हता. म्हणून त्याच्याकडे न बघताच मी इतर कागदपत्रे वाचायला घेतली. काही मिनिटांतच त्याच्या मनाची तयारी झाली आणि तो बोलू लागला.
अंगद अभ्यासात आधीपासून हुशार. त्याचे मराठी भाषेवर प्रभुत्वही होते. तसे सर्वच विषयांत त्याला चांगले गुण मिळत. त्याला नाटकात काम करायची, भाषणे द्यायची आवड होती. शाळेत असताना तो नाटकांतून कामे करीत असे; पण अभ्यास वाढला तसे त्याच्या बाबांनी त्याच्यावर बंधने घालायला सुरु वात केली. त्याच्या आवडीच्या सर्व गोष्टी हळूहळू दूर केल्या. बाबांच्या कडक शिस्तीमध्ये त्याची आवड मारली जात होती. बाबांवर खूप प्रेम असल्याने त्यांच्या नजरेत भरण्यासाठी तो जिवापाड अभ्यास करून जास्तीतजास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करे. अंगदची आई पदवीधर होती; पण तिला घराबाहेर नोकरी करण्यास परवानगी नव्हती. तिची प्रकृती नाजूक होती. साहजिकच तिची सतत चिडचिड होत असे. या सर्वाचा परिणाम म्हणून अंगदचे हसू मावळत गेले. मित्र तुटत गेले. त्याला दम्याचा त्रास सुरू झाला. तरीही परिश्रम घेऊन उत्तम गुण मिळवले. तरीही वडिलांची अपेक्षा पुरी झाली नाहीच. परीक्षेत गुण चांगले मिळाले तरी त्याला इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेता येत नव्हता. भरमसाठ डोनेशन देऊन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असता. अंगदच्या बाबांनी भरपूर व्याजाने कर्ज काढून त्याचा एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश नक्की केला. या सर्व प्रकारात अंगदला काय हवे आहे, त्याची काय आवड आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्याचे दम्याचे अ‍ॅटॅकही वाढले.
कॉलेज सुरू झाले.. तेथे अंगदची टिंगल-टवाळी होत असल्याने सतत बावरलेला असे. घरातून सतत जबाबदारीची जाणीव दिली जात होती. कर्ज फेडीसाठी वडिलांनी आणखी एक नोकरी धरली. अंगदची बेचैनी वाढली. खोटे बोलून वेळ मारून नेण्याची त्याची वृत्ती वाढली. त्यातूनच अंगदला बढाया मारून स्वत:चे महत्त्व वाढते असा साक्षात्कार झाला.
नामसाधर्म्यामुळे समाजातील प्रतिष्ठित मोठ्या व्यक्ती त्याच्या ओळखीच्या आहेत, नात्यात आहेत, त्याच्या घरचे पैसेवाले आहेत, असे तो सांगू लागला. ते दाखविण्यासाठी तो स्वत:साठी महाग वस्तू, मित्र-मैत्रिणींना मौल्यवान भेटवस्तू देऊ लागला. तो अभ्यासात मागे पडत होता. कॉलेजमध्ये पालकांना भेटायला बोलावले तर टाळत होता. घरी त्याचे बोलणे संपलेच होते. आई-वडिलांची बोलणी खात होता; आणि त्यांच्याकडे दुर्लक्षही करीत होता. या सर्वातून त्याला छोट्या-मोठ्या चोऱ्या करायची सवय लागली.
प्रिन्सिपॉलपर्यंत या बातम्या गेल्या. वडिलांना बोलावून अंगदचे पराक्रम सांगितले गेले. वडिलांना मेल्याहून मेल्यासारखे झाले. अंगद ज्याला घाबरत होता तेच झाले. अंगदची प्रचंड मानहानी झाली. तो अधिकच अबोल झाला. या घटनेनंतर कॉलेजमध्ये जातो असे सांगून तो जायचाच नाही.
मित्रमंडळींना चुकवू लागला. घराजवळच्या बागेत तो दिवसभर वेळ काढे बागेत फिरायला येणारे परिचित आजी-आजोबा त्याला रोज बघत होते. त्यांना काळजी वाटून त्यांनी अंगदच्या आईला संपर्ककेला. आधी तर आईने त्रागाच केला. परिस्थिती नाकारली. पण अंगदच्या वडिलांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी थैमानच घातले. तरी या आजी-आजोबांनी मायेने कौशल्याने अंगदला मदतीची गरज आहे हे त्याच्या पालकांना पटवून दिले.
त्याचाच परिणाम म्हणून अंगद माझ्यासमोर आज बसला होता. बोलताना तो बोलून गेला की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते; पण हिंमत होत नव्हती. समस्या गहन होती; पण ती सर्व बाजूंनी समजून घेऊन त्यावर उपाय करता येणार होता.

च्अंगदचे वडिलांवर अतिशय प्रेम होते. तो त्यांना हवे तसे वागण्याचा पराकोटीचा प्रयत्न करीत होता; पण आई-वडिलांच्या अपेक्षा पुऱ्या करण्यात तो कमी पडत होता. त्याला वैफल्य येत होते.
च्त्यांच्यात मनमोकळा संवाद नव्हता. त्याला प्रत्यक्षात काय हवे आहे ते त्याला सांगता येत नव्हते. आई-वडिलांना समजत नव्हते. त्यांना अंगदचा पोरकटपणा वाटत होता. अंगद वाया गेला याची खंत होती. ते या सर्व प्रकाराला जनरेशन गॅप समजत होते.

च्परिस्थितीचे गांभीर्य वाढत गेले तसे आई-वडिलांचे वैफल्य राग-संताप वाढला
च्स्वत:चा दृष्टिकोन प्रत्येकाच्या परीने बरोबरच होता; पण समोरच्याशी संवाद साधण्याची गरज वाटत नव्हती. अर्थातच त्यामुळे भावनांची अथवा विचारांची देवाण-घेवाण होत नव्हती. निर्णय लादले जात होते.
च्पालकांच्या अपेक्षांचे ओझे अंगदला पेलत नव्हते. परिणामी स्वत:च्या नजरेतून तो उतरला. त्याचा मानसिक / वैचारिक गोंधळ वाढला. सहकाऱ्यांच्या नजरेत त्याची प्रतिमा सुधारावी असे वाटून तो गैरप्रकार करू लागला.

च्मुळातच आपण विसरतो की प्रत्येकाची नैसर्गिक प्रवृत्ती वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीची गती, आवड वेगळी असते. ते क्षेत्र मिळाले तर ती व्यक्ती पुढे यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.
च्आयुष्यात फक्त पैशाच्या मागे लागणे हे यश आहे की आपल्या आवडीच्या कामात आनंद घेणे, ते परिपूर्ण करणे यात समाधान असते हे समजणे आवश्यक आहे.

मुलांची आवड, कुवत वेळेवर समजण्यासाठी आजकाल तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. ते शास्त्रही प्रगत आहे. आवश्यकता आहे ती मोकळेपणाने आयुष्याला दिशा देण्याची आणि आजकालच्या बदलांना सामोरे जाण्याची.

अंगदच्या वडिलांशी संवाद साधून त्यांच्यात व अंगदमध्ये बांध पडलेल्या संवादाला वाट देऊन त्यांच्यात संवाद घडवून आणला गेला. अंगदला अभिनय शिकण्याच्या संस्थेत प्रवेश मिळून त्याच्यातील मूळ प्रवृत्तींना खतपाणी दिल्याने एक मौल्यवान आयुष्य वाचू शकले.

अंगदची समस्या संवेदनशीलतेने समजून पावले टाकणारे आजी-आजोबा भेटले नसते तर काय झाले असते? विचारही करवत नाही!

Web Title: The burden of expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.