निर्मळ आनंदासाठी गाणे आणि जगणे साधलेले व्यास बुवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 09:15 AM2023-11-10T09:15:40+5:302023-11-10T09:16:03+5:30
आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. सी. आर. व्यास ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने ख्यालगायकी अजरामर करणाऱ्या बुवांच्या आठवणी.
- शशिकांत व्यास, श्रुती पंडित
व्यास बुवांसाठी संगीत साधना म्हणजे ईश्वर साधनाच होती. आणि ती करताना ते कधी कर्तव्याला कमी पडले नाहीत. सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांनी नोकरी केली. आणि स्वतःच्या आनंदासाठी गाणे केले. नोकरी, रियाज, स्वतः शिकणे, लोकांना शिकवणे, कार्यक्रम करणे आणि लोकांचे गाणे ऐकणे... ह्या सगळ्यातून वेळ मिळाला की झोपणे. अत्यंत कष्टाचे जीवन जगून त्यांनी आपल्या चारी मुलांना मोठे केले. ह्यात त्यांना त्यांच्या पत्नी इंदिराबाई ह्यांची उत्तम साथ मिळाली. रोजचा व्यवहार त्यांनीच सांभाळला. बुवांच्या तपश्चर्येला आपल्या व्यावहारिक चातुर्याने मूक साथ दिली. व्यासबुवांनी संगीत साधना करून संगीताच्या विश्वात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. शेवटपर्यंत ते आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहिले. आपले कर्तृत्व कधी मिरवले नाही. ते स्वतःच्या आनंदासाठी आधी गात आणि मग ऐकणाऱ्याच्या आनंदासाठी. निर्मळ आनंद हा त्यांचा स्थायिभाव होता.
व्यासबुवांचा कसदार सुरांबरोबरच ताल आणि लय ह्यावर भर असायचा. श्रुती, लय आणि ताल ह्यांचा सुरेल मिलाफ त्यांच्या गायनशैलीत आणि बंदिशीत नेहमी दिसायचा. समेला येणारे शब्द, समेला येणारे सूर... समेला लयीचे काय बंध निर्माण होतात, ज्यामुळे ती सम येते, ह्या सगळ्याचा विचार त्यांच्या गायकीतून स्पष्ट दिसायचा. “एकेका रागामध्ये त्यांनी दोन किंवा अधिक बंदिशी केल्या आहेत... एखादी झपताल, तर एखादी त्रिताल... एकतालावर खूप भर होता बुवांचा... कारण एकतालाची बंदिश ही नेहमी मैफिलीची खुमारी आणि रंगत वाढवणारी असते.”- बुवांच्या शिष्या निर्मलाताई गोगटे सांगतात. व्यासबुवांच्या बंदिशीविषयी एकदा विख्यात सतारवादक शाहीद परवेज म्हणाले होते – “आज के जमाने में व्यासजी एक ऐसे रचनाकार हैं जिन्होंने परंपरा को कायम रखते हुए नवीनता का प्रयोग किया है. उनकी हर बंदिश में आपको नवीनता दिखाई देगी… उसकी जड परंपरा है, मगर जो सोच है वह अनूठी है.”
सी. आर. व्यास एक गुरुभक्त होते, हे निर्विवाद सत्य! गुरूचा मान राखण्यासाठी त्यांनी एकदा नोकरी सोडली, तर एकदा एका ज्येष्ठ गायकाशी निर्भीडपणे रेडिओवर वाद घातला. असा माणूस जेव्हा गुरूची भूमिका घेतो, तेव्हा तो काय उंची गाठू शकतो, ह्यांचे उत्तम उदाहरण होते व्यास बुवा. काही गायक उत्कृष्ट सादरीकरण करणारे असतात, तर काही उत्तम राग आणि बंदिशी निर्माण करणारे, तर काही उत्तम शिकवणारे. हे तिन्ही गुण एका माणसात क्वचित आढळतात. सी. आर. व्यास त्या मोजक्या व्यक्तींमधले एक होते. जितेंद्र अभिषेकी अत्यंत हुशार आणि मेहनती. त्यांना व्यास बुवांच्या सांगीतिक बुद्धिमत्ता आणि दृष्टिकोन ह्याचा प्रचंड आदर होता. अभिषेकींना व्यासबुवांचे रूढार्थाने शिष्य म्हणता येणार नाही. व्यास बुवांनी सुद्धा त्यांच्याकडे कधी एक शिष्य म्हणून बघितले नाही. ते त्यांचे गुरूबंधूच राहिले. अभिषेकी व्यास बुवांकडे शिकायला नेहमी येत असत आणि शिष्याच्या भूमिकेतूनच त्यांच्याकडून ज्ञानार्जन करत असत. अनेक राग त्यांनी व्यास बुवांकडून समजून घेतले.
अभिषेकी एकदा व्यास बुवांना म्हणाले होते... “व्यास तुम्ही नोकरी, संसार, सगळे सांभाळून गाणे करता... म्हणजे दिवसाचे जेमतेम सहा/सात तास तुम्हाला गाण्यासाठी मिळतात... स्वतःसाठी असे तीन/चारच... कारण तुम्ही शिकवण्यासुद्धा करता... त्या औरंगजेबी दुनियेत तुम्ही इतके तास घालवता... तरीही तुम्ही गाण्यात ज्या सांगीतिक उंचीला पोचले आहात ती अद्वितीय आहे... जर तुम्ही पूर्णवेळ फक्त गाणेच केले असते, तर तुम्ही जी सांगीतिक उंची गाठली असती ती गाठणे तर सोडाच, त्याची कल्पना करणे सुद्धा अशक्य झाले असते...” - त्या दिवशी व्यास बुवा अभिषेकींना सहा तास सलग शिकवत होते. शिकवून झाल्यावर ते उठून आत गेले चहा सांगायला. अभिषेकी मात्र शेजारी पडलेली तबल्याची हातोडी स्वतःच्या पोटऱ्यांवर मारत होते.
(पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘चिंतामणी: एक चिरंतन चिंतन’ हा चरित्रग्रंथ प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश)