कडाडली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:34 AM2018-01-31T00:34:04+5:302018-01-31T00:34:58+5:30

मुसळधार पाऊस पडतोय़ विजा जोरजोरात कडाडतायत़ कुठच्या क्षणी वीज जाईल आणि काळोखाचे साम्राज्य येईल हे सांगता येत नाही़ पावसाने जोर धरला आणि वीजही आकाशभर गडगडाटाने तांडव करू लागली़ घराघरातून माऊलीचे सांगणे ‘घरातून बाहेर जाऊ नका रे पोरांनो!’ पोरांनी घरातच गलका केला. मोठमोठ्याने म्हणू लागली ‘आकाशात म्हातारी हरभरे भरडतेय़’ बालपणीची विजेची ही आठवण.

 Cadalese Electricity | कडाडली वीज

कडाडली वीज

googlenewsNext

- डॉ़ गोविंद काळे

मुसळधार पाऊस पडतोय़ विजा जोरजोरात कडाडतायत़ कुठच्या क्षणी वीज जाईल आणि काळोखाचे साम्राज्य येईल हे सांगता येत नाही़ पावसाने जोर धरला आणि वीजही आकाशभर गडगडाटाने तांडव करू लागली़ घराघरातून माऊलीचे सांगणे ‘घरातून बाहेर जाऊ नका रे पोरांनो!’ पोरांनी घरातच गलका केला. मोठमोठ्याने म्हणू लागली ‘आकाशात म्हातारी हरभरे भरडतेय़’ बालपणीची विजेची ही आठवण. अंगावर वीज पडून शेतामध्ये दोन म्हशी ठाऱ अशा स्वरूपाच्या बातम्या वर्षाऋतूमध्ये ऐकायला मिळत़ पंडित दादाशास्त्री जोशींच्या संस्कृत पाठशाळेत अमरकोशाचा काही भाग विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी होता़ ‘तडित् सौदामिनी विद्युत चंचला चपलाइपिच’ कडाडणाºया विजेला पाच नावे संस्कृतमध्ये आहेत याचा बोध झाला़ वीज पावसाळ्याशिवाय भेटत गेली़ कविकुलगुरू कालिदासाच्या ‘मेघदूत’ ह्या खंडकाव्यामध्येही वीज भेटीला आली़ तिचे रूप म्हणण्यापेक्षा तिचा स्वभाव मत्सरी स्त्रीचा कसा वाटतो़ प्रियकर प्रेयसी एकमेकांच्या आलिंगनात विसावले असता तिथे विजेचा प्रकाश का बरे यावा़ मेघाला म्हणावे लागले ‘अयि विद्युत् प्रमादानां दु:खं त्वमपि न जानासि’़ अगं! विद्युल्लते स्त्रियांचे दु:ख तुला सुद्धा कळू नये़ थोडक्यात नको त्या ठिकाणी नको त्या वेळी तुझी लुडबूड कशाला असा भावार्थ आपण समजू या़ राणी लक्ष्मीबार्इंच्या कवितेत ती ओझरती भेटली़ ‘कडकडा कडाडे बिजली/शत्रूची लष्करे थिजली़’ पराक्रमी विजेचे दर्शन इथे घडले़ तात्यासाहेबांच्या नाटकातील वीज धरतीला काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती़
बंधनातीत असणाºया विद्युल्लतेचे साक्षात दर्शन झाले ते मुक्ताईमध्ये़ संत नामदेवांना तिची ओळख खºयानीच पटली होती़ ‘लहानसी मुक्ताई जैसी सणकांडी’ असे मुक्ताईचे वर्णन ते करतात़ ज्ञानदेवांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली़ मुक्ताईने त्याहीपुढचे टोक गाठले़ तिचे अस्तित्व क्षणार्धात लोप पावले़ कुणाला कळलेसुद्धा नाही़
‘कडाडली वीज निरंजनी जेव्हा
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली’
आता विजांचा कडकडाट आकाशातून ऐकू येऊ लागला की, डोळ्यासमोर मुक्ताई येते. तिचे अलौकिक कर्तृत्व दिसू लागते़ चौदाशे वर्षे शरीर धारण करणा-या एका योगीराजाची आई होऊन त्याचा अंहकार दूर करणारी मुक्ताई जगाच्या पाठीवर एक आणि फ क्त एकच़
‘गर्जला गगन कडाडली वीज
स्वरूपी सहज मिळयेली’
तिचे केवळ अठराव्या वर्षी जाणे आजही जीवाला चटका लावणारे आहे़ आली गेली कळले नाही असे विजेसारखे़
 

Web Title:  Cadalese Electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.