कॅलिफोर्नियातील महादुष्काळ

By admin | Published: August 21, 2015 10:01 PM2015-08-21T22:01:46+5:302015-08-21T22:01:46+5:30

आॅगस्ट संपला तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जवळपास सगळा महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण छायेखाली आलेला दिसतो आहे. नेत्यांचे दुष्काळाचे पर्यटन सुरु झाले आहे.

The Californian monsoon | कॅलिफोर्नियातील महादुष्काळ

कॅलिफोर्नियातील महादुष्काळ

Next

प्रा.दिलीप फडके (ज्येष्ठ विश्लेषक)
आॅगस्ट संपला तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जवळपास सगळा महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण छायेखाली आलेला दिसतो आहे. नेत्यांचे दुष्काळाचे पर्यटन सुरु झाले आहे. जवळपास सगळ्या राजकीय नेत्यांना आता दुष्काळग्रस्त जनतेची परिस्थिती नव्याने जाणून घेण्याची गरज भासायला लागली आहे. आता दुष्काळासाठी मदतीची पॅकेजेस द्यायला सुरुवात होईल. सत्ताधारी आणि विरोधी एकमेकांवर टीका करायला लागले आहेत. पण हा असा दुष्काळ काही एकट्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रातच पडलेला नाही. जगाच्या इतर काही भागातही सध्या आपल्यासारखीच दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. त्या भागात दुष्काळाचे कोणते परिणाम झाले आहेत, तिथले राज्यकर्ते या दुष्काळाच्या स्थितीत काय करीत आहेत याचे काहीसे चित्रण आपल्याला तिथल्या प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळते.
अमेरिकेतल्या पश्चिमेकडच्या कॅलिफोर्नियात गेली चारपाच वर्षे सातत्याने दुष्काळाची स्थिती आहे. या दुष्काळी स्थितीचा प्रचंड मोठा फटका तिथल्या लोकांना बसतो आहे. ‘युएसटुडे’ने याबद्दलचा डॉयल राईस यांचा एक वृत्तांत प्रकाशित केला आहे. त्यानुसार या दुष्काळामुळे कॅलिफोर्नियाला जवळपास २७० कोटी डॉलर्सचा फटका बसणार आहे. सुमारे २१हजार लोकाना बेकार व्हावे लागेल. दुष्काळात आपल्याकडे जसे शेतीला सर्वात जास्त नुकसान सोसावे लागते त्याच प्रमाणे तिथेही दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वात मोठे नुकसान होत आहे ते शेतीचे. या नुकसानीचा अंदाज साधारण १८४ कोटी डॉलर्सच्या घरात आहे. हे आकडे मागच्या वर्षाचे आहेत. यावर्षी हेच नुकसान अधिक मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज आहे.
आजवर कॅलिफोर्नियात भूजल साठ्याचे बरेच मार्ग उपलब्ध होते. त्यामुळे आजपर्यंत पाण्याची टंचाई निर्माण झाली, तरी ती सहन करता येत होती. पण आता भूजलाचे स्त्रोत कमी होत आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात हा दुष्काळ असाच सुरु राहिला तर परिस्थिती अधिक गंभीर होईल. आपल्याकडे जसा अल निनोचा प्रभाव पावसावर होत असतो तसेच तिथेही या परिस्थितीचे कारण अल निनोच आहे. त्यामुळेच पर्जन्यमानाबद्दल अनिश्चित स्थिती निर्माण होते आहे. यावेळचा अल निनोचा परिणाम सर्वात प्रभावी असून गेल्या शंभर वर्षांमध्ये हा सर्वात जास्त आहे. यंदा गेल्या हजार वर्षांमधला सर्वात भीषण दुष्काळ असेल असे ‘नॅशनल जिआॅग्राफिक’ने म्हटले आहे.
गेल्या चौदापैकी अकरा वर्षे पश्चिम अमेरिकेच्या कॅलिफोर्निया पासून टेक्सास आणि ओक्लाहोमापर्यंतच्या पट्ट्यात सातत्याने दुष्काळ पडतो आहे. नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ बेन्जामिन कुक यांच्या अभ्यासगटाने या संदर्भातल्या अभ्यासासाठी १७ संगणकीय पद्धतींचा वापर केला होता. त्यात माती परीक्षण, त्यातल्या कोरडेपणाचे पृथ:करण करून हा निष्कर्ष काढला आहे. याबद्दलचा नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूटचा एक अहवाल सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहे. कॅनडा ते मेक्सिको या पट्ट्यातला सारा उत्तर अमेरिकेचा खंडच महादुष्काळाच्या तडाख्यात सापडणार असल्याचा अंदाज वर्तवून त्याचा ग्लोबल वॉर्मिंगशी काहीही संबंध नाही असेही त्यात सांगितले आहे. साधारण दर हजार वर्षांनी येणारा हा प्रकार आहे असे सांगून, अहवालात पुढे पाण्याच्या उपलब्धतेचा मानवी संस्कृतीच्या संदर्भात सविस्तर विचार करून अमेरिका तसेच सिरीया या सारख्या प्रदेशांमध्ये मानवी वसाहतींमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांचे ऐतिहासिक संदर्भात विश्लेषण करून जलसंवर्धनाचे अनेक नवनवे पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत.
‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये चार्लस फिशमन यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यात या दुष्काळाचा सामना कॅलिफोर्निया कशा रितीने करीत आहे याचा आढावा घेतला आहे. शतकातला भयानक दुष्काळ पडलेला असूनही कॅलिफोर्नियाने आपल्या आर्थिक व्यवस्थेत फारशी घसरण होऊ दिलेली नाही हे त्यांनी सप्रमाण दाखवले आहे. शेती, रोजगारनिर्मिती यासारख्या घटकांच्या संदर्भात घसरण झालेली दिसलेली नाही हे नमूद करून फिशमन यांनी असे नमूद केले आहे की दुष्काळामुळे कॅलिफोर्नियात पाण्याचा वापर करण्यासाठी नवनव्या पद्धतींचा वापर केला जाऊ लागला आहे. शेतीत ठिबक सिंचनाचा केला जाणारा वाढता वापर तसेच पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या नवनव्या पद्धतींचा शोध याबद्दलचा विस्तृत लेखाजोखा त्यात वाचायला मिळतो.
दुष्काळ तिथे आहे तसाच आपल्याकडेही आहे. पण त्याचा विचार करण्याच्या आणि त्याचा सामना करण्याचा दोन्ही ठिकाणच्या पद्धतींमध्ये असणारा फरक चार्लस फिशमन यांच्या या लेखामुळे स्पष्टपणाने लक्षात येण्यासारखा आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या वतीने या अभूतपूर्व दुष्काळाच्या परिस्थतीला सामोरे जाण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याची माहिती ‘कॅलिफोर्निया ड्रॉट’ या संकेतस्थळावर वाचायला मिळते. अल निनोच्या प्रभावामुळे हिवाळ्यात पाऊस पडेल या समजुतीखाली लोकानी राहू नये असा इशारा देऊन सॅन दिएगो जल वॉटरबोर्डाने पाण्याच्या अतिरिक्त वापरावर निर्बंध आणले आहेत. त्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. त्यात जुनी स्वच्छतागृहे बदलणे, पाण्याचा अतिरिक्त वापर आवश्यक असणाऱ्या हिरवळी उखडून टाकणे, पाण्याचा अपव्यय कुठे होतो आहे हे शोधून काढून तो बंद करणे यासारख्या अनेक उपायांची माहिती मिळते. या सगळ्या उपायांमुळे तिथला पाण्याचा वापर २५ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट पार करून प्रत्यक्षात तो २७.३ टक्के कमी झाला आहे. यासाठी दुष्काळी परिस्थितीत शेती आणि वृक्षसंवर्धनासाठी पाणी कसे वापरावे याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे असे दिसते. यासाठी सेव्ह अवर वॉटर या संकेतस्थळावर मुद्दाम जाऊन तिथली माहिती वाचणे उपयुक्त ठरावे.
सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात वेंडी आॅर्टिज या तज्ज्ञाचे मत व्यक्त केले गेले आहे. त्यांच्या मते कॅलिफोर्नियामधला दुष्काळ हा पुढे येऊ शकणाऱ्या दुष्काळी स्थिती आणि आपल्या आर्थिक रचनेच्या संदर्भातला एक महत्वाचा धोक्याचा इशारा मानला पाहिजे. अल्प उत्पन्न गटातल्या लोकाना या परिस्थितीत सर्वात जास्त फटका बसणार असतो असेही ते मुद्दाम नमूद करीत आहेत. पाणी वापरण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल करून दुष्काळाच्या संकटाचा सामना करायला कॅलिफोर्नियातले प्रशासन आणि जनता तयार होते आहे हेच या साऱ्यातून जाणवते. राजकारणाच्या पोळ्या भाजायची एक नामी संधी या दृष्टीकोनातून तिथे दुष्काळाकडे बघितले जात नाही हे महत्वाचे आहे.

Web Title: The Californian monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.