वाचनीय लेख - आपल्यापैकी प्रत्येकजण कार्यक्षम नेता होऊ शकतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 06:32 AM2023-11-20T06:32:42+5:302023-11-20T06:33:35+5:30
आपण कसे शिकतो आणि एखादा धक्का कसा पचवतो यावर आपल्या आयुष्याचा प्रवास कसा होतो हे अवलंबून असते. सकारात्मकता ही त्याची गुरुकिल्ली आहे.
डॉ. एस. एस. मंठा
नेतृत्वाचे प्रभावी व्यवस्थापन म्हणजे काय? भावनिक बुद्धीशी त्याचा काही संबंध असतो काय? आपली सामाजिक बुद्धिमत्ता आणि संज्ञानक्षमता यांच्यावर ही गोष्ट अवलंबून असते काय? आपली भावना हाताळण्याची क्षमता आणि इतरांशी होणाऱ्या संवादाची हाताळणी यात महत्त्वाची असते काय? भावनांचे व्यवस्थापन करायला आपण एखाद्याला शिकवू शकतो का? अशा स्वयंव्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात काय असलेच पाहिजे? अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. हा एक महत्त्वाचा विषय आहे, असे काही आघाडीच्या व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक्रम आपल्याला सांगतील. परंतु हा गुंतागुंतीचा विषय आहे हे ते सांगणार नाहीत. सध्याच्या ताणतणावपूर्ण काळात आपल्या बिझनेस स्कूल्समधील विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांची भावनिक एकाग्रता, आकलनक्षमता सामाजिक आणि भावनिक बुद्धी या सगळ्याची सांगड रोजच्या वर्तनात घालण्याची तयारी ठेवावी लागते. तरच ते त्यांच्या व्यावसायिक जीवनात यशस्वी होतात. म्हणून भावनिक बुद्धिमत्तेच्या पातळीचे मूल्यमापन भावनिक आणि बौद्धिक क्षमतेतील फरक जाणून घेऊन करणे हे यशस्वी होण्याइतकेच महत्त्वाचे आहे़.
आपली स्वीकारण्याची, समजून घेण्याची, व्यवस्थापनाची आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या भावना उपयोगात आणण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. यात परिणाम करणारी भावनिक आणि सामाजिक कौशल्ये येतात. आपण एखादी गोष्ट कशी समजून घेतो आणि व्यक्त करतो, नाती कशी विकसित करतो आणि सांभाळतो, आव्हानांचा सामना कसा करतो, योग्य असे निर्णय कसे घेतो हेही यात येते. प्रत्यक्षात भावनिक बुद्ध्य़ांकात संज्ञानक्षमता आणि प्रश्न सोडवण्याची क्षमता मोजली जाते. संज्ञानक्षमता महत्त्वाची असतानाच भावनिक बुद्ध्यांकही आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून एक साधा प्रश्न असा, की कोणीही अत्युच्च अशी भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक बुद्ध्यांक कसा विकसित करतो? आत्मभानापासून सुरुवात करू या. आपल्या स्वतःच्या भावना ओळखणे, बलस्थाने आणि मर्मस्थाने, मूल्ये आणि उद्दिष्ट्ये यांचे आकलन म्हणजे आत्मभान. आपण आपल्या भावनांविषयी जागरूक असले पाहिजे; आणि आपल्या वर्तनावर त्याचा कसा परिणाम होतो याकडे लक्ष दिले पाहिजे.
आत्मभानानंतर आपल्याला आत्मनियंत्रण जमले पाहिजे. भावनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन परिणामकारकरीत्या करणे, तणावाच्या प्रसंगी शांत राहणे, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि लहरी तसेच विध्वंसक वर्तन टाळणे हे महत्त्वाचे असते. आपल्याला आत्मभान असेल, आत्मनियंत्रणही जमत असेल परंतु सहानुभाव नसेल तर दोन्हीना अर्थ नाही. सहानुभाव म्हणजे काय? आपण सर्वच जण समाजमाध्यमांवर आहोत परंतु सामाजिक कौशल्ये आपल्याकडे आहेत काय? व्हॉट्सॲप हे चांगले उदाहरण होईल. अनेक व्यक्तिगत मित्र सहभागी असलेल्या वेगवेगळ्या गटात आपण सामील असलो तरीही आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळ्या बाजूने आपण पाहू शकतो काय? आपण भांडत बसतो आणि समूहातून बाहेर पडणे पसंत करतो. इतरांचे म्हणणे काय? हे समजून घेतच नाही.
आपण कसे शिकतो आणि एखादा धक्का कसा पचवतो यावर आपल्या आयुष्याचा प्रवास कसा होतो हे अवलंबून असते. सकारात्मकता आणि योग्य देहबोली ही यात गुरुकिल्ली ठरते. आपण परस्परातील संबंध कसे सांभाळतो, नेतृत्वकौशल्य, ताण व्यवस्थापन या सगळ्यावर आपले एकंदरीत कल्याण होणे, न होणे अवलंबून असते. भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता तसेच व्यवहारकौशल्ये आपण यशस्वी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भावनिक बुद्धिमत्ता विकसित करणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असून आत्मभानातून तसेच आंतरव्यक्ती कौशल्य प्रशिक्षणातून ती सुरळीत ठेवता येते. या सगळ्याचा एक अभ्यासक्रम तयार करून तो शिकवला गेला पाहिजे.
(लेखक भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत)