समुद्राचे पाणी आणि मलमूत्रातून वीज तयार करता येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:58 AM2022-03-21T07:58:00+5:302022-03-21T07:59:32+5:30

समुद्रातून घेतलेले अर्धा लिटर खारे पाणी वापरून ४५ दिवस चार्ज न करता प्रकाश देतील असे कंदील बनवण्यात संशोधकांना यश आले आहे. त्या प्रयोगाविषयी...

can electricity be generated from seawater and excreta | समुद्राचे पाणी आणि मलमूत्रातून वीज तयार करता येईल का?

समुद्राचे पाणी आणि मलमूत्रातून वीज तयार करता येईल का?

googlenewsNext

ऊर्जेचा तुटवडा हे जागतिक वास्तव आहे. विकसित देश अनेक कारणांसाठी ऊर्जेचा अतिवापर करून ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या निर्माण करत आहेत. गेली शंभर वर्षे विकसित देशांचे राहणीमान उच्चच राहिले आहे. त्यांच्याकडील या उच्च जीवनशैलीचे लाड पुरवण्यासाठी मुख्यतः तिसऱ्या जगातील (म्हणजे द. अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातले काही देश) कच्चा माल मोठ्या प्रमाणात वापरला जातो. शिवाय गेल्या दोन दशकांत जगातल्या विकसनशील देशांतील जीवनमानदेखील एकंदरीने उंचावल्यामुळे तेथेही ही लाट पोहोचली आहे.
  
विजेची जगभरातील मागणी दरवर्षी वाढत आहे आणि पारंपरिक जीवाश्म इंधन संसाधने कमी होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असे सूचित केले आहे की, जगभरातील ८४ कोटी लोक सध्या विजेशिवाय जीवन जगत आहेत. आता वेळ आली आहे, ती उपाय शोधायची. यातील एक स्तुत्य उपक्रम दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात राबवला जात आहे. 

दक्षिण अमेरिकेतील अभियंत्यांनी वॉटरलाइट हे अभिनव  उपकरण  विकसित केले आहे- एक हाताने धरलेले उपकरण जे फक्त दोन कप समुद्रातील खाऱ्या  पाण्याने प्रकाश आणि वीज निर्माण  करू शकते. वॉटरलाइट हा एक फिरता कंदील आहे जो अर्धा लिटर खाऱ्या  पाण्याचे अशा ऊर्जेत रूपांतर करतो की, ज्यायोगे  ४५ दिवस  चार्ज न करता प्रकाश देईल. हे उपकरण  आयनीकरणाद्वारे कार्य करते. जेव्हा मिठाच्या पाण्याचे इलेक्ट्रोलाइटस् उपकरणाच्या आत मॅग्नेशियमवर प्रतिक्रिया देतात तेव्हा विद्युत ऊर्जा तयार होते. या प्रक्रियेत मीठ आणि पाणी वेगळे होतात. म्हणून वॉटरलाइट जेव्हा प्रकाश देणे थांबवते तेव्हा उरलेले पाणी स्वयंपाकासाठी वापरले जाऊ शकते. विकासकांनी   दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील टोकावरील किनारी वाळवंट असलेल्या गुआजिरा द्वीपकल्पातील लोकांना हे दिवे प्रदान केले आहेत. तिथे वीज उपलब्ध नाही. हे उपकरण वॉटरप्रूफ आहे आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या कच्च्या मालापासून  बनवलेले आहे. त्याचे अपेक्षित आयुष्य सुमारे ५,६०० तास आहे; जे २-३ वर्षांच्या वापराएवढे आहे, हे कंदील बनवायची किंमत सध्या पाच हजार रुपये आहे.

हे दिवे रॉकेल किंवा तेल-आधारित कंदिलांना बदलू  शकतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून चार्ज केले जाऊ शकतात. उपरोक्त द्वीपकल्पातील वायू  जमातीचे सदस्य त्यांच्या बोटींवर हे कंदील यशस्वीरीत्या वापरत आहेत, ज्यामुळे त्यांना रात्री मासेमारी करता येते. हे कंदील यूएसबी पोर्टद्वारे लहान उपकरणेही चार्ज करू शकतात. आणीबाणीच्या परिस्थितीत जर खारे पाणी उपल्बध नसेल, तर  मानवी लघवीचा वापर ऊर्जानिर्मिसाठी केला जाऊ शकतो. याचाच साधा अर्थ आहे की स्वच्छतागृहातील पदार्थांचा आपण ऊर्जेसाठी सहज वापर करू शकतो. वेस्ट टू वेल्थ हा शब्दप्रयोग अशाच उपायांना वापरला जातो.

- दीपक शिकारपूर, संगणक साक्षरता प्रसारक 
deepak@deepakshikarpur.com

Web Title: can electricity be generated from seawater and excreta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज