चंद्राच्याही पल्याड मुक्कामाला जाता येईल का?
By Shrimant Mane | Published: August 19, 2023 08:47 AM2023-08-19T08:47:48+5:302023-08-19T08:48:31+5:30
चंद्रावर मानवी वस्तीची तयारी सध्या सुरू आहे. पण आताची प्रगती पाहता अवघ्या बारा वर्षात चंद्राच्याही पलीकडे मानवी वस्ती उभी राहू शकेल!
- श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर.
भारताच्या चंद्रयान- ३ मोहिमेचे यश दोन पावलांवर आले आहे. प्रम्यान रोव्हर व विक्रम लँडर त्यांना लिफ्ट देणाऱ्या प्रॉपल्शन मोड्यूलपासून काल वेगळे झाले. प्रॉपल्शनचा हात सोडल्यानंतर हळूहळू विक्रम दोन दिवसांत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल आणि मग प्रश्यान तिथे रांगत राहील. रोव्हर म्हणजे ग्रह-उपग्रहाच्या पृष्ठभागावर रांगणारे यंत्र तर लैंडर म्हणजे त्याला तिथे पोहोचविणारा वाटाड्या.
याशिवाय एक ऑर्बिटर असते. ते ग्रहाभोवती घिरट्या घालते. सरासरी आठ कोटी किलोमीटर अंतरावरील मंगळाभोवती असेच आपले मंगळयान गेली नऊ वर्षे घिरट्या घालत आहे. चंद्रयान किंवा कोणत्याही अंतराळ मोहिमेत शक्तिशाली रॉकेटच्या साहाय्याने अवकाशयान पृथ्वीवरून अंतराळात पाठवतात. आता त्याचा उलटा प्रवासही नजरेच्या टप्प्यात आहे. 'नासा' मंगळावरून एक यान पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित करणार आहे. मार्स अॅसेट व्हेइकल म्हणजे 'एमएव्ही' हे यान आणखी पाच वर्षांनी मंगळावरून निघेल आणि त्यानंतर दीड-दोन वर्षांत ते पृथ्वीवर पोहोचेल, असे सांगितले जाते. एमएव्हीमधून मंगळावरील माती, दगड वगैरे संशोधनासाठी पृथ्वीवर आणले जातील. अमेरिकेचे पॅसिव्हरन्स रोव्हर सध्या तिथली दगड-माती पिशवीत भरून घेत आहे.
मंगळ ते पृथ्वी या उलट्या प्रवासासारखीच आणखी एक कल्पना गेली बरीच वर्षे शास्त्रज्ञांच्या डोक्यात आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे चारशे किलोमीटर उंचीवर ताशी २७ हजार ६०० किलोमीटर वेगाने, म्हणजे २१ मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा, अर्थात दिवसाला पंधरा फेऱ्या मारणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन १९९८ पासून कार्यरत आहे. टीव्हीच्या अँटेनासारखा, मध्यभागी बेस स्टेशन व दोन्ही बाजूंनी जोडलेले बाहू असा त्याचा आकार आहे. सूर्यमालेतील इतर ग्रहांकडे जाण्याच्या मार्गावर पृथ्वीवरून सहज ये-जा करता येईल अशी ती वस्ती आहे. तशीच वस्ती त्यापेक्षा अधिक अंतरावर एखाद्या ॲस्टेरॉइड म्हणजे उपग्रहावर करता येईल का, ही कल्पना अनेकांच्या डोक्यात भुंगा घालत आली आहे. आताचे कॉलिन्स एअरोस्पेस म्हणजे पूर्वीचे रॉकवेल कॉलिन्समधून निवृत्त झालेले डेव्हिड जेन्सन हे अशांपैकी एक आहेत. त्यांनी नुकतीच ती कल्पना कागदावर उतरवली असून त्यांच्या या शोधनिबंधाची जगभर जोरदार चर्चा आहे.
जेन्सन यांनी तीन गोष्टींचा विचार केला आहे लघुग्रहाची निवड, तिथे कृत्रिम वातावरण कसे हवे आणि ते कसे तयार करायचे अंतराळात ठराविक कक्षांमध्ये फिरणाऱ्या लघुग्रहांचे आकार इंबबेलसारखे जोडले गेलेले दोन्ही बाजूंच्या गोळ्यांसारखे, तसेच गोलाकार किंवा सिलिंडरसारखे आणि टोरस म्हणजे रिंग किंवा तबकडीसारखे आहेत. जेन्सन यांना एस-टाइप म्हणजे सिलिसिअस अर्थात पाषाणापासून बनलेला अटिअरा हा लघुग्रह प्रयोग म्हणून योग्य वाटला. अटिअरा म्हणजे नेटिव्ह अमेरिकनांपैकी पवनी जमातीची पृथ्वीदेवता. अमोर, अपोलो, अटेन या मालिकेतील लघुग्रहाला ते नाव २००३ साली दिले गेले. साधारणपणे ३ कोटी १० लाख किलोमीटर म्हणजे चंद्रापेक्षा ऍशीपट अंतरावर असला तरी तुलनेने पृथ्वीच्या जवळ व आकाराने छोटा आहे. ४.८ किलोमीटर व्यासाचा अटिअरा दोन भागात विभागलेला असला तरी त्याला सामाईक बेरिसेंटर म्हणजे मध्यबिंदू आहे आणि त्याला स्वतःचा अवघ्या एक किलोमीटर व्यासाचा चंद्रही आहे. महत्त्वाचे म्हणजे हा लघुग्रह ना अतिउष्ण ना अतिशीत अशा गोल्डीलॉक्स झोनमध्ये आहे.
अशा लघुग्रहावर वस्तीसाठी तिथे कृत्रिम वातावरण आणि विशेषतः गुरुत्वाकर्षण कसे तयार करता येईल, हा कळीचा मुद्दा. एखादा लघुग्रह स्वतःच्या केंद्राभोवती फिरत राहिला व ती गती अधिक असेल तर त्या केंद्राभिमुख शक्तीतून गुरुत्वाकर्षण तयार होते. अटिअरा स्वतःभोवती फिरतो खरा परंतु त्याची गती पुरेशी नाही. भविष्यातील ही वस्ती बंदिस्त वातावरणात असेल. हवा आणि पाणी कृत्रिमरीत्या उपलब्ध करावे लागेल. तापमान कमी-अधिक करणारी व्यवस्था उभी करावी लागेल. अशा वस्तीसाठी तीन लाख किलोमीटर अंतरावर आवश्यक ते साहित्य कसे पाठवायचे? या प्रश्नाची काही पुस्तकी उत्तरे तयार - आहेत. मुळात सारे काही पृथ्वीवरून पाठवायची गरज नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि स्वतःच्या प्रतिकृती तयार करू शकतील असे स्पायडर रोबोट्स आणि बेस स्टेशन एवढे पाठवले की काम होईल, असे जेन्सन यांना वाटते. असे चार स्पायडर रोबोट्स असलेली सीड कॅप्सूल व बेस स्टेशन आणि किमान तीन हजार रोबोट्स तयार होतील अशी इलेक्ट्रॉनिक्स सामग्री असे मिळून साधारणपणे जेमतेम ८६ टन वजन अटिअरापर्यंत पोचविले तरी पुढचे काम सोपे होईल. रॉक ग्राइंडरपासून सोलर पॅनलपर्यंत बाकीच्या गरजा लघुग्रहावर उपलब्ध सामग्रीपासून भागवता येतील. अंतराळ विज्ञानाची सध्याची प्रगती पाहता ही अगदीच किरकोळ बाब आहे.
इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचे फाल्कन हेवी रॉकेट तब्बल ६४ टन वजन अंतराळात घेऊन जाऊ शकते. या मोहिमेसाठी येणारा खर्च आणि वेळ हे पुढचे दोन मुद्दे आहेत. डेव्हिड जेन्सन यांनी हा खर्च साधारणपणे ४.१ अब्ज डॉलर्स इतका काढला आहे. वजनाप्रमाणेच हा खर्चही किरकोळ आहे. कारण, अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेने अपोलो उपग्रहांच्या मालिकेवर ९३ अब्ज डॉलर्स खर्च केला आहे. या स्वप्नवत मोहिमेत अटिअरा लघुग्रहावर जवळपास एक अब्ज चौरस मीटर क्षेत्रफळाची वस्ती तयार होईल. म्हणजे हा खर्च एका चौरस मीटरला अवघा ४.१ डॉलर्स इतकाच पडतो. महत्त्वाचे म्हणजे आता या संकल्पनेला हात घातला तर अवघ्या बारा वर्षात चंद्राच्याही पलीकडे मानवी वस्ती उभी राहू शकेल! shrimant.mane@lokmat.com