आपल्यालाही असे काही करता येणार नाही?
By गजानन जानभोर | Updated: April 3, 2018 00:59 IST2018-04-03T00:59:41+5:302018-04-03T00:59:41+5:30
आपण आयुष्यभर कौटुंबिक पाशात करकचून अडकलेले असतो. पण वैयक्तिक जीवनातील मोह-माया बाळगूनही आपण आपल्या भोवतालच्या एखाद्या शंकरबाबाला, मतीन भोसलेला मदत करू शकतो.

आपल्यालाही असे काही करता येणार नाही?
आपल्या अपराधाचे प्रायश्चित घेण्यासाठी एक न्यायमूर्ती दोषी अधिकाऱ्याला आपला पगार अनाथांना द्यायला सांगतो आणि मुलाच्या लग्नात जमा झालेले पैसे एक गुरुदेव भक्त फासेपारध्यांच्या मुलांना शिक्षणासाठी देतो, या दोन घटना माणूसपणाची हाक देणा-या आणि सारेच अंधारलेले नाही असे सांगणा-या देखील... सध्या अमरावतीचे माहिती आयुक्त असलेल्या संभाजी सरकुंडे या अधिका-याच्या हातून काही वर्षांपूर्वी एक चूक झाली. खरे तर अशा गुन्ह्यासाठी न्यायालय एकतर शिक्षा ठोठावते किंवा दंडाची रक्कम सरकारी निधीत जमा करायला सांगते. परंतु न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरकुंडे यांना प्रायश्चित घेण्याची संधी दिली आणि महिन्याभराचा पगार घेऊन शंकरबाबा पापळकर या फकिराच्या आश्रमात पाठवले. लोकसेवक म्हणून समाजातील दीन-दुबळ्यांच्या दु:खाची तुम्हाला जाणीव असावी, न्या. गवर्इंच्या निर्देशामागील हा वस्तुपाठ. सरकुंडेंसाठी तो दंड असेल पण इतर लोकसेवकांसाठी ती प्रेरणा देखील आहे. न्यायमूर्ती गवर्इंनी त्या अधिका-याला शंकरबाबांच्या आश्रमात मदत द्यायला सांगणे ही गोष्ट न्यायालयावरील लोकश्रद्धा वाढवणारीही आहे.
न्यायासने साधारणत: अशा गोष्टीत स्वत:हून लक्ष घालत नाहीत. न्यायदेवतेच्या डोळयावर असलेल्या पट्टीचे त्यांच्यावर एवढे दडपण असते की असे काही करणे म्हणजे चौकट मोडल्यासारखे तर होणार नाही ना, अशी भीती न्यायमूर्तींना वाटत असते. गवई यांच्या सामाजिक पुढाकारामुळे शंकरबाबा पापळकर नावाच्या फाटक्या कार्यकर्त्याला केवळ मदतच झालेली नाही तर त्याच्या परमेश्वरी कार्याकडे उच्चभ्रू समाजाचे लक्षही वेधले गेले आहे. शंकरबाबांच्या आश्रमात दीडशेपेक्षा अधिक अंध, अपंग, मतिमंद मुले आहेत. यातील काही नालीत सापडलेली तर काही कचºयात फेकलेली. हा फकीर ४० वर्षांपासून या दुर्दैवी जिवांचा संसार मांडून बसला आहे. ही मुले १८ वर्षांची झाल्यानंतर कायद्यानुसार त्यांना आश्रमात ठेवता येत नाही. त्यांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था आजमितीला नाही. शंकरबाबा यासाठी रात्रंदिवस तळमळत असतात. या मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा व्हावा असे कुठल्याही सरकारला वाटत नाही. त्यामुळे अशाच एखाद्या सामाजिक जाणिवेच्या न्यायासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
दुसरी घटना, अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील. राष्टÑसंतांच्या विचारांचा एक पाईक मुलाच्या लग्नात आलेले पैसे फासेपारध्यांच्या मुलांसाठी धडपडणाºया मतीन भोसले या कार्यकर्त्याला देतो. हा समाजशिक्षण देणारा विवाह सोहळा. भाऊराव बगाडे हे या गुरुदेव भक्ताचे नाव. याच सोहळ्यात ज्ञानेश्वर रक्षकांनी त्यांना अलीकडेच मिळालेल्या पुरस्काराचे २५ हजार रुपये मतीनला दिले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या खेड्यात मतीनची ‘प्रश्नचिन्ह’ ही शाळा आहे. फासेपारध्यांच्या ४५० मुलांना घेऊन तो इथे कुडाच्या घरांत राहतो. या शाळेतील मुले कधीकाळी भीक मागणारी, चोरी करणारी. आता त्यांच्या आयुष्याला अर्थ गवसला आहे. प्रत्येकालाच गाडगेबाबा होता येत नाही. त्यासाठी पराकोटीचा त्याग हवा असतो, स्वत:च्या हातांनी नात्यांचे पाश तोडावे लागतात. आपण मात्र आयुष्यभर कौटुंबिक पाशात करकचून अडकलेले असतो. पण वैयक्तिक जीवनातील मोह-माया बाळगूनही आपण आपल्या भोवतालच्या एखाद्या शंकरबाबाला, मतीन भोसलेला मदत करू शकतो. न्या. भूषण गवई, भाऊराव बगाडे किंवा ज्ञानेश्वर रक्षक या सहृदय माणसांनी आपले सामान्यपण कायम ठेवीत तेच केले. आपल्यालाही असे काही करता येणार नाही?