कागद हा प्लास्टिकला पर्याय ठरू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 05:49 AM2020-01-24T05:49:02+5:302020-01-24T05:50:05+5:30

बायोपॉलिमरचा वापर करण्याइतकाच प्लास्टिकचा पुनर्वापर करणेदेखील महत्त्वाचे आहे.

Can paper be a substitute for plastic? | कागद हा प्लास्टिकला पर्याय ठरू शकेल?

कागद हा प्लास्टिकला पर्याय ठरू शकेल?

googlenewsNext

- डॉ. एस. एस. मंठा
(माजी चेअरमन, एआयसीटीई,
सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरण)

देशाच्या स्वातंत्र्य दिन समारंभात १५ आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला प्लास्टिकचा वापर थांबवण्याचा सल्ला दिला. आगामी २०२२ सालापर्यंत एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यास त्यांनी सांगितले. प्लास्टिकची निर्मिती ही फॉसिल फ्युएलपासून होत असल्यामुळे प्रदूषण होण्याचे ते फार मोठे कारण आहे. पण एकदा वापर करून फेकून देण्यात येणारे प्लास्टिक म्हणजे काय, हे अगोदर समजून घ्यायला हवे.

प्लास्टिकची निर्मिती करण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांचा ४ टक्के वापर करण्यात येतो. पंतप्रधानांनी ज्या प्लास्टिकचा वापर थांबवा म्हणून सांगितले त्यात प्लास्टिकची कटलरी, प्लास्टिकच्या बॅगा आणि स्टायरोफोम वस्तूंचा समावेश होतो. वॉशिंग्टन येथील अर्थ पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या मते, जगभरात एक ट्रिलियन प्लास्टिकच्या बॅग वापरण्यात येतात आणि त्यापैकी ८० लाख टन इतक्या प्लास्टिक बॅग समुद्रात फेकण्यात येतात. २०१७-१८ सालात भारताने दररोज २६,००० टन प्लास्टिकचा कचरा निर्माण केला. त्यापैकी १५,६०० टन प्लास्टिकचा दररोज फेरवापर करण्यात येतो आणि बाकीचे प्लास्टिक फेकण्यात जाते. ते नदीच्या पाण्यातून समुद्राला अर्पण केले जाते. जे प्लास्टिक मातीत मिसळून सडते, त्यातून हानिकारक गॅस निर्माण होत असतो.


हवामानात बदलाची गंभीर समस्या सध्या जगाला भेडसावत आहे. त्यामुळे साºया जगभर ऋतूबदलाचे संकट पाहायला मिळते. प्लास्टिकमुळे ८५ कोटी टन इतका कार्बनडाय आॅक्साईडसारखा गॅस वातावरणात सोडला जातो. २०५० सालापर्यंत हे प्रमाण ५६० कोटी टनापर्यंत वाढणार आहे, तर २१०० सालापर्यंत हे प्रमाण २६०० कोटी टन होण्याची शक्यता आहे. प्लास्टिकचे उत्पादन केले जात असताना न्यूरोटॉक्सिक प्रकारची रसायने बाहेर सोडली जातात. त्यात पीव्हीसीपासून व्हिनिल क्लोराईड, पॉलिस्टायरिनपासून डायोक्सिन आणि बेन्झिन, पॉलिकार्बोनेटपासून फॉर्मडीहाईड ही रसायने प्रमुख आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे कंटेनर यांच्या निर्मितीत तयार होणारे बिस्फेनॉल ए हे रसायन पाण्यात मिसळले जाते. पाण्यातील मासे पाण्यात तरंगणारे प्लास्टिक खात असतात. हेच मासे जेव्हा आपण खातो, तेव्हा आपल्या शरीरात हेच बिस्फेनॉल रसायन प्रवेश करीत असते. तेव्हा या संकटाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर माणसाचे भवितव्य धोकादायक ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी साधारणत: एक हजार वर्षे लागतात. पण ज्यांचे विघटन होऊ शकत नाही अशा वस्तू वातावरणात राहतात आणि त्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होते. ते आरोग्यासाठीही घातक असते. अशा स्थितीत प्लास्टिकला कोणता पर्याय मिळू शकतो? जे पर्याय आहेत ते वातावरणपूरक आहेत का? एकदा वापरून
फेकून देता येणाºया प्लास्टिक बॅगसाठी दीर्घ मुदतीचा कशा प्रकारचा तोडगा असू शकतो? वापरा आणि फेकून द्या, यासाठीसुद्धा योग्य पर्याय शोधावा लागेल. भारतात दरडोई प्लास्टिकचा वापर १५ किलो इतका असून, त्यापैकी ६० टक्के प्लास्टिकचे रिसायकलिंग होत असते.

भारतात प्लास्टिकची निर्मिती करणारे ३०,००० उद्योग असून, त्यात ४० लाख लोक काम करीत असतात. प्लास्टिक प्रोसेसिंग करणारा व्यवसाय एकूण २.२५ लाख कोटी रु.चा असून, प्लास्टिकच्या मालाची निर्यात करणारे २००० निर्यातदार आहेत. प्लास्टिकच्या उत्पादनावर बंदी घातली तरी त्याची अंमलबजावणी करणे सोपे नाही. असंघटित क्षेत्रातील कारखाने प्लास्टिकचे लपूनछपून उत्पादन करीतच राहतील. बड्या प्लास्टिकच्या निर्मात्यांनी पर्यावरण रक्षणाचा विचार कधी केला नाही, मग हे असंघटित क्षेत्रातील कारखानदार तरी का करतील?
कागदाच्या वापराचे अनेक फायदे आहेत. त्याचे विघटन दोन ते सहा आठवड्यात होते, हा सर्वात मोठा फायदा आहे. त्याउलट प्लास्टिकच्या विघटनाला ५००हून अधिक वर्षांचा कालावधी लागतो. पण कागदाचे विघटन लवकर होत असल्याने तो पाणी लवकर दूषित करतो. कागदी पिशव्यांचा ४३ वेळा फेरवापर केल्यावर त्यापासून पर्यावरणास लाभ मिळू शकतो. याउलट प्लास्टिकचा एकदाच फेरवापर करणे पर्यावरणस्नेही ठरू शकते. कागदी खोक्यांना प्लास्टिकचे लायनिंग वापरून त्याची उपयुक्तता वाढू शकते. या लायनिंगसाठी मक्याचे कणीस किंवा उसापासून तयार केलेल्या स्टार्चचा उपयोग करणे शक्य आहे. या कागदाचा पुनर्वापरही शक्य आहे.

झाडापासून कागद तयार करण्यासाठी वनसंपदा नष्ट करावी लागते. त्यामुळे प्राण्यांची निवासस्थाने नष्ट होतात. दरवर्षी १ कोटी ३० लाख हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट होत असते. पण वृक्षारोपणाच्या माध्यमातून दरवर्षी साधारणपणे ८० लाख हेक्टरमध्ये झाडे उभी होतात. कागदासाठी होणारी जंगलतोड थांबविण्यासाठी समुद्री झुडपांपासून कागदनिर्मिती करायला हवी. तसेच मका, धान्याचे खुंट, उसाची चिपाडे यापासून तयार होणाºया बायोप्लास्टिकचा कागदासाठी उपयोग करायला हवा. सर्व तºहेच्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येऊ शकतो. प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग बगीच्यातील बसण्याची बाके निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. तेव्हा पर्याय म्हणून बायोपॉलिमरचा वापर करण्याइतकाच प्लास्टिकचा पुनर्वापर करणेदेखील महत्त्वाचे आहे.

Web Title: Can paper be a substitute for plastic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.