पेशावरची पुनरावृत्ती टाळू शकतो?

By Admin | Published: December 19, 2014 12:42 AM2014-12-19T00:42:44+5:302014-12-19T00:42:44+5:30

पाकिस्तानच्या जिओ न्यूज चॅनलची रिपोर्टर पेशावरच्या घटनेबद्दल चार वाक्ये नीट बोलू शकत नव्हती. अब कुछ नहीं हो सकता...

Can Patias prevent recurrence? | पेशावरची पुनरावृत्ती टाळू शकतो?

पेशावरची पुनरावृत्ती टाळू शकतो?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी,वरिष्ठ सहाय्यक संपादक, मुंबई - 

पाकिस्तानच्या जिओ न्यूज चॅनलची रिपोर्टर पेशावरच्या घटनेबद्दल चार वाक्ये नीट बोलू शकत नव्हती. अब कुछ नहीं हो सकता... चिल्लानेसे जादा खामोशी की आवाज बडी होती है... असं ती म्हणत होती... बोलता-बोलत कोसळत होती... रडत होती... प्रश्न पाकिस्तानात घडलेल्या एका शाळेतल्या मुलांपुरता मर्यादित राहिलेला नाही... या घटनेनंतर हा प्रश्न तुमच्या-आमच्या घरात घुसलाय, हे लक्षात ठेवा... शवपेटीत निरागसपणे चिरनिद्रा घेत पडलेल्या मुलांचे फोटो पाहवत नाहीत म्हणून टीव्हीचे चॅनल बदलाल, वर्तमानपत्राचे पान उलटून टाकाल... पण घरात घुसलेला हा प्रश्न बाहेर कसा काढाल...?
असेल हिंमत तर पेशावरच्या बातम्या छापून आलेली वर्तमानपत्रे तुमच्या मुलांना वाचायला द्या... आणि नंतर त्यांच्याशी चर्चा करा... त्या बातम्या वाचून त्यांच्या मनात येईल तो प्रश्न विचारायला सांगा... आणि त्यातल्या एका तरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं का ते पाहा... आपल्याच मुलांच्या डोळ्याला डोळा भिडवून त्यांच्या निरागस प्रश्नांची उत्तरं देता आली, तर स्वत:ला खूप भाग्यवान समजा... पेशावरच्या घटनेनंतर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर गुलजार, निदा फाजली आणि अनेकांच्या कविता, शेर दिवसभर येत राहिले... निदा फाजलींचा शेर होता...
दिलेरी का हरगिज हरगिज ये काम नहीं है...
दहशत किसी मजहब का पैगाम नहीं है...!
तुम्हारी इबादत, तुम्हारा खुदा, तुम जानो...
हमे पक्का यकीन है, ये कतई इस्लाम नहीं है..!
आम्हाला आलेले शेर, कविता, दु:ख आम्ही दुसऱ्याला फॉरवर्ड करून टाकले आणि आमच्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. काही वेळाने त्याच व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले विनोदी किस्से दु:खावर उतारा म्हणून फॉरवर्ड करून टाकले... या अशा गोष्टीतच आम्ही भलाई मानणार असू, तर उद्या आपल्या पोराबाळांवर बाका प्रसंग आल्यावर आपण काय करणार आहोत? २६/११च्या निमित्ताने दहशतवादी आमच्या शहरात, इथल्या पंचतारांकित हॉटेलांपर्यंत पोहोचले... उद्या पेशावरच्या जागी आमच्या शहरातील शाळा आल्या तर... आणि पेशावरच्या मुलांच्या जागी आमची मुलं आली तर?
नुसत्या कल्पनेने अंगाची लाही लाही होईल. तिकडे तर ज्या आईबापांनी आपल्या मुलांना पाठीवर दप्तर, वॉटरबॅग आणि जेवणाचे डबे देऊन शाळेत पाठवले त्यांना मुलांची कलेवरं घेऊन यावी लागली! त्यांची अवस्था काय असेल? आणि आमची जबाबदारी फक्त व्हॉट्सअ‍ॅपपुरती मर्यादित ठेवायची? रक्तरंजित बातम्यांनी घरात येणाऱ्या वर्तमानपत्रात गुंडाळून येणारा चिवडा, वडापाव किती दिवस निर्विकारपणे खात राहायचा...
या सगळ्यात आमची काहीच जबाबदारी नाही का? रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बँका, शाळा, चौक किती ठिकाणी आम्ही जागरूकपणे वावरतो, हा प्रश्न आपणच आपल्या मनाला विचारण्याची वेळ जवळ आली आहे. पेशावरनंतर पुढचे लक्ष्य भारत असेल, हे जगातले तज्ज्ञ सांगू लागले आहेत. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदने पेशावरच्या घटनेला भारत जबाबदार आहे, असे सांगून पुढची दिशा स्पष्ट केलीय. तरीही, आम्ही जर व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेजपुरतेच स्वत:ला मर्यादित करणार असू आणि मला काय त्याचे, असे म्हणण्यात धन्यता मानणार असू तर देव, अल्ला, येशू, नानक यांपैकी कोणीही आपल्या मदतीला धावून आले तरीही आपल्याकडे पेशावरची पुवरावृत्ती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आमचीदेखील काही जबाबदारी आहे. जेव्हा आम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा चार बोटं आमच्याकडे असतात हे आम्ही सोयीस्करपणे विसरतो. कुठे साधी रिकामी बॅग दिसली तरी आम्ही आपली नाही ना, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतो. मुंबईसारख्या शहरात लोकल रेल्वे स्टेशनात सगळ्यांनी मेटल डिटेक्टरमधून जायचे ठरवले, तर लागणाऱ्या रांगा सीएसटीच्या रस्त्यावर पोहोचतील. मॉरल पोलिसिंग ही आमचीदेखील जबाबदारी आहे. त्यासाठी डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघावेच लागेल. छोट्यातली छोटी घटना, वस्तू, व्यक्ती दिसली तरी त्याकडे सजगपणे पाहावेच लागेल. २६ जानेवारीच्या निमित्ताने देशात अनेक ठिकाणी अतिरेकी हल्ल्याचे संदेश येणे सुरू झाले आहे. अशा वेळी सगळ्या गोष्टी सरकारने कराव्यात म्हणून आम्ही हात झटकून बसून राहिलो, तर उद्या हातावर हातावर ठेवून बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
सरकार काहीही करू शकणार नाही. दुर्दैवाने असे काही घडलेच तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे हे सरकार आणि आमचे नेते फार काही करतील, असे एकही उदाहरण आमच्यासमोर नाही. ज्या सरकारने २६/११च्या हल्ल्यानंतर स्वत:च्या मानसिकतेत काहीही बदल घडवला नाही, ते सरकार अशा घटना भविष्यात घडल्या तर श्रद्धांजलीशिवाय काही तरी वेगळे करेल, याचा विश्वास सामान्यातल्या सामान्य माणसाला तसूभरही उरलेला नाही. बराक ओबामाने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खातमा तर केलाच; पण त्याचे नखही जगाला दिसू दिले नाही. हे धाडस महाराष्ट्रापुरते तरी कोणाजवळ नाही.
२६/११च्या रात्री अनेक वरिष्ठ अधिकारी कोठे होते, याचे वायरलेस रेकॉर्ड तपासण्याची मागणी त्या वेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे ेकरण्यात आली होती. मात्र, अधिकारी उघडे पडतील म्हणून त्यांनी कधीही त्यामागचे सत्य समोर येऊ दिले नाही. असाच प्रकार या वेळी घडला.
मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीसाठी हिमांशू रॉय, संजय बर्वे आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांना बोलावले. पोलीस महासंचालकांना त्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, याचा राग धरून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आपल्याला न विचारता कोणीही जायचे नाही, असा आदेश काढला. त्याच्या बातम्या छापून आल्या. त्यावर पोलीस महासंचालकांना जाब न विचारता मुख्यमंत्र्यांनी महासंचालकांची काहीच चूक नव्हती, आपल्याच कार्यालयाने निरोप देण्यात गल्लत केली, असे विधानसभेत सांगून त्यांना पाठीशी घातले... या प्रसंगातून पोलीस महासंचालकांची मान ताठ झाली असेल, कदाचित त्यांच्या पदाचा मानदेखील राखला गेला असेल; पण पोलीस दलात काम करणाऱ्या हजारो, लाखो अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनं दुखावली असतील त्याचं काय? एकूणच पोलीस दलात सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत. भापोसे आणि मपोसे हे दोन गट तर जगजाहीर आहेत; मात्र त्या जोडीला आता मराठी, अमराठी अधिकारी हा वाद विकोपाला जाऊ पाहत आहे. सगळ्यांना मुंबई हवी असते; मात्र त्यात मराठी अधिकारी नको असतात, हे चित्र जर पोलीस दलाचे असेल, तर आतंकवादी हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्यास आम्ही समर्थ आहोत, असे कसे म्हणायचे... २६/११मध्ये आम्ही निष्पाप लोक, निधड्या छातीचे पोलीस अधिकारी गमावले तरीही सरकारने, पोलीस दलाने आणि त्यातून काहीही धडा घेतलेला नाही. शिवाजीमहाराज सगळ्यांना हवे आहेत; पण शेजाऱ्याच्या घरात... ही भूमिका आता सोडून द्या... जगाचा इतिहास साक्षी आहे, आजवर झालेल्या कोणत्याही क्रांतीची ठिणगी सामान्यातल्या अतिसामान्य माणसानेच टाकली आहे. तेव्हा सगळी दारोमदार आता तुमच्या-आमच्या खांद्यावर आहे... चला डोळे उघडे ठेवून घराबाहेर पडू या... डोळे उघडे ठेवून अवतीभोवती वावरू या... संध्याकाळी घरी परत येताना आपली मुलं आपली वाट पहात आहेत, याच एका आशेवर हे सगळं करूया... पुन्हा असा सैतानी हमला होऊ न देणे हीच पेशावरच्या त्या निष्पाप मुलांना खरी श्रद्धांजली ठरेल... आमेन...

Web Title: Can Patias prevent recurrence?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.