संघ-भाजपशी धर्मनिरपेक्ष पक्ष लढू शकतील?

By विजय दर्डा | Published: December 7, 2020 12:30 PM2020-12-07T12:30:05+5:302020-12-07T12:51:41+5:30

लोकसभा-विधानसभा असावी तशा जोशाने भाजपने हैदराबाद महानगरपालिका लढवली. या कार्यशैलीमुळेच भाजप हातपाय पसरतो आहे...

Can secular parties fight Sangh-BJP? after hyderabad election poll | संघ-भाजपशी धर्मनिरपेक्ष पक्ष लढू शकतील?

संघ-भाजपशी धर्मनिरपेक्ष पक्ष लढू शकतील?

Next
ठळक मुद्देभारतीय जनता पक्षाने ग्रेटर हैदराबाद महापालिकेची निवडणूक विलक्षण जोशाने लढवली. असा काही धमाका उडवला की सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले. एका महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पूर्ण ताकद लावली, असे पहिल्यांदाच झाले.

 विजय दर्डा

भारतीय जनता पक्षाने ग्रेटर हैदराबाद महापालिकेची निवडणूक विलक्षण जोशाने लढवली. असा काही धमाका उडवला की सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले. एका महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पूर्ण ताकद लावली, असे पहिल्यांदाच झाले. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले, तेव्हा त्यांना मी म्हणालो, ‘एका शहराच्या स्थानिक निवडणुकीत अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्यासारखे दिग्गज उतरले आहेत, तुम्हीही प्रचार करताय, इतरही काही खासदार उतरलेत...’ तर गप्पांच्या ओघात ते म्हणाले, ‘‘हैदराबादेत आम्ही कदाचित सर्वांत मोठा पक्ष नाही होणार; पण लक्षणीय जागा जिंकतो की नाही पाहा! या प्रयत्नातून त्या शहरात आमची मतपेढी नक्की वाढेल’’- या विश्वासाचा परिणाम असा झाला की महापालिकेत ४ जागा असलेल्या भाजपला यावेळी ४८ जागा मिळाल्या. इतकेच नव्हे तर भाजप दुसरा मोठा पक्ष झाला आणि पक्षाने टीआरएसला ९९ वरून ५५ जागांवर खाली खेचले.

भाजपची काम करण्याची ही शैली अनोखी आहे. हा पूर्वीचा जनसंघ नाही. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी बाजपेयी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्यांनी लालनपालन केलेला हा सशक्त पक्ष आहे आणि आज नरेंद्र मोदींसारखे सक्षम नेते त्या पक्षाची सूत्रे सांभाळत आहेत. ते सर्वेसर्वा आहेत. सर्वांना पराभूत करणाऱ्या कुरुक्षेत्रावरच्या कृष्णाची रणनीती ते वापरतात. मोदींना ना कोणी रोखू शकत, ना टोकू शकत. कुणात दम असेल तर त्याने यावे आणि आपला विजयरथ अडवूनच दाखवावा असा मोदींचा आविर्भाव असतो. इंदिरा गांधी अशा होत्या. त्यांनी अवघ्या विरोधी पक्षांना सळो की पळो करून सोडले होते. त्यावेळी ‘त्या एकट्याविरुद्ध सगळे’ असे चित्र होते. आज त्याचीच पुनरावृत्ती दिसते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी दोघे एकचित्त-मताने रणनीती आखत आहेत. संपूर्ण देशाच्या भगवीकरणाचा जणू दोघांनी संकल्प सोडला आहे. मोहन भागवत यांनी संघाच्या वैचारिक निष्ठा, नीतीची कास न सोडता संघाला अत्याधुनिक केले. त्यामुळे अलीकडच्या काळात संघाची स्वीकारार्हता वाढली. एक काळ होता जेव्हा पत्रकारमंडळी दबक्या आवाजात संघाबद्दल बोलत असत. सरसंघचालकांचे वार्षिक बौद्धिक वर्तमानपत्रात कुठेतरी कोपऱ्यात छापून येत असे. आज ती मुख्य बातमी असते आणि दूरचित्रवाणीवर त्याचे थेट प्रक्षेपण होते.

काळानुसार निर्णय घ्यायला संघ कधी बिचकत नाही. नरेंद्र मोदी यांच्या दमदार नेतृत्वाने ‘सोने पे सुहागा’ ही म्हण सार्थ केली आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांना त्यांनी सांगितले  ‘‘आपणाबद्दल आम्हाला आदर आहे; पण नवे नेतृत्व पुढे आणायचे आहे.’’ त्यांनी निर्णय घेतला आणि राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा यांना अध्यक्ष करून त्यांचे नेतृत्व विकसित केले. संघाच्या विचारांशी तुम्ही-आम्ही असहमत असू शकतो; पण संघासारखे दुसरे संघटन नाही, हे वास्तव नाकारता येणारे नाही. संघच भाजपच्या आचार-विचारांचे केंद्र आहे. संघ गंभीरपणे दीर्घकालीन आणि पक्क्या योजना तयार करतो. संघाचे जाळे देशातच नव्हे तर परदेशातही काम करते. काही वर्षांपूर्वी मी स्वित्झर्लंडमध्ये एका मित्राकडे बसलो होतो. त्याचवेळी मित्राला एक फोन आला. पलीकडच्या माणसाने त्याला निरोप दिला, ‘‘लेक लुगानो येथे संघाचा मोठा मेळावा भरतो आहे, आपणही यावे!"  मला धक्काच बसला. संघ आणि येथे? मित्र म्हणाला, इथे संघाचे कार्यक्रम सतत होत असतात. त्यांचे प्रचारक एकमेकांना भेटतात! हेच मी लंडन, युरोप आणि अमेरिकेतही पाहिले आहे. आता भारताचीच गोष्ट पाहा. पूर्वेकडच्या राज्यांत संघ आपली ताकद सिद्ध करील आणि भाजप तिथे सत्तेत येईल असे कोणाच्या कधी स्वप्नात तरी आले होते का? आज पूर्वेकडच्या सर्व राज्यांत भाजप सत्तेवर आहे किंवा सत्तेत सामील आहे. आता त्यांच्या अजेंड्यावर पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणासारखी राज्ये आहेत. केरळ आणि पुदुच्चेरीत संघ हळूहळू आपले बस्तान बसवित आहे.

भाजपला अडवणारे कोणी दिसत नाही, हेच वर्तमानकाळाचे वास्तव आहे. काॅंग्रेस स्वत:तच अडकून पडली आहे. राजस्थान, पंजाबात त्यांचे सरकार आहे; पण ते पक्षामुळे नव्हे तर अशोक गेहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांमुळे. ती त्या नेत्यांची ताकद आहे, पक्षाची नाही. मध्य प्रदेशात जर कमलनाथ यांचे म्हणणे ऐकून त्यांना मोकळीक दिली असती, ज्योतिरादित्य यांचा हस्तक्षेप रोखला असता तर आज तेथे कॉंग्रेसचे सरकार असते. परंतु काॅंग्रेसवाले आपापसात भांडत बसतात, एकमेकांना खच्ची करू पाहतात. शरद पवारांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्यात सातत्य नाही, ते असेही म्हणाले  की, राष्ट्रवादी काॅंग्रेस भले प्रादेशिक पक्ष असेल, पण लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता जिवंत ठेवण्यासाठी एकत्र लढायला आम्ही तयार आहोत. कॉंग्रेसने सशक्त विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे. विरोधी पक्षांची मोट बांधली पाहिजे. कारण भारतभर सर्वत्र संघटन आणि अस्तित्व असलेला तो एकमात्र पक्ष आहे. देशाच्या धर्मनिरपेक्षतेची वीण वाचवू शकेल असा काॅंग्रेस हा एकमेव पक्ष आहे, परंतु त्यासाठी काँग्रेसला अगदी नव्याने सुरुवात करावी लागेल आणि त्यासाठी स्वत:ला उभं करावं लागेल. नाहीतर..!

अडचणी असतानाही काॅंग्रेस पक्षाची अंतर्गत निवडणूक एकमताने व्हावी आणि राहुल गांधी यांच्याकडे सूत्रे जावीत असा मनोमन निर्णय काॅंग्रेस पक्षाने केलाच आहे, असे म्हटले जाते. नेतृत्व निष्प्रभ असल्याने एकेक करून काॅंग्रेसजन निराश होऊन भाजपत जाऊ लागले आहेत. काही लोक आधीच गेले आहेत. या वास्तवाचे भान येऊन कॉंग्रेस पक्ष जागा कधी होणार? मैदानात कधी उतरणार? देशातली जनता काॅंग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. देशाची धर्मनिरपेक्ष वीण हाच पक्ष सांभाळील असे आजही लोकांना वाटते. इकडे नरेंद्र मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणा दिली आहे. ‘त्या विचारधारे’शी जोडलेले लोक मोदींची ही घोषणा मानायला तयार नाहीत, हा भाग वेगळा! या मंडळींचा बुरखा अनेकदा बाजूला होऊन त्यांचा सांप्रदायिक चेहरा उघडा पडतो. या देशाचे अवघे अस्तित्व धर्मनिरपेक्षतेवर टिकून राहिलेले आहे, हे कोणीही कधीही विसरता कामा नये, आज मात्र या बैठकीलाच धक्के बसताना दिसतात. काही लोक शेतकरी आंदोलनावर “खलिस्तान आंदोलन असल्याचा शिक्का मारतात, यासारखी विटंबना ती कोणती? स्वस्थ, निकोप विचार धूसर होत चालले, हे दुर्दैव आहे. ज्या देशात विचारांची शकले होतात, सत्ता कोणत्याही एका पक्षाच्या हातात एकवटत जाते तेथे लोकशाही जखमी होते, हे जगाच्या इतिहासात अनेकदा सिद्ध झालेले आहे. निकोप, समृद्ध लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्षाची गरज असते. तोच लोकशाहीचा आत्मा आहे. ...पण सध्या तरी भाजपचा अश्वमेध वारू चौखूर उधळला आहे. त्याला कोण रोखणार?

(लेखक लोकमत वृत्तसमुहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)
vijaydarda@lokmat.com

Web Title: Can secular parties fight Sangh-BJP? after hyderabad election poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.